Login

मंतरलेले अंतर (भाग 7)

एक हलकी फुलकी प्रेम कथा
मंतरलेले अंतर

भाग 7 :

मयुरी आणि समीर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते . चोरून भेटणे, काहीतरी बहाना शोधत एकमेकांच्या जवळ थांबणे , निरोप पाठवणे, पत्र देणे घेणे हे म्हणजे प्रेमी जीवांचे श्वास! या दोन प्रेमी जीवांना देखील इतर जग दिसतच नव्हते. नवीन आणि हवाहव्याश्या वाटणाऱ्या या प्रेममय जगात मयुरी हरवून गेली होती.


समीर बद्दलची ओढ, त्याला भेटण्यासाठी, बघण्यासाठी ची आतुरता, प्रत्येक क्षणी व हृदयाची वाढणारी धडधड मयुरीला समीर मध्ये गुंतवून ठेवत होती. त्याच्या हातात हात घालून, नदीकाठी, डोंगरावर फिरताना ती भविष्याची सुख स्वप्ने रंगवत होती. समीर सोबत बोलताना, फिरताना,सुख दुःख वाटून घेताना मयुरी बेभान होत असे.

समीरला तर त्याच्या एकाकी निराधार आयुष्यात जादूची पोतडी मिळाली होती. मायेची ऊब, प्रेमाचा गारवा, हुरहुरीचा पाऊस सगळेच ऋतू तो एकाच वेळी अनुभवत होता. सुख म्हणजे नक्की काय असतं? याची अनुभूती तो घेत होता. गुलाबी थंडीत कुडकुडत असताना मऊ मऊ उबदार रजाई कोणीतरी आपल्या अंगावर पांघरून घालावी , अशी त्याच्या आयुष्यात मयुरी आली होती. तिचं सौंदर्य, तिचे केस, तिचं असणं, तिचं हसणं, आणि तिचं नसणं सगळं सुखावणारे होते, हवेहवेसे होते.


मयुरीच्या रूपाने नियतीने त्याला जगण्याचे कारण दिले होते. प्रेम, नाती, जिव्हाळा,आपलेपणा याची कल्पनाही न केलेला समीर हे सगळे जगत होता.

'आपलं माणूस 'म्हणजे काय हे सुख तो अनुभवत होता.


प्रेम या भूतलावरील सर्वात तरल, सर्वात सुंदर भावना! दुर्दैवाने त्याला न मिळालेली , पण आता मात्र गणपती बाप्पा ने त्याच्यावर कृपा केली होती. आपल्या बाप्पाने केलेल्या कृपेच्या चिंब पावसात तो भिजत होता.

पण एकांतात विचार करताना मात्र समीर अंतर्मुख होत असे. बाप्पाने प्रेमाचे दान दिले होते खरे. पण पुढे काय? आपल्या या हळुवार नात्याला समाज मान्यता मिळेल? हे प्रश्न त्याला सतावत होते. एक क्षण, हे दिवस सगळं काही मंतरलेल आहे , पण म्हणून मयुरी आणि आपल्या मधील अंतराचे काय? कोणता एक असणाऱ्या आपल्या लेकीला मयुरीचे आई-वडील आपल्यासारख्या निराधार, फाटक्या मुलाला देतील का ? या विचारांनी समीरची झोप उडत होती.

पण प्रेम अंध असते. सत्य परिस्थिती करून देखील तो मयूरी शिवाय असण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता.

समीर आता चार्टर्ड अकाउंटंट झाला होता. मयुरी ने ही स्वतःचे बुटीक सुरू केले होते. समीरने आता अनाथालयातील मुलांची जबाबदारी घेतली होती. समीर आणि मयुरीला भेटून जवळपास दीड दोन वर्षांचा कालावधी झाला होता.


मयुरीला समीरचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ माहीत होता. पण त्याचा भविष्यकाळ मात्र प्रेमाच्या सौख्याचा राज्यात जावा यासाठी तिची धडपड होती.

समीर सोबत लग्न करायचे आणि भरभरून जगायचे इतके सोपे होते सगळे तिच्यासाठी. पण प्रेम म्हणजे मजा सुख नाही , तर प्रेम संघर्ष मागते, त्याग मागते, सहनशीलता मागते, हे बिचाऱ्या स्वप्नाळू मयुरी च्या गावी देखील नव्हते.


आज ठरल्याप्रमाणे मयुरी आणि समीर त्यांच्या आवडत्या जागी, समुद्रकिनाऱ्यावर भेटले. समुद्राच्या फेसाळत्या पाण्याच्या लाटा पायांवर घेत खडकांवर बसून सूर्यास्त बघणे समीरला खूप आवडत असे.


दिवसभर आपले काम अविरतपणे करून शांतपणे आपल्या घरी विश्रांतीसाठी जाणाऱ्या दिनकराला पाहून समीरचे मन शांत होई.

सकाळी येताना आपल्या नारंगी रंगाची कोमल आभा पसरवून जगात चैतन्य ओतणारा सूर्य, आग ओकून आपल्या तेजाने जगाला दिपवून टाकणारा सूर्य, आणि सायंकाळी कोणताही मोह, गर्व न ठेवता परत आपली कोमल आभा सर्वदूर पसरवून जाताना पाहिले की बदलणाऱ्या आयुष्याची स्थितप्रज्ञतेची जाणीव होते. म्हणूनच हा अंतर्मुख करणारा सूर्यास्त समीरला खूप जवळचा वाटे.

आज मयुरी आणि समीर ने मनमोकळ्या गप्पा मारल्या. समुद्राच्या खळाळत्या लाटांचा आवाज ऐकत, आंबट गोड भेळ खाताना, त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.


याच आनंदात मयुरी घरी आली. संध्याकाळची वेळ होती. आईने अंगणातील तुळशीवृंदावनासमोर दिवा लावला होता. अंगणातच चप्पल काढून तुळशीला नमस्कार केला. दिव्याच्या मंद प्रकाशात आणि उदबत्तीच्या सात्विक सुवासात तुळशी मातेने आपली पाने हलवून, ' तथास्तु ' असा आशीर्वाद दिल्याचा भास मयुरीला झाला.


डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन मयुरीने घरात प्रवेश केला. तिचे बाबा सोफ्यावर बसून बातम्या बघत होते. तर आई स्वयंपाक घरात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती. आज मयुरीने आज्ञाधारक मुलीसारखे न सांगता हात पाय धुतले, आणि बाबांजवळ जाऊन बसली.

आईला स्वयंपाक घरातून बाहेर बोलावून मयुरीने सरळ विषयालाच हात घातला.

" आई, बाबा मला आणि समीरला एकमेकांसोबत लग्न करायचे आहे. "

" हे तू काय बोलते आहेस मयू? तुम्ही चांगले मित्र आहात ही गोष्ट मान्य आहे. पण समीर सोबत लग्न......? " आईने तीव्र प्रतिक्रिया दिली.


" एका अनाथ निराधार मुलासोबत मी माझ्या मुलीचे लग्न नाही होऊ देणार. " मयुरीच्या बाबांनी त्यांचा निर्णय सांगितला.


" बाबा मी लग्न करेल तर समीर सोबत. नाहीतर माझा जीव देईन. "

तेवढ्याच रागात मयुरीचे बाबा म्हणाले, " दे, दे जीव, यासाठीच तुला जगात आणलं ना. जीव दिलास तरी मान्य. पण मी हे लग्न होऊ देणार नाही. " असे म्हणतच बाबा खाली कोसळले...


काय झाले बाबांना? कसे होईल दोघांचे लग्न.... पाहूया पुढच्या भागात ......