Login

गुरुची शिकवण (बोधकथा)

मराठी बोधकथा
पूर्वीच्या काळी शिक्षणासाठी शिष्य गुरूच्या आश्रमात राहत असत. गुरू अधे-मध्ये काही शिष्यांना घेऊन तिर्थाटनासाठी जात असत. असेच एकदा एक गुरु त्यांच्या काही शिष्याच्या समूहाबरोबर तिर्थाटनाला निघाले होते. त्याकाळी आजच्या सारख्या दळणवळणाच्या सोयी सुविधा नव्हत्या त्यामुळे मजल दर मजल करत पायीच प्रवास केला जात असे. गावोगावी धर्मशाळांमध्ये मुक्काम केला जात असे.

असेच ते गुरू त्यांच्या शिष्यांना घेऊन एका गावात पोहोचले. ते एका धर्मशाळेत पोहोचले. भिक्षा मागून जे मिळेल ते ग्रहण करणे हा त्यांचा नियम होता. त्यानुसार त्यांनी शिष्यांना भिक्षा मागायला पाठवलं. शिष्य गावात विखुरले.

त्यातच दोन शिष्य होते एकाच नाव होते विवेक आणि दुसऱ्याचे संतोष ते असेच एका दुकानासमोर येऊन उभे राहिले. ते दुकान मदिरा( दारूचे) आहे हे त्यांना माहीत नव्हत.त्यातला एक शिष्य झोळी पुढे करून म्हणाला.

“ भिक्षाम देही.”संतोष पुढे होत म्हणाला

तो दुकानदार मात्र तिरसट होता. तो बाहेर आला.

“ निघा इथून आले तोंड घेऊन भीक मागायला.” दुकानदार त्यांच्यावर खेकसला.

विवेक आणि संतोष निराश होऊन निघाले. त्यांच्या अंगावर असलेली भगवी वस्त्र आणि एकूण त्यांचा वेष पाहून त्या दुकानदाराच्या मनात काय आले काय माहित त्याने त्या दोघांना थांबवलं.

“ थांबा थांबा तुम्हाला भिक्षा देतो.”तो म्हणाला आणि आत गेला. दोन्ही शिष्य थांबले.

दुकानदार एका मडक्यात मदिरा घेऊन आला.

“ घ्या भिक्षा.” तो मडके पुढे करत म्हणाला.

“ नाही नाही आम्ही मदिरा नाही घेऊ शकत आम्ही निघतो.” विवेक म्हणाला.

“ असं कसं ज्याच्या जवळ जे असेल तो तेच भिक्षा म्हणून देत असतो आणि तुम्हाला ते नाकारता येणार नाही.” दुकानदार म्हणाला.

“ ठीक आहे द्या.” संतोष पुढे येऊन त्याचे पात्र पुढं करत म्हणाला आणि दुकानदाराने त्याच्या पात्रात मदिरा ओतली.दोन्ही शिष्य पुढे निघाले.

“ तू मदिरा का घेतलीस? उद्या गुरूंना कळलं तर गहजब होईल.” विवेक घाबरत म्हणाला.

“ काही होणार नाही. तो दुकनदार म्हणाला ते बरोबरच आहे ना ज्याच्या जवळ जे असेल ते तो भिक्षा म्हणून देणार आणि आपण भिक्षा नाकारु शकत नाही. आणि आपण ही मदिरा इथेच ग्रहण केली तर गुरूंना काय कळणार आहे?” संतोष जरा बेफिकीर होत म्हणाला.

दोघांनी तिथेच एका कोपऱ्यावर उभं राहून मदिरापाण केलं आणि दोघेही आश्रमात परत आले. गुरूंच्या दोघांना ही पाहता क्षणीच लक्षात आलं की दोघांनी मदिरा घेतली आहे पण ते काहीच बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशी ही संतोष विवेकला घेऊन त्याच दारूच्या दुकानासमोर गेला.पुन्हा दुकानदाराने त्यांना मदिरा दिली दोघांनीही ती ग्रहण केली.

चार पाच दिवसात त्यांना दारूची चटक लागली. एक दिवस एका शिष्याने त्यांना दुकानदाराकडून मदिरा घेऊन पिताना पाहिलं.सगळे आणलेली भिक्षा घेऊन जेवायला बसले. तोच एक शिष्य उभा राहिला.

शिष्य,“ गुरुजी हा संतोष आणि विवेक दारूच्या दुकानातून मदिरा घेतात आणि ती पितात. मी आज त्यांना तसं करताना पाहिलं.”

,“ गुरुजी आम्ही त्या दुकानासमोर भिक्षा मागायला जातो. तो दुकानदार आम्हाला भिक्षा म्हणून मदिरा देतो.तुमचीच शिकवण आहे ना की ज्याच्या जवळ जे असेल ते तो भिक्षेत देतो. ते आपण न नाकारता ग्रहण करायचं म्हणून मग त्या दुकानदाराकडे मदिरा आहे आणि तो आम्हाला भिक्षेत ती देतो. ती आम्ही भिक्षा म्हणून ग्रहण करतो. मग आमचे यात काय चुकलं?” संतोष उठून उभा राहत म्हणाला.

“ हो तुमचे काहीच चुकलं नाही. दुकानदार तुम्हाला भिक्षा देतो आणि तुम्ही ती ग्रहण करता.” गुरुजी शांतपणे म्हणाले आणि सगळे शिष्य मात्र त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

संतोष आणि विवेक मात्र गुरुजींचे बोलणे ऐकून खुश झाले. दुसऱ्या दिवशी मात्र गुरुजींनी मुक्काम हलवला. सकाळी सगळे पुन्हा प्रवासाला निघाले होते. दुसरे गाव बरेच लांब होते. तिथे पोहोचे पर्यंत दुपार टळून गेली. सगळ्यांना आता चालून चांगलीच भूक लागली होती. सगळे दमले देखिल होते. गुरुजींच्या ही ते लक्षात आले होते.

“ आपण आधी भिक्षा मागू इथे मंदिर आहे तिथे बसून ती खाऊ मग आपल्या राहण्याची व्यवस्था कुठे होते का ते पाहू” गुरुजी म्हणाली.

सगळे गावात विखुरले. गुरुजी मात्र संतोष, विवेक आणि आणखीन दोन शिष्यांबरोबर भिक्षा मागायला निघाले. सगळे भिक्षा मागत मागत एका लोहाराच्या घरासमोर आले. लोहार आणि त्याच्या बायकोचे नुकतेच कडाक्याचे भांडण झालं होतं. त्यामुळे लोहार प्रचंड रागात होता. तो भट्टीसमोर बसून शिसे वितळत होता. गुरुजी त्याच्या समोर गेले.

“ भिक्षाम देही” ते म्हणाले.

“ ये बाबा जा.” लोहार वैतागून म्हणाला. तरी गुरुजी तिथेच उभे होते ते पुन्हा म्हणाले.

“ भिक्षाम देही.”

“ ये बाबा आधीच माझं डोकं फिरलं आहे तू नको अजून फिरवू जा तू.” लोहार आता चिडून म्हणाला.

“ गुरुजी हा आपल्याला भिक्षा नाही देणार आपण पुढे जाऊयात.” विवेक म्हणाला.

“ नाही मला यांच्याकडूनच भिक्षा हवी. भिक्षाम देही.” गुरुजी पुन्हा म्हणाले.

लोहार मात्र आता चांगलाच चिडला. त्याने भट्टीत उकळत ठेवलेला शिशासा रसाचे पात्र तिथेच असलेल्या एका चिमट्याने धरलं आणि तो तावातावाने पुढे आला सगळे शिष्य घाबरून दोन पावलं मागे सरकले. पण गुरुजी तिथेच उभे होते.

“ तुला भिक्षाच हवी ना मग हा घे शिशाचा रस. माझ्याकडं सध्या तुला द्यायला हेच आहे.” तो तावातावाने चिमट्याने धरलेलं पात्र पुढे करत बोलत होता.

“ संतोष आपल्या पात्रात हा शिशाचा रस घे. आणि आपण सगळे तो इथेच ग्रहण करू.” गुरुजी म्हणाले.

सगळे शिष्य गुरुजींचे बोलणे ऐकून चांगलेच घाबरले. हा शिशाचा रस पिला तर मृत्यू अटळ आहे आणि गुरुजी असं का म्हणत आहेत आज? सगळ्यांना प्रश्न पडला.

” संतोष ये ना घे तो रस.” गुरुजी पुन्हा म्हणाले.

“ गुरुजी. अहो हा माणूस आपल्याला उकळता शिशाचा रस देत आहे भिक्षा म्हणून. तो आपण ग्रहण केला तर आपण सगळे मृत्युमुखी पडू.” संतोष हिंमत करून म्हणाला.

“ आरे पण ती भिक्षा आहे आणि त्याच्याकडे सध्या आपल्याला द्यायला हा रसच आहे. आपण तो ग्रहण करायला नको का? तुम्ही दोघांनी नाही का मागच्या गावात याच नियमाप्रमाणे भिक्षा म्हणून दिलेली मदिरा ग्रहण केली. तोच नियम इथेही लागू होतो ना? मग आपण ही भिक्षा कशी नाकारणार? चल विवेक घे तो शिशाचा रस.”

गुरुजी शांतपणे बोलत होते आणि संतोष आणि विवेकच्या लक्षात त्यांची चूक आली. त्यांनी गुरुजींचे पाय धरले.

“ आम्हाला माफ करा गुरुजी आम्ही चुकलो आहोत.आम्ही पुन्हा असं कधीच वागणार नाही.” दोघे ही म्हणाले.

“ तुम्ही दोघे ज्या दिवशी पहिल्यांदा मदिरा पिऊन आला होता त्याच दिवशी मला ते कळलं होतं. तुम्ही पुढे काय करता हे मला पहायचं होतं. पण मी काही बोलत नाही म्हणल्यावर तुम्ही निर्ढावलात. आपल्यातल्या एकाने तुम्हाला मदिरापाण करताना पाहिलं आणि तक्रार केली तर संतोष तू माझीच शिकवण चुकीच्या पद्धतीने मला सांगून युक्तिवाद केलास. पण मी तुमचा गुरू आहे हे तुम्ही विसरलात. मी तुम्हा दोघांना नुसता उपदेश केला असता तर ते तुम्हाला कदाचित पटलं नसतं म्हणून आज मी तुम्हाला अशा प्रकारे धडा शिकवला.

आपण घरोघरी भिक्षा मागतो आणि तीच ग्रहण करतो. पण समोरचा तुम्हाला चुकेची पदार्थ देत असेल तर तो त्याचा धर्म आहे पण तुम्ही तो पदार्थ घ्यायचा की नाही तो ग्रहण करायचा की नाही हा आपला धर्म आहे. या लोहाराने आपल्याला भिक्षा म्हणून उकळत्या शिशाचा रस दिला पण तुम्ही तो घेतला का? मग तुम्ही मदिरा कशी घेतली? माणसाने आपल्याला जे पचेल आणि रुचेल तेच ग्रहण करायला हवे. इतकं ही तुम्हाला कळत नाही का?” गुरूजी शांतपणे बोलत होते.

आणि संतोष आणि विवेकला त्यांची चूक कळली होती तसेच बाकी शिष्यांना ही एक धडा मिळाला होता.

स्वामिनी चौगुले