Login

मंतरलेले अंतर (भाग 3)

एक हलकी फुलकी प्रेम कथा
मंतरलेले अंतर

भाग 3


समीरने दहावी नंतर एका कॉलेजमध्ये कॉमर्स ला प्रवेश घेतला. अकरावी बारावीचे वर्ष कॉलेजमधील ग्रंथालयातील पुस्तकांवर, आणि जुन्या पुस्तकांवरच काढले.

भरपूर अभ्यास आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने बारावीतही उत्तम गुण मिळवले. परंतु त्याची खरी परीक्षा आता कुठे सुरू झाली होती. त्याने चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचे स्वप्न पाहिले. मेहनत करण्याची तयारी तर होतीच पण प्रश्न होता पैशांचा!

अनाथालय आता त्याचा खर्च करू शकत नव्हते. जिद्दी समीरने मात्र परिस्थिती पुढे हार मानली नाही. तो सकाळी वर्तमानपत्रे टाकायचा. नंतर कॉलेज. संध्याकाळी एका मोठ्या कापड दुकानात हिशोबाचे काम करायचा, आणि रात्री अभ्यास...

असे करत त्याने फाउंडेशन आणि इंटरमीडिएट अशा दोन्ही परीक्षा दिल्या आणि उत्तीर्ण झाला. आता यश त्याच्या अगदी जवळ आले होते. संघर्ष ही तेवढाच तीव्र झाला होता.

सकाळी वर्तमानपत्रे टाकने, संध्याकाळच्या दुकानातील हिशोबाच्या कामासोबत त्यांनी घरगुती शिकवणी सुरू केली होती. दिवसभर काम, कॉलेज आणि रात्री अभ्यास असाच त्याचा दिनक्रम होता. वाचनालयातून आठवड्यातून त्याला दोन पुस्तके मिळत असत.
त्यामुळे दोन दिवस तो तेथे जाई आणि अभ्यासाचे पुस्तक घेऊन
येत असे.

नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर ची सुरुवात झाली होती. बाहेर कडाक्याचे थंडी पडली होती. मुळात थंडीच्या दिवसात अल्हाददायक वातावरण असते. सगळीकडे प्रसन्नतेचा सुवास दरवळत असतो. जास्त ऊन नाही गरमी नाही,, कि पावसाची चिकचिक नाही.


नितळ, स्वच्छ, निर्मळ, उत्साहाने ओतप्रोत असे ते वातावरण!! सूर्यदेव अस्ताला निघालेले... सर्व दूर लालबुंद अभा पसरलेली.

अशा अद्भुत रम्य भावनाप्रधान वातावरणात समीर वाचनालयाकडे निघाला होता. पुस्तक बदलून नंतर दुकानावर हिशोबासाठी जायचे होते. अनाथालयातून निघता निघता त्याला थोडा उशीर झाला होता. म्हणून तू झपझप पावले टाकत निघाला.

वाचनालयाच्या प्रवेशद्वारातच त्याची टक्कर झाली. समोर असलेली मुलगी तोल जाऊन खाली पडली. तिच्या हातातील पुस्तक पडले.


" डोळे नाहीत का तुम्हाला? कि मुलगी बघितली की धक्का मारण्याची संधी शोधता ? " चिडलेला आवाज आला तसे समीरने बघितले, फिकट गुलाबी रंगाचा सलवार-कमीज घातलेली, नाजूक, वेणीचा लांब सडक शेपटा पाठीवर रुळणारी , चाफेकळी नाक, पाणीदार टपोरे डोळे अशी सुंदर मुलगी चिडून बोलत होती. समीर मात्र भान हरपून बघत होता. कसा बसा तो "माफ करा" म्हणाला.

परंतु पुढे काही बोलण्यासाठी त्याला शब्द सापडत नव्हते. चेहऱ्यावर आलेली बट मानेला झटका देत हलकेच मागे घेत ती मुलगी उतरली , " माफ करा म्हटले कि, विषय संपतो नाही का ? चांगलेच ओळखते मी तुमच्यासारख्या मुलांना. फक्त काहीतरी बहाना करायचा आणि मुलींची छेड काढायची. हा पण मला गप्प बसून सहन करणाऱ्या मधली समजू नका . कराटे प्लेयर आहे मी. "

" अहो पण...... " समीर काही बोलणार तोच त्या सुंदर मुलीने परत तोंडाचा पट्टा सुरू केला .

" पण नाही नि बिन नाही. थांबा आता चांगलीच जिरवते तुमची. " एव्हाना मुलीचा आवाज ऐकून त्या ठिकाणी चांगलीच गर्दी जमली होती . जोरजोरा चा आवाज आणि गर्दी बघून वाचनालय सांभाळणारे रेगे काका देखील या जमावाजवळ आले.

समीर या प्रकारामुळे पुरता गोंधळला होता. एक तर चूक दोघांची होती. ती मुलगी तोफे सारखी कडाडत होती. बघ्याची सहानुभूती एक मुलगी म्हणून त्या मुलीकडेच होती .

त्यात तिच्या आरसपाणी सौंदर्यामुळे , निडरपणामुळे समीर तिच्याकडे बघतच राहिला होता . काही केल्या त्याची नजर दुसरीकडे वळत नव्हती.

" प्रथम पाहता क्षणी प्रेम" वगैरे म्हणतात तशी समीरची अवस्था झाली होती!

" समीर काय झाले रे? " रेगे काकांचा आवाज ऐकून समीर भानावर आला.

" काका यांनी मला धक्का मारला आणि मी पडले. " समीरला काहीच बोलू न देता मयुरीने तक्रारीचा सूर लावला.

" शांत हो मयुरी, एवढा राग चांगला नाही, मी त्याला चांगले ओळखतो. समीर एक सभ्य, अभ्यासू मुलगा आहे. " रेगे काकांनी मयुरीला समजावले.

" अच्छा या तिखट मिरचीचे नाव मयुरी आहे तर!!! आहाहा किती छान नाव! किती छान सौंदर्य ! तर कुठे हा तिखटपणा...... देव पण असे कसे लोक जन्माला घालतो काय माहित ? जाऊ देत या तिखट मिरचीचे नाव तर समजले. " समीर चे विचार चक्र बुलेट ट्रेन च्या गतीने धावू लागले.

" समीर तू सांग बघू काय झाले ते? " रेगे काकांच्या वाक्याने समीरची तंद्री भंगली.


" काही नाही काका. मी वाचनालयात येत होतो. या मॅडम आतून बाहेर जात होत्या. दोघेही घाईतच. म्हणून आम्ही एकमेकांना धडकलो. आणि मॅडम पडल्या. पण मॅडम फक्त मलाच बोल लावत आहेत. "

"बरं बरं काही हरकत नाही. ती पडलेली पुस्तके उचला आणि दोघेही आपापल्या कामाला जा. " रेगे काकांचा आवाज ऐकला आणि दोघेही खाली वाकली.

वाकताना दोघांच्या डोक्याची परत टक्कर झाली. मयुरीने परत रागाने त्याच्याकडे पाहिले. समीरने पुस्तके उचलली . पण पुस्तके देताना गडबड झाली.

मयुरी चे पुस्तक समीर कडे आणि समीर चे पुस्तक मयुरी कडे गेले.

नियतीनेच त्यांची पुनर्भेट घडून आणण्यासाठी योजना केली होती बहुधा.....

कशी होईल समीर आणि मयुरी ची भेट ? पाहूया पुढच्या भागात.....