Login

शापित अप्सरा पुस्तक परीक्षण

ईराचे लेखक प्रशांत कुंजीर सरांच्या शापित अप्सरा पुस्तकाचे परीक्षण
पुस्तकाचे नाव : शापित अप्सरा
लेखक : प्रशांत कुंजीर
प्रकाशक : परिस पब्लिकेशन
परीक्षण : कामिनी खाने


लेखक प्रशांत कुंजीर हे ऑनलाईन व्यासपीठांवर विविधांगी लेखन करणारे समृद्ध मराठी लेखक आहेत. विनोदी, ऐतिहासिक, ग्रामीण, रहस्य या विषयांवर खास पकड असलेल्या लेखकाने कौटुंबिक, सामाजिक, प्रेम,.. अशा अनेक विषयांचीही मुशाफिरी केली आहे.

दुहेरी अर्थाचे सुरेख, तितकेच रहस्यमय मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. भयाण रात्रीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा एक भव्य वाडा, घुंगरूंच्या माळेवर उभा असलेला देखणा घरंदाज पुरुष जुन्या काळातील घराणे आणि संबंधित गोष्टींची कल्पना देणारे ठरतात. तर उर्वरित मुखपृष्ठावर अप्सरा नावावरून आठवणाऱ्या शुभ्र रंगावर एक नाजूक; पण प्रत्येक काळाला अनुरूप अशी सौंदर्यवती काहीतरी लिहत बसलेली दिसते. बाजूलाच ठळक अक्षरात मिरवणारे 'शापित अप्सरा' हे शीर्षक! शापित शब्दासोबत बरेच काही मनात येते. मग या शीर्षकातील लाल रंग शुभ की रक्तरंजित इतिहास दाखवणारा? काळ्या रंगाचे अस्तित्व केवळ भयाण रात्र दर्शवते की तंत्रविद्या? हे गूढ मुखपृष्ठ पाहून रहस्यमय कादंबरीला अरविंद शेलार यांनी उत्तमरीत्या व्यक्त केले आहे असे म्हणता येईल. मलपृष्ठावरील लेखकाच्या हसऱ्या चेहऱ्याखाली असलेले कादंबरीतील प्रसंग रहस्यमय वातावरणाला साजेसे वलय निर्माण करतात.

अर्पणपत्रिका आणि मनोगतात लेखकाने स्वतःच्या वाचन-लेखन प्रवासातील प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीला स्थान देणे विशेष! पुस्तक छापताना वाचकांच्या दृष्टीने विचार करणेही कौतुकास्पद वाटते.

साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या तिच्यापासून या कादंबरीची सुरुवात होते. ती म्हणजे देखणी, तितकीच बुद्धिमान इरावती इनामदार. श्रेयस देशमुख या तरुणाने संशोधनासाठी निवडलेला 'प्राचीन भारतातील मातृसत्ताक आणि लोककलांचा उदय' हा विषय आणि त्यासाठी इराचे मार्गदर्शन, या कथानकाला काय वळण देईल याची उत्सुकता वाटते. इराला पडलेले स्वप्न आणि एक शाप या कथानकाच्या रहस्यमय वातावरणाला दिशा देणारे ठरतात.

सूर्यभानराव, सौदामिनी, शालिनी, इरावती यांचा आपसातील संबंध विचारात पाडतो. इनामदारांवर शापाचे सावट कसे पडले आणि त्यात इरा, आश्लेषा का भरडल्या जात आहेत? इरा आणि सौदामिनीच्या नशिबात खरेच साम्य आहे का? पमा आत्याला वेड लागले की भलतेच काही? इराला ऐकू येणारे आवाज, पडणारी स्वप्ने, अंगावर उमटणाऱ्या खुणा आणि गोंदवलेल्या चिन्हांचे अर्थ काय? साजगावच्या वाड्याचे रहस्य काय? पलटणाऱ्या पानांसोबत निर्माण होणारे हे प्रश्न शेवटपर्यंत विचार करायला लावतात.

पंचवीस वर्षांनंतर इरा इनामदार वाड्यात परतते खरी; पण इथूनच जणू एका जुन्या अध्यायाची नव्याने सुरुवात होणार असते. इरा आणि श्रेयसने अनुभवलेले प्रसंग, संबंधित प्रत्येकाचे साजगावात परतणे, आश्लेषाच्या स्वप्नात येणारी सुगंधा, वाघ्या मुरळीने दिलेल्या वस्तू, प्रवासात अचानक भेटलेल्या राघवने केलेली आशूची रक्षा, धैर्यशील अन् राघवच्या जुन्या आठवणी, इरा आणि नयनाला पमा आत्याच्या खोलीत आलेला अनुभव, नवनवीन पात्रांची झलक आणि निर्माण होणारे गूढ, सुरू असलेली मृत्यूमालिका आणि तेव्हाच इनामदार महालात शिरण्याचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती,.. हे सारेच रहस्यनिर्मिती करण्यासोबतच उत्कंठावर्धकही ठरते.

भूतकाळाच्या पानांमध्ये साजगावच्या वाड्यासोबत शापित अप्सरेची झलकही पाहायला मिळते. इनामदारांच्या वंशाबद्दल खुलासे होताना पमाची ओळख होते. पुढे पमा आत्यातली काहीशी वेडसर झाकही दिसते अन् शापाने वेढलेले भास आभासांचे चित्रही! हळूहळू पमा आत्याच्या भूतकाळाचा उलगडा होतो; पण मग कथेतील शापित अप्सरा नक्की पमा की आणखी कोणी? याचे उत्तर तर कादंबरी वाचल्यावरच समजते.

अशातच काही जण एका छुप्या हेतूने महालात प्रवेश करून रोखून ठेवलेल्या शक्तींना जणू मोकळे करतात आणि सुरू होतो एक वेगळाच थरार! महालात शिरलेल्यांची अवस्था, त्याचा वाड्यात झालेला परिणाम सारेच रहस्यमय आणि तितकेच कल्पनेपलीकडचे. अशीच एक रहस्यं दडवलेली वस्तू हाती येताच भूतकाळातील घटनांची ओळख होऊ लागते. इनामदार घराण्यातील पुरुष आणि सौंदर्याचे नाते ध्यानात येतानाच एका सुगंधाचीही चाहूल लागते. अंतर राखून असलेल्या अमानवी शक्तींचा वावर वर्तमानात सहज अस्तित्व दाखवत असतो. कुठेतरी या अमानवी शक्तींवर अविश्वास दाखवणाऱ्या इन्स्पेक्टर सारिकाला आलेला थरारक अनुभव आणि त्यात सोबतीला असलेले श्रेयस, राघव वाचकांना खिळवून ठेवतात. मंदिराच्या कलशाच्या अभिषेक प्रसंगीही इनामदार घराण्याचा वैभवशाली वारसा दिसून येतो. सारिका-शकुंतलाचा संवाद वाचताना सारिकाने भूतकाळात बरेच काही भोगले आहे असे वाटते. अशातच घडलेली एक घटना आणि अखेर सौदामिनी इनामदारांच्या वाड्यात येते. शास्त्री गुरुजींनी राघवला दिलेला अनोखा रहस्यमय वारसा काहीसे चकित करणारा ठरतो.

भूतकाळाच्या पानांसोबत खोलवर जखमा भेटीला येतात आणि काळ्या जादूची काही रहस्यं स्वतःचे अस्तित्व दाखवून देतात. सुगंधात अडकलेले सुभानराव, पत्राचे सत्र, गुणवंताबाईंनी खेळलेली चाल आणि इथे उपयोगी ठरलेली सुगंधाची हुशारी, कमळाचे इनामदारांच्या वाड्यात येणे एका गूढ गुंतागुंतीची जाणीव करून देतात. जंगलातील अघोरी साधूचा आत्मा आणि त्यास प्रत्युत्तर देणारी योगिनींची शक्ती, हा थरारही रोमांचक वाटतो. सुभानरावांची सुगंधा आणि सहकाऱ्यांना केलेली मदत नात्याचे नवे अंकुर फुटण्याची चाहूल देते. अचानक मंदिरावर झालेला हल्ला आणि चकमक, त्यातूनच केशर आणि सुगंधाच्या हाती लागलेला योगिनी पंथातील महत्त्वाचा ग्रंथ उत्सुकता निर्माण करतात. सुभानरावांची जखम, पुढे एक हळवा पण तितकाच ठाम प्रसंग आणि अखेर सुगंधाचा सुभानरावांच्या आयुष्यात होणारा रीतसर प्रवेश! नवरा दुसरी स्त्री घेऊन आलेला पाहून उद्विग्न झालेल्या सगुणाबाई आणि गुणवंताबाईंनी त्यांना दिलेला शब्द पाहून जाणीव होते की लेखकाने म्हटल्याप्रमाणे एक सुडाची कहाणी इथूनच नकळत आकार घेत होती.

एकीकडे ग्रंथ लपवून ठेवण्यासाठी योजना आखली जाते तर दुसरीकडे रूप बदललेली चेटकीण मात्र गर्भासह एक बळी घेते. गर्भार स्त्रियांच्या शोधात असलेल्या चेटकिणीला तिचे पुढचे सावज मिळते की नाही? तिचा हेतू पूर्ण होतो की नाही? तिचे पुढे काय होते? याचे खुलासे हळूहळू होतात. सुभानरावांना आलेली इनामदार घराण्याविषयी एक शंका आणि त्यावर गंगाधर शास्त्रींनी केलेला अस्पष्ट खुलासा भूतकाळासोबतच भविष्यातील संकटांची जाणीव करून देतो. या भूतकाळाच्या पानांवरही एका इतिहासाची पुनरावृत्ती होऊ पाहत होती. सगुणाबाई आणि गुणवंताबाईंनी एक उपाय तर शोधला; पण खरेच सुगंधा या पाशात अडकेल की नाही हे पाहणे रंजक ठरते.

पुन्हापुन्हा काही रहस्यमय खुलासे आणि नव्या कटांची नांदी सुरूच राहते. यात मधूनच सुगंधाच्या भूतकाळाची पाने फडफडतात. एका घुंगरावर आवाज चढवून गप्प करणे निवडले गेलेले, तर दुसऱ्या घुंगरूला गप्प करण्यासाठी भलताच मार्ग निवडला गेला. दुःखाच्या सावटाने झाकोळलेल्या महालातील आनंद अन् दुःखाचे चेहरे पाहता पाहता एकामागोमाग एक अनेक मुखवटे लक्षात येत जातात आणि इनामदारांवर असलेल्या शापाचा उलगडा होतो.

कथानक वर्तमानात येते आणि भूतकाळासोबत सांगड घालताना काही आशेची किरणे दिसू लागतात. वेळेनुसार मिळालेले काही संकेत, काही खुणा, कदाचित एक शेवटची चाल वातावरणातील गूढ वाढवायला उपयोगी ठरतात. भूतकाळातील व्यक्ती वर्तमानात एक खास भूमिका पार पाडायला येतात आणि सुरू होतो अंतिम थरार! सुगंधाचा राग आणि शापित अप्सरांचे भवितव्य, या वळणावर जुन्या-नव्या रहस्यमय वारशाला एक अनोखी वाट गवसते.

या कादंबरीत प्रसंगानुरूप साजेशा काव्यओळी आणि दर्जेदार लावण्याही वाचायला मिळतात. नव्या पिढीची आणि जुन्या पिढीची कालानुरूप भाषाशैली उत्तम दर्जाची आहे. रहस्यकथा असली तरी यात गूढ, भय, प्रेम, थरार, अलौकिक शक्ती, ऐतिहासिक वारसा, पुरातत्त्व विभागाचा वापर,... असे बरेच विषय लेखकाने हाताळले आहेत. कथानकाची गरज म्हणून कादंबरीत खूप सारी पात्रे आहेत; परंतु तरीही सुयोग्य मांडणी तसेच शैलीमुळे किचकटपणा जाणवत नाही. मातृत्वाची आस, नवरा वाटून घेण्यासारखे अनेक मुद्दे भावनांना हात घालतात. 'भुंगा स्वतःच कमळात अडकतो; पण दोष मात्र नेहमीच कमळाला दिला जातो.' हे ठाम वाक्य वास्तवाची जाणीव करून देते. अनेक कल्पित-अकल्पित घटनांद्वारे वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणे लेखकाला छान जमले आहे. तांत्रिक कारणांमुळे असलेल्या चुकाही अगदी नगण्य आहेत. छपाई दर्जा, लेखनशैली उत्तम आहे. विषय, सखोल अभ्यासपूर्ण लेखन, भाषाशैली, मांडणी, रहस्य हाताळण्याचे कौशल्य, इ. गोष्टी पाहता कादंबरीचा साहित्यिक दर्जा अतिशय उत्तम आहे असे म्हणता येईल. जुन्या-नव्या पिढ्यांना हमखास आवडेल अशी ही कादंबरी आहे. लेखकाची ही छापील स्वरूपातील पहिलीच कादंबरी असली तरी वाचकांना उत्तम प्रगल्भ लेखनाची मेजवानी मिळते.

श्रेयसच्या अस्तित्वाचा खुलासा, इरा आणि सौदामिनीच्या नात्याचा उलगडा; योगिनी, अमानवी शक्ती, मानवी देहांचे थरारक पर्व; मुक्ती, भूतकाळ-वर्तमानकाळाची सांगड, बुद्धिमत्तेची झलक, वेगळेपण जपणारी पात्रे; रहस्याला असलेली प्रेम, इतिहास, गूढ, भयाची आगळीवेगळी झालर असलेली अभ्यासपूर्ण रंजक कादंबरी नक्की वाचून पहा.

© कामिनी खाने ( कलात्मक पान )
१७ डिसेंबर २०२५

पुस्तकासाठी संपर्क: 9271440112


सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.