बैल हा शेतक-यांचा शेतीतील खरा आधारस्तंभ आहे. शेतीची मशागतीची सर्व कामं त्याच्याकडून करुन घेतली जातात. शेतकरी बैलावर जीवापाड प्रेम करतो. त्याला चारा , खाद्य ,वेळोवेळी धुणंपाणी करणं हे त्याचे नित्याचे चालूच असते. यांत्रिक शेतीला सध्या प्राधान्य असले तरी बैलांचे शेतीतील महत्व नेहमीच अधोरेखीत करण्यासारखे आहे. नुकताच सोलापूर जिल्ह्यातील अंध बैलाला जिवापाड प्रेम करुन बाळगल्याचा व्हिडिओ निश्चितच माणुसकीचे दर्शन घडवतो.
सोलापूर जिल्ह्यातील मोहळचे शेतकरी इंद्रसेन मोटे यांना बैल पाळण्याचा छंद आहे. त्यांनी बाळगलेल्या खिलार गाईने गोंडस खोंडाला जन्म दिला. मोटे कुटुंबाने त्याचे लहाणपणापासून पालनपोषण केले. पांढराशुभ्र असणाऱ्या या गोंडस खोंडाला सगळेजण सोन्या म्हणू लागले. सोन्या मोठा झाला. शेतातील सगळी कामं करु लागला.एक दिवस सोन्याला औताला जुपले असता डोळ्यांना आजार असल्याचं इंद्रसेन यांच्या लक्षात आले. शेतकरी इंद्रसेन यांनी तात्काळ डॉक्टरला बोलावून सोन्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर सोन्याचे दोन्ही डोळे खराब असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही डोळे काढण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. अखेर सोन्याचे दोन्ही डोळे काढले गेले. हिंडता फिरता काम करणारा सोन्या बैल आंधळा झाला. आत्ता हा बैल बाळगण्यापेक्षा कसाबाला विका असे डॉक्टरांनी सांगितले परंतु लहाणपणापासून पोरासारखं जतन केलेल्या सोन्याला कसाबाला विकनं इंद्रसेन यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी सोन्याला कसाबाला न विकता मनापासून सांभाळायचे ठरवले.त्यांचा हा निर्णय मुक्या प्राण्यावरील अजोड प्रेम दर्शवतो.
इंद्रसेन यांच्या आईने सोन्याला जीवापाड सांभाळले.चारा,खुराक, पाणी वेळच्या वेळी देवून सोन्याला धष्टपुष्ट केले.मोटे कुटुंबाने सोन्याचा मानेवरील सुरी दूर करुन त्याच्यावर उपकार केले. त्याच सोन्याने बैलगाडीचे जू , औत ओढून मोटे कुटुंबाचे पांग फेडले. सोन्या बैलगाडी, औत ओढतो. अंध सोन्या बारीकसारीक हालचाली इशारे सहज ओळखतो. इंद्रसेन यांच्या आवाजाच्या इशा-यातून तो बैलगाडी व औताच्या जुवाला येवून उभारतो.
सोन्याने न थकता , न दमता मोटे कुटुंबाला साथ दिली. त्याच्या कष्टाने घर धान्याने भरले.तोच सोन्या आता वार्धक्याकडे झुकला आहे. त्याला पुर्वीसारखे काम होत नाही. इंद्रसेन यांनी त्याला औताला जुंपणे बंद केले आहे.गेली पंधरा वर्ष सोन्याने शेतातील सगळी काम केली. सध्या दोन वर्ष इंद्रसेन त्याला बसून सांभाळत आहेत.
एकीकडे वार्धक्याकडे झुकलेले आईवडिल सांभाळण्यासाठी समाजात होत असलेली कुचंबणा इंद्रसेन यांनी मुक्या प्राण्यावर दाखवलेली कृतज्ञता खरोखरच अनुकरणप्रिय आहे. ज्या मातीला कष्टाच्या सुगंधाने सा-या जगाला पोसणारा शेतकरी हाच ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीचा द्योतक आहे. प्रेम ,माया,कष्ट,सहनशीलता ,प्रामाणिकपणा ,आदर ,सन्मान याची केवळ शेतकरीच शिकवण देतो. आज पाश्चात्त्य संस्कृतीचा दैनंदिन जीवनावर प्रभाव पडला असला तरी इंद्रसेन यांनी अंध बैलाला जीवापाड जपून आपल्या संस्कृतीच्या उदारतेचे दर्शन घडवले आहे. इंद्रसेन व कुटुंबाला माणुसकीच्या या अनोख्या कार्याला सलाम ..!!
©नामदेव पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा