Login

साप्ताहिक साधना वाचन विशेषांक परीक्षण

वाचन प्रेरणा दिवस विशेष काही खास...

पुस्तकाचे नाव : साप्ताहिक साधना वाचन विशेषांक
प्रकाशन : एप्रिल २०२५
परीक्षण : कामिनी खाने


सुरुवातीलाच या अंकाचे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. पुस्तक हातात घेऊन असलेली ती स्त्री आणि तिथेच बाजूला असलेली ठळक रंगातील 'दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन' ही ओळ मनात घर करते. कारण ग्रंथदिनाच्या निमित्ताने वाचकांना सुरुवातच वाचनीय ओळीने करून दिली आहे. या थीमवर आधारित हा अंक वाचण्याची उत्सुकता वाढते.

अंकासाठी लेख मागवताना लिहिलेले पत्र अंकाचा उद्देश मनोमन पोहोचविण्यात यशस्वी ठरले आहे असे म्हणता येईल. यात भर पडते ती संपादकीय लेखाने.
एका जुन्या वाचनसंस्कृती विषयक लेखातून झालेली प्रस्तुत संपादकाची सुरुवात पुढे जाऊन दृष्टीकोन विषयाला धरून वळण घेते आणि साधारण दहा वर्षांपूर्वी मनात रुजलेली ही संकल्पना अखेर आकार घेते. संकल्पना मनात येण्यापासून ते अंक तयार होईपर्यंतचा एकूणच प्रवास वास्तवाला धरून, थोडक्यात पण चपखलपणे मांडला आहे. माझ्यासारख्या वाचनप्रेमीच्या मनात अंकाविषयी ओढ इथूनच निर्माण झाली हे मी नक्कीच मान्य करते.

प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या लेखापासून या लेखमालिकेची सुरुवात होते. 'साहित्याचे विश्व म्हणजे डोंगरावरचे अरण्य!' या शीर्षकाला साजेसा असा लेख. लहानपणापासून लेखकाने साहित्य विश्वाची जी सफर केली ती वाचताना आपसूकच जिव्हाळा निर्माण झाला. चित्रे कुटुंबाचा, इतरही नामांकित साहित्यिकांचा सहवास लाभलेल्या लेखकाची साहित्यिक जडणघडण त्याला अनुसरूनच झाली हे बोलणे वावगे ठरणार नाही. चांगल्या साहित्याची जाण, वाङ्मयीन दृष्टीकोन, इ.मध्ये रमलेले असतानाच साहित्य विश्वाची डोंगरावरच्या अरण्यासोबतची तुलना भलतीच आवडते.

लेखक सुबोध जावडेकर यांच्या 'मग प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहू लागलो...' या लेखातून दृष्टीकोनाच्या सीमा नव्याने अनुभवता येतात. बालपणापासून लेखकाचे वाचनविश्व कसे होते, काय आवडले आणि काय मनाला भावले नाही हे कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. विज्ञान साहित्य आणि प्रवासवर्णन या साहित्य प्रकारांविषयी लेखकाने नेमक्या शब्दांत जे लिहिले आहे, ते वाचून लेखकाच्या या विषयाप्रति आवडीची जाणीव होते. बोलीभाषेतले शब्द प्रमाण भाषेतील नसले तरी अशुद्ध नसतात हे सांगणेही नक्कीच विचार करायला लावणारे आहे. वि. वा. शिरवाडकरांच्या 'कल्पनेच्या तीरावर' कादंबरीवर केलेले भाष्य मनापासून आवडले. आयुष्यात आपण नेहमी स्वतःच्या नजरेतून विश्व बघतो. साहित्यामुळे जाणिवेच्या कक्षा विस्तारतात. यांसारखी वाक्यं विचारांची दिशा देतात.

लेखक राजन गवस यांच्या 'चळवळीच्या भानगडीत एक मोठा फायदा झाला' लेखातून तर वेगळीच कथा अन् जडणघडण दिसून येते. वक्तृत्व स्पर्धा, वाचन, भाषणे, शिबिर यांमुळे घडलेला हा लेखक वास्तविक जीवनातील गोष्टींची जाणीव करून देणारा वाटतो. 'अस्सल इंद्रजाल' या पुस्तकाच्या उल्लेखाने तर विचार करायला भाग पाडले असे म्हणायला हरकत नाही. कारण खरेच, आजच्या जगातही अनेक विद्या, जादूटोणा वगैरेचे प्रयोग केले जातात. लेखकाने त्या वेळी हे प्रयोग करणे अवलंबले खरे; पण आलेल्या अनुभवावरून शिकवणही घेतली की काही पुस्तकेही खोटे बोलतात. पत्र लिहिण्यामुळे लेखनशैलीत आणि विचारांमध्ये जो विशिष्ट भाव लेखकाला मिळाला, तो वाखाणण्याजोगा वाटला. सामाजिक जाणिवा जपणारा लेखक असाच घडतो नाही का!

आसाराम लोमटे यांच्या 'पुस्तकांनीच भरून काढले जगण्यातले अभाव' लेखातून पुन्हा एकदा वाचनप्रेमाची जाणीव होते. वाचनालयात व्यतीत केलेला वेळ, ते वाचनवेड मनाला स्पर्शून जाते. दैनिकासाठी काम करणे असो किंवा मग चैनीच्या नावाखाली केवळ पुस्तकांवर खर्च करणे असो, सारे काही वाचकांच्या मनाला लेखकाच्या वाचनाप्रतिच्या भावना सांगून जाते. काय आवडले, काय नाही आवडले हे परखडपणे मांडले आहे. अनुवाद वाचण्यासोबतच मूळ भाषेत वाचन करणेही लेखकाने सुरू केले. या सर्वांमागचा हेतू, साध्य झालेल्या बाबी आवडाव्या अशाच आहेत. जळमटे दूर करून आरपार दिसेल असा साक्षात्कार पुस्तकांमुळे झाला हे लेखक दिलखुलासपणे मान्य करतात.

ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'जीवनाच्या समग्रतेचा वेध घेण्याचा छंद लागला' लेखातून सकारात्मक दृष्टीकोन, मानवी स्वभाव आकलन, इ. समजले. घरातले वातावरण, घरून एकप्रकारे मिळालेला वारसा, वाचनालय अन् वाचनासोबत जडलेले नाते,.. या साऱ्याच गोष्टी आवडल्या. शाळेत वाचनालय मंत्री होऊन जोपासलेला वाचनाचा छंद वाचनाच्या गोडीची जाणीव करून देणारा ठरतो. 'जीवन हे एकसुरी नसते, ते बहुपदरी असते.' हे वाक्य आवडले. पुस्तकांना दिलेली दीपस्तंभाची उपमा विशेष आवडली.

शिल्पा कांबळे यांच्या 'माझ्या आत्मशोधाची सुरुवात वाचनाने झाली!' लेखातून वाचक आणि लेखक हे शब्द त्यांच्या आयुष्यात समानार्थी शब्द बनण्याची जी सुरुवात झाली, ती अतिशय सोप्या भाषेत मांडली आहे. वाचनाची भूक अनुभवणे पुन्हा एकदा ओघाने आलेच. लेखिकेची स्त्रीमुक्ती विषयावरची पकड आणि एकंदरीत अनुभवांवरून तयार झालेली स्वतंत्र दृष्टी वाचणे प्रेरक वाटते.

समीना दलवाई यांच्या 'जात-वर्ग या सत्याकडे पाठ फिरवणे जमले नाही...' लेखामध्ये अतिशय स्पष्ट, परखड शब्दांत साहित्यिक विश्वाबद्दल, अनुभवांवर भाष्य केले आहे.
सर्वांनाच आवडेल असे नाही. मात्र लेखामध्ये मांडलेले विचार वाचकांना विचार करायला लावणारे आहेत हे मान्य करायलाच हवे.

संध्या गोखले यांचा 'वाचनाच्या श्रीमंतीमुळे पुढील आयुष्य भरजरी झालं!' लेख वाचताना एक भन्नाट साहित्य मेजवानी मिळाल्याचा आनंद होतो. नकारात्मक पद्धतीने लेखिकेच्या आयुष्यात वाचनाची आवड निर्माण झाली; पण नंतर मात्र वैविध्यपूर्ण वाचनाचा आनंद त्यांनी लुटला. व्यक्तिमत्त्वात झालेले बदल आवडले. खरोखरीच भरजरी आयुष्य काय, हे नव्याने समजले.

सुलक्षणा महाजन यांच्या '‘शहरविरोधी’ दृष्टीकोनापेक्षा माझे विचार अलग होत गेले!' लेखामध्ये आर्किटेक्चर अभ्यासता अभ्यासता आलेले अनुभव आणि यादरम्यान तयार झालेला दृष्टीकोन व्यक्त केला आहे. खरेतर या लेखातून बऱ्याचशा गोष्टी नव्याने समजल्या. त्यामुळे अर्थातच ज्ञानात भर पडण्याचा आनंद आहे.

लेखिका सानिया यांच्या 'पुढच्या रस्त्यावर खाचखळगे असूनही चालता आलं...' लेखातील स्पष्ट, वाचनीय प्रवास वाचताना त्यांचा घडलेला दृष्टीकोन प्रभावी ठरतो. वयाच्या काही टप्प्यांवर बरेचसे प्रश्न पडतात आणि या सगळ्यात लेखिकेला वाचनाने समृद्ध केल्यामुळे बरेच काही साध्य झाले हे समजते. जुन्या नव्या काळातील लेखन अन् वाचन खूप छान शब्दांत व्यक्त केले आहे.

तुकोबांचे वंशज लेखक सदानंद मोरे यांच्या 'ज्ञानाच्या कक्षा लहानपणापासून विस्तारत गेल्या' या लेखातून वारसा म्हणून मिळालेल्या साहित्यिक परंपरेपासून ते बालपण आणि पंचविशी गाठेपर्यंत झालेली साहित्यिक, वैचारिक प्रगती मांडलेली आहे.

डॉ. हमीद दाभोलकर यांच्या 'एक कालातीत तत्त्व माझ्यासाठी पुन्हा अधोरेखित झाले' लेखातून मानवी मनाच्या विविध छटांचा अनुभव येतो.

संकल्प गुर्जर यांच्या 'सिनिकल झालो नाही याचे कारण माझा दृष्टीकोन!' लेख वाचताना या तरुण लेखकाचा दृष्टीकोन विशिष्ट पद्धतीने तयार होण्यासाठी असलेली पार्श्वभूमी समजते.

विवेक सावंत यांच्या 'एकसुरी व साचेबंद दृष्टीकोन नाहीसा झाला' या लेखात मानवतावादी वैज्ञानिक दृष्टीकोन अन् असंच बरंच काही वाचणं एक छान अनुभव होता.

भानू काळे यांच्या 'बकाल बाजूचे दर्शन घडूनही आदर्शवाद कायम राहिला!' लेखातून लेखकाच्या वाचनाच्या आवडीपासून वैचारिक भूमिका तयार होण्यासारख्या बऱ्याच गोष्टी साजेशा शब्दांत मांडल्या आहेत.

शेवटी संपादक, लेखक विनोद शिरसाठ यांचा 'वैचारिक गोंधळात कधी पडलो नाही!' लेख वाचताना सुरुवातीला असलेली वाक्यं अगदी सुयोग्य होती याची जाणीव होते. ओरिजिनॅलिटी, शॉर्ट कट त्याज्य, वाचनाचे वातावरण, विचारांची जडणघडण, भूमिका तयार होणं, साहित्य अन् साहित्यिकांसंदर्भातील मुद्देसूद मांडणी, वाचक ते लेखक असा प्रवास जो पुढे संपादक होण्यापर्यंत घेऊन गेला,... हे सगळं वाचणं उत्तम वाचन अनुभव होता.

लिखाणात प्रत्येकवेळी काहीतरी अवघड, अलंकारिक असायला हवं असं गरजेचं नाही हे सांगणारी ही लेखमालिका आहे असे मला वाटते. विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारची असते त्यामुळे प्रत्येक वाचकाला प्रत्येक विचार पटेलच असे नाही. मात्र एक वाचनप्रेमी म्हणून मी मात्र ही लेखमालिका मनापासून अनुभवली. एकूणच सुरेख अंक आहे.
© कामिनी सुरेश खाने


सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.