पुस्तकाचे नाव : स्वामित्व
लेखिका : हेमा पाटील
प्रकाशन : वेलवेट कविशा प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका : हेमा पाटील
प्रकाशन : वेलवेट कविशा प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका हेमा पाटील या प्रामुख्याने ऑनलाईन व्यासपीठांवर लिहिणाऱ्या प्रतिभासंपन्न मराठी लेखिका आहेत. आध्यात्मिक विषयांवर त्यांची विशेष पकड असून कौटुंबिक, गूढ, प्रेम असे विविधांगी लेखनही त्यांनी केलेले आहे.
डोंगररांगा, गवत-रोपांना साथ करणारे नारळाचे झाड, आभाळात गडद छटा पसरवत स्वतःच्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणारा सूर्य आणि या सूर्याच्या प्रतिबिंबाला सामावून घेतलेली शांत नदी, असे हे मुखपृष्ठावरील चित्र दिसायला जसे मोहक भासते तसेच ते एकूणच कथासंग्रहाला व्यक्त करणारेही ठरते. हे निसर्गचित्र कथांमधील शांत, सहज भावही दर्शवते आणि एकप्रकारची गूढताही! आयुष्याशी निगडीत या कथानकांमधील 'मानव' सूर्याच्या जागी पाहिल्यास लक्षात येते की त्याचे सर्वांगीण प्रतिबिंब सर्वच कथानकांमधून वेगवेगळ्या स्वरूपात उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. गडद छटांमध्ये उठून दिसणारे त्याचे अस्तित्व 'तिमिरातून तेजाकडे' या उक्तीला सार्थ ठरणारे वाटते आणि या सर्वांना साथ देते समर्पक असे 'स्वामित्व' शीर्षक!
सुरुवातीलाच असलेली प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांची प्रस्तावना लेखिकेच्या साहित्यिक प्रवासाची आणि सदर कथासंग्रहाची थोडक्यात ओळख करून देणारी ठरते. कथासंग्रहाच्या सर्वच जमेच्या बाजू त्यांनी अगदी चपखल शब्दांत व्यक्त केल्या आहेत. 'लेखिकेची निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांचा संगम या कथांना एक अनोखा बाज देतो.' हे वाक्य मनोमन पटणारे आहे. अर्पणपत्रिका आणि मनोगतातून लेखिकेच्या आपल्या आईप्रति असलेल्या भावनांची जाणीव होते. सर्वतोपरी प्रोत्साहन देणारे सासर, मैत्रपरिवार, लेखक-वाचक विश्व यांचा खास उल्लेख लेखिकेच्या साहित्यिक प्रवासाच्या मार्गाची ओळख करून देणारा ठरतो. पुस्तकातील तसेच मलपृष्ठावरील खास शुभेच्छासंदेश वाचताना कथासंग्रह आणि लेखिकेच्या लेखनशैलीबद्दल जाणून घेण्यास मदत होते.
'स्वामित्व' ही पहिलीच कथा शीर्षकाप्रमाणेच आधिपत्य दर्शवणारी आहे. आता प्रश्न उरतो की हे आधिपत्य नक्की कोणाचे? तर अर्थातच याचे उत्तर ही कथा वाचल्यानंतरच मिळेल. एक प्रवास जो चुकवूनही जातो आणि बरेच काही सुचवूनही. एक असा शक्तीमय प्रवास ज्यात चक्क घड्याळाचे काटेसुद्धा जागीच थांबलेले. या स्वामित्वात एक वेगळेच गूढ आहे, जे नकळत वाचकांच्या मनात फेर धरू लागते.
'बाबा तुस्सी ग्रेट हो...' ही कथा म्हणजे भावनांचा कल्लोळ आणि वास्तवाचे चित्रण करणारी सुरेख कथा. पंकजच्या जागी अनेकजण स्वतःला पाहू शकतात, तर वैदुचे विचार आणि एकूणच वागणूक बघता तिच्या संस्कारांचे अन् विचारसरणीचे कौतुक करावेसे वाटते. लग्न झालेल्या मुलीवरचा आईवडिलांचा हक्क आणि त्या मुलीचं लग्नानंतर बदललेले विश्व या विषयाची गुंफण लेखिकेने अतिशय समर्पक शब्दांत केली आहे. नाती रुजवणे, ती जपणे म्हणजे काय हे या कथेत अनुभवायला मिळते. तर 'प्रेमस्वरूप आई' ही कथा मायलेकीच्या नात्याचे जिवंत चित्रण करणारी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आई आणि माहेर, या शब्दांची किंमत कळालेल्या लेकीची ही हृदयस्पर्शी कथा आहे.
'चांदणं' या कथेत गावच्या वातावरणाची आणि शहरी झगमगाटाची काहीशी ओळखीची बाजू वेगळ्या तऱ्हेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम अशा ग्रामीण भाषाशैलीचा वापर कथानकाच्या जिवंतपणात मोलाची भर घालतो.
आडनिड्या वयातील मित्रांनी केलेले एक साहस, भावनांचा कल्लोळ, काही स्वप्ने, धडपड,... असे बरेच काही दडवून बसलेली ही कथा.
आडनिड्या वयातील मित्रांनी केलेले एक साहस, भावनांचा कल्लोळ, काही स्वप्ने, धडपड,... असे बरेच काही दडवून बसलेली ही कथा.
'लव्हबर्ड्स' म्हणजे बंदिस्त पिंजऱ्यातील आणि एका मोकळ्या पिंजऱ्यातील लव्हबर्ड्सची कथा. यात प्रेमाच्या हव्याहव्याशा गुलाबी छटाही अनुभवायला मिळतात आणि विरहाचा दाहसुद्धा! एका ताटातूटीचे भविष्य नव्याने अस्तित्वात येते, तर एक ताटातूट मात्र वेगळ्या वळणापाशी घेऊन जाते.
'सभा' ही काहीशी वेगळ्या धाटणीची कथा सोनगावातील क्रांती दाखवणारी आहे. जुन्या नव्या पिढ्यांच्या वर्षोनुवर्षे चाललेल्या काही सवयी एका सभेच्या निमित्ताने प्रकाशझोतात येतात. असे म्हणता येईल की या सभेच्या निमित्ताने एका नव्या सामाजिक पर्वाची सुरुवात झालेली असते. आता हा विषय नक्की कोणत्या घटकांभोवती फिरतो हे कथेतच वाचायला हवे.
'परतफेड' कथा वाचताना नकळत मनात कर्माचा सिध्दांत फेर धरू लागतो. कथा कौटुंबिक पार्श्वभूमीची असली, तरी एका हमखास दिसणाऱ्या विषयाला लेखिकेने हात घातला आहे. दोन भिन्न तरीही साम्य दर्शवणाऱ्या परिस्थितींच्या आधारे एका खास नात्याची वीण, त्यामागच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर पुढे 'परमानंद' ही अध्यात्म आणि मानवी स्वभावाची अनोखी सांगड घालून व्यक्त झालेली कथा आहे. अभंग, कीर्तनाद्वारे होणारे समाजप्रबोधन आणि माणसाचे विचार, वर्तन यांचा हा मिलाप विचार करायला लावणारा ठरतो.
'मिस मॅच' ही राघव आणि सरूची कथा खरेतर बरेच काही सांगून जाते. अनाथ असलेला राघव आणि माणसे व संपत्तीची कमी नसूनही एकटी असलेल्या सरूची ही कहाणी. जिला स्वतःच्या जन्मदात्यांनीही कधी माया दाखवली नाही, सतत जिच्या प्रत्येक आवडीनिवडीला कमी लेखले गेले; तिच्या आयुष्यात राघवच्या रूपाने सुखाची नांदी झाली. तिच्या आवडींनीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला कलाटणी दिलेली असते. मग हे कथेचे शीर्षक 'मिस मॅच' का असेल? याचा उलगडा कथा वाचताना होतो.
'कळा या लागल्या जीवा' ही कथा म्हणजे लेखकांची कथा. यातही एक आगळावेगळा लेखक भेटीस येतो. आता हा 'लेखक' की 'हौशी लेखक' याचा खुलासा तर ही हलकीफुलकी मजेशीर कथा वाचल्यानंतरच होईल. मात्र अतिशय मार्मिक शब्दांत लेखिकेने सध्याच्या घडीच्या लेखनावर भाष्य केले आहे असे म्हणता येईल.
'मुक्ती' कथेतून एक महत्त्वाचा सामाजिक विषय मांडला आहे, तो म्हणजे मातृत्व. मात्र या कथेला आहे भूताची जोड! ती कशी, हे तर कथा वाचल्यावरच कळेल. प्रेमाचे बंध, आईवडिलांचे मुलांशी असलेले नाते, संस्कार, हट्टीपणा, समाज,... असे बरेच काही सांगून जाणारी ही कथा आहे हे मात्र खरे. तर 'परकी' ही कथासुद्धा कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात नात्याचे बंध, पैलू कसे टिकवून ठेवले जातात याचा प्रत्यय येतो. कोणतेही नाते हे निःस्वार्थाने, आपलेपणाची भावना मनात ठेवून निभावले गेले पाहिजे हे सांगणारी ही सुरेख कथा आहे.
सर्वात शेवटी 'निःसंग' या कथेत शीर्षकाच्या अगदी विरुद्ध गोष्टी वाचायला मिळतात. स्त्री-पुरुष, नवरा-बायको, नर-मादी, संसार,... असे काही मुद्दे असलेल्या या कथेत एकटेपणा तो नक्की कसला? याचा उलगडा ही लहानशी पण उद्बोधक कथा वाचताना होतो.
या कथासंग्रहाच्या निमित्ताने अतिशय सहजसोप्या भाषेतील उत्तम दर्जाचे साहित्य वाचायला मिळते. लेखिकेच्या ओघवत्या भाषाशैली आणि मांडणीमुळे कथा वाचताना कुठेही क्लिष्टता जाणवत नाही. कथानुरूप भाषा सुयोग्य वळणे घेत जाते. आध्यात्मिक विषयात भाषेचा शांत भाव दर्शवणारा रसाळपणा समोर येतो, तर कौटुंबिक विषयांसोबत भावनांचा कल्लोळ दाखवणारे हृदयस्पर्शी शब्दांकन. सामाजिक पार्श्वभूमी एकप्रकारची परखडताही घेऊन येते अन् प्रबोधनही! प्रत्येक कथा ही नानाविध भावनांचा मिलाप आहे. यानिमित्ताने प्रेम, विरह, रहस्य, गूढ, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक,... आयुष्यातील असे विविधांगी पैलू रंजक पद्धतीने वाचायला मिळतात. मुद्देसूद मांडणी ही लेखिकेच्या लेखनशैलीची आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल. नव्या-जुन्या पिढ्या न कंटाळता वाचू शकतील असे रंजक, उद्बोधक विषय लेखिकेने उत्तमरीत्या हाताळले आहेत. वास्तववादी पात्रांचे चित्रण, मनाला स्पर्शून जाणारे वैविध्यपूर्ण लेखन हाताळणे लेखिकेला छान जमले आहे असे म्हणता येईल. पुस्तकात काही तुरळक शब्दचुका आहेत; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही विषय, मांडणी, सहजसोपी तरीही मनाचा ठाव घेणारी भाषाशैली, अशा अनेक गोष्टींमुळे वाचकांना प्रगल्भ लेखनाची मेजवानी मिळते. एकूणच या पुस्तकाचा छपाई दर्जा आणि साहित्यिक दर्जा उत्तम आहे.
असा हा अध्यात्म, नातेसंबंध, स्त्रीविषयक, प्रेम, भय, प्रबोधन, मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारा सुरेख कथासंग्रह नक्की वाचून पहा.
© कामिनी सुरेश खाने ( कलात्मक पान )
१३ जानेवारी २०२६
१३ जानेवारी २०२६
पुस्तकासाठी संपर्क : 9011034253
