पुस्तकाचे नाव : शर्यत
लेखक : ईश्वर त्रिंबक आगम
प्रकाशक : सदिच्छा पब्लिशिंग हाऊस, पुणे
लेखक : ईश्वर त्रिंबक आगम
प्रकाशक : सदिच्छा पब्लिशिंग हाऊस, पुणे
लेखक ईश्वर त्रिंबक आगम म्हणजे मराठीतील ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरूपात लेखन करणारे समृद्ध लेखक आहेत. त्यांचा मोरपीस नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहेच, शिवाय इतरही साहित्य विशेषतः ऐतिहासिक साहित्य प्रसिद्ध आहे.
मुखपृष्ठावर असलेली छकड्यासोबतची बैलजोडी आणि तिचा चालक पाहून वर डौलात मिरवणाऱ्या 'शर्यत' शीर्षकाची कल्पना येते. तो धावणारा छकडा काहीसा मातकट, रापलेला वाटतो; जणू मातीच्या खेळाची जाणीव करून देत असावा. तर आसपास पसरलेल्या लालसर, सोनकेशरी छटांची मांडणी तलवारीचे तळपणे दर्शवत असावी. सत्यवान कोळी यांनी 'शर्यत - हा खेळ मातीचा, तलवारीच्या पातीचा...' या नावाला उत्तमरीत्या व्यक्त केले असे म्हणायला हवे. मलपृष्ठावर असलेल्या बैलगाडा शर्यत समालोचक सुनील मोरे यांच्या ओळी आणि त्याला साजेसे चित्र थोडक्यात शर्यतीच्या नादाची ओळख करून देतात.
सुरुवातीलाच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नितीनआबा शेवाळे यांचे प्रास्ताविक वाचायला मिळते. त्यांचे 'बैल हाच या कथेचा नायक, बाकी सगळे सहनायक.' हे वाक्य कादंबरी वाचताना मनोमन मान्य करावेसे वाटते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे कथानक केवळ एका गावापुरता मर्यादित नसून इतरही बऱ्याच मुद्द्यांना लेखकाने हात घातला आहे. सुरुवातीला असलेले अभिप्राय उत्कंठा वाढवणारे ठरतात. बैलगाडा शर्यतीचा इतिहास आणि बंदी हे प्रकरण लिहून लेखकाने शर्यतीशी संबंध नसलेल्यांनाही या विषयाशी अभ्यासपूर्ण पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवते.
पुढे लेखकाचे मनोगत वाचताना जाणीव होते की एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर स्वप्नातही ती गोष्ट आपला पाठलाग करणे सोडत नाही. लेखकाचा ध्यास, लेखकाचे विचार, लेखकाची पार्श्वभूमी, कुटुंब व मैत्रपरिवार यांनी लेखकाला ही अभ्यासपूर्ण, चौकटीबाहेरची कादंबरी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कथानकाची सुरुवातच शीर्षकाला साजेशा एका शर्यतीने होते; पण ही शर्यत असते स्वप्नातली! हो, यावरूनच कथेचा नायक शर्यतीशी किती घट्ट म्हणावा असा जोडलेला आहे हे लक्षात येते. या तिमाची ओळख करून घेता घेता गावाचीही छानशी ओळख होते. छग्या-बग्या ही बैलांची जोडी सर्वात आधी भेटीला येते आणि काही पानांनंतर एक वेगळीच खंत लावून जातेही... बैलपोळ्याच्या दिवशीचा राजाभाऊंच्या खोंडामुळे पाहायला मिळालेला थरार एक वेगळीच वातावरणनिर्मिती करतो.
कथानकाची सुरुवातच शीर्षकाला साजेशा एका शर्यतीने होते; पण ही शर्यत असते स्वप्नातली! हो, यावरूनच कथेचा नायक शर्यतीशी किती घट्ट म्हणावा असा जोडलेला आहे हे लक्षात येते. या तिमाची ओळख करून घेता घेता गावाचीही छानशी ओळख होते. छग्या-बग्या ही बैलांची जोडी सर्वात आधी भेटीला येते आणि काही पानांनंतर एक वेगळीच खंत लावून जातेही... बैलपोळ्याच्या दिवशीचा राजाभाऊंच्या खोंडामुळे पाहायला मिळालेला थरार एक वेगळीच वातावरणनिर्मिती करतो.
तिमा पाटलांच्या घरातला असूनही शर्यतीसाठी मात्र त्याला बराच संघर्ष करावा लागतो याची जाणीव सुरुवातीपासून होत राहते. अशातच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि तिमाचा मोठा भाऊ रंगा प्रकाशझोतात येतो. रंगा आणि तिमाची साथ, ते निरनिराळे अनुभव आपल्यालाही हसायला, तर कधी डोळ्यांत पाणी आणायला लावतात. कथा जरी शर्यतीची असली, तरी यात रंगा आणि राधाच्या प्रेमाची झालरही बघायला मिळते. रंगाची ती शर्यत हृदयाची धडधड वाढवणारी वाटते. रंगाचा तो आपल्या गोष्टींचा, इतिहासाचा अभिमान नकळतच मनाला स्पर्शून जातो.
पुढे तिमाचे इतिहासप्रेम आणि किल्ल्यांप्रति विचार ऐकून तो रंगाच्याच तालमीत तयार झालेला आहे याची जाणीव होते. छकडा मिळत नाही पाहून मोठ्या भावाचा विरोध पत्करून तिमा रंगाचा जुना छकडा माडीवरून काढतो आणि मेहनतीने या दोस्तांना मानाच्या शर्यतीत दुसरा क्रमांकही मिळतो. दुसऱ्या वर्षी पुन्हा मानाच्या शर्यतीत भाग घेतल्यावर थोड्यासाठी नंबर हुकला असला तरी बाज्या-चिम्याने उत्तम कामगिरी केली हे खरे! पुढे नायकोबाची जत्रा आणि इतर लहानमोठ्या जत्रांनी बाज्या-चिम्याचा चांगलाच सराव करून घेतलेला.
कादंबरीची पाने पलटत असताना नानाविध अनुभव वाचायला मिळतात. यापैकीच फितूरी वाचताना जितका राग येतो तितकीच कीव येऊन वाईटही वाटते. मित्रांमध्ये जरासा दुरावा आला होता; पण नात्याचा पाया भक्कम असला की आपसूकच नाते एकत्र येते हे या मित्रांच्या ऐक्याकडे पाहून लक्षात येते. राधा आणि रंगाचे प्रेमळ क्षण अनुभवणे जितके सुखद, तितकेच त्यांच्या प्रेमाच्या दुश्मनाने खेळलेल्या खेळीला पाहणे वेदनामय! तिमाच्या शर्यत जिंकण्याच्या इच्छेचा खुलासा तर इथे होतोच; पण राधा-रंगाचे अशा पद्धतीने एक होणे मन हेलावून टाकणारे ठरते. तो प्रसंग, राधा-रंगाची कहाणी नक्की काय, हे तर कादंबरी वाचल्यावरच समजते.
काऱ्हाटीच्या जत्रेवेळची शर्यत काय किंवा मग निंबुतच्या शर्यतीत इंजान-बाज्या आणि चिम्या-बाज्या यांच्यातील शर्यत पाहणे काय, उत्कंठावर्धक वाटते. छग्या-बग्या, इंजान, बाज्या, चिम्या, इंच्या,... अशी कितीतरी नावे संपूर्ण कादंबरीत आपले अस्तित्व मानाने मिरवतात.
अखेर ज्या शर्यतीची आतुरता असते ती शर्यत भेटीस येते; पण इथेही डावपेच बघून हृदयाचे ठोके वाढतात. शिवाची अवस्था पाहून आपसूकच रक्तबंबाळ रंगा आठवतो आणि मनात विचार येतो की 'कर्म फिरून आपल्यापाशी येते...' ते हेच. अखेर पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेला तो डाव पूर्ण होतो. अखेर भैरवनाथाची ती मानाची पालखी वर्षोनुवर्षे आस लागलेल्या ठिकाणी येते. एकूणच काय तर वर्षोनुवर्षे आतुरलेल्या या शर्यतीची इथून एक नवी वाटचाल सुरू होते.
सुरुवातीला जशी शर्यतीशी ओळख करून दिली आहे तसेच शेवटीही बंदीआधीच्या आणि आताच्या शर्यतींबद्दल बरेच काही वाचायला मिळते.
कादंबरीचा विषय शर्यत, काहीसा गावरान म्हणावा असा असल्याने प्रत्येकाला आवडेल असे तर नाही म्हणू शकत; पण वेगळेपणा, गाव, शेती, बैलगाडा शर्यत,.. अशा विषयांच्या शोधात असलेल्या आणि अशा विषयांची आवड असलेल्या वाचकांना ही कादंबरी नक्कीच आवडेल. बैलगाडा शर्यतींचे वेड पाहता शर्यतप्रेमी आवडीने कादंबरी वाचतील हे खरं! गाव, शेती, शर्यंतीचा लेखकाने पुरेपूर अभ्यास केला आहे हे वाचताना लक्षात येते. मला आजोळहून काही शर्यतप्रेमी, बैलगाडा मालक ओळखीचे असल्याने या वेडाची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे वाचताना आणखीनच उत्सुकता वाटली. सुरुवातीची किंवा अधलीमधली काही प्रकरणे शर्यतीबाहेरची जरी वाटत असली, तरी एकमेकांत गुंतलेली नक्कीच आहेत. त्यामुळे थोडा संयम ठेवून पुढची पाने पलटण्याची वाट पाहायला हवी. लहानसहान भावनिक आणि रंजक वळणे वाचकाला कथेसोबत खिळवून ठेवतात. कादंबरीतील प्रकरणांना साजेशी अशी नागेंद्र बाबर यांनी रेखाटलेली उत्तम रेखाचित्रे नजर खिळवून ठेवतात. शर्यत म्हणजे जिंकलो तर उदोउदो नाहीतर नशिबी उद्ध्वस्तपणाही आणणारा नाद समजला जातो. हा विषय हाताळण्याच्या धाडसाचे विशेष कौतुक असेल. शर्यतीची प्रत्येक बाजू समजून घेऊन, ती अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीने वाचकांसमोर मांडणे लेखकाला खूप छान जमले आहे. आवड, माहिती, निरीक्षण, पात्रांची आणि प्रसंगांची सुयोग्य मांडणी कादंबरीला रंजक बनवतात. बरेचसे संदर्भ असूनही किचकटपणा जाणवत नाही, त्यामुळे फक्त या विषयाची आवड असलेल्यांनाच नाही तर विषयाला पहिल्यांदा अनुभवणाऱ्या वाचकालाही हे पुस्तक सोयीचे वाटेल. काही ठिकाणी शब्दचुका जाणवतात; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. कादंबरीतील भाषाषैली, ग्रामीण भाषाशैली, एकूणच साहित्यिक दर्जा आणि छपाई दर्जा खूप छान आहे.
बैलगाडा शर्यत, आयुष्यातील विविधांगी शर्यती, संयम, प्रेम, मैत्री, जिद्द, चिकाटी, इतिहास, वारसा, नातेसंबंध, गाव, शेती,.. असे बरेच काही अनुभवण्यासाठी ही शर्यत एकदा तरी नक्कीच वाचायला हवी.
© कामिनी सुरेश खाने ( कलात्मक पान )
२१ ऑक्टोबर २०२५
२१ ऑक्टोबर २०२५
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
