Login

अनोळखी दिशा..(भाग ६)

एक अनोखी प्रेमकहाणी.
मागील भागात आपण पाहिले की, हर्षने असे कोणालाही न विचारता नेत्राला घरी आणलेले त्याच्या काकीला मात्र अजिबात आवडले नाही. त्यात घरचेदेखील त्याला कोणी काहीच बोलले नाही. उलट आपल्या मुलाची इतरांप्रती मदतीची भावना पाहून सर्वचजण भारावले. त्यामुळेच निलम काकीने खूप सुनावले सर्वांना.आता पाहुयात पुढे...

बाहेर काय गोंधळ चाललाय, हे मात्र हर्षिता आणि नेत्राला माहीत नव्हते. जेवण आटोपून त्या दोघीही झोपायच्याच तयारीत होत्या. नेत्राचे विचारचक्र मात्र पुन्हा एकदा तिच्या डोक्यात थैमान घालू लागले.

गप्पा मारता मारता हर्षिता केव्हा झोपी गेली हे नेत्राला समजले देखील नाही. तिचे तर हर्षिताच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. ती आपली मनाच्या खोल डोहात दडलेल्या असंख्य प्रश्नांची उकल करण्यात गुंतली होती. डोळे बंद करुन विचारांचा गुंता ती सोडवू पाहत होती.

"किती साधी माणसं आहेत ही. त्यांच्या चांगुलपणाचा आपण फायदा तर घेत नाहीत ना?" नेत्राचे मन नेत्राला खात होते. असंख्य प्रश्नांच्या गर्दीत कुठेतरी ते हरवून गेले होते.

प्रयत्न करुनही नेत्राला झोप काही लागेना. डोळे बंद करताच त्या हैवानाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर उभा राहत होता. त्याची ती घाणेरडी नजर, क्रूर हास्य तिच्या अंतरंगाला आणखीच जखमा देत
होते.

तितक्यात मनातील वेदनेची कळ मेंदूपर्यंत गेली नि खडबडून ती जागी झाली. तिची विचारांची तंद्री भंग पावली. तिचे सर्वांग घामाने डबडबले होते. कसेबसे मनाला समजावत ती उठली आणि खिडकीजवळ गेली. बाहेरची नीरव शांतता तिला आकर्षित करत होती. इतक्यात खाली बंगल्यासमोरच्या बागेतील झोपाळ्यावर तिला हर्ष दिसला.

'इतक्या उशिरा हा काय करत आहे तिकडे? काय सुरु असेल त्याच्या मनात? हीच खरी वेळ आहे हर्षसोबत बोलण्याची.'

मनात विचार आला नि ती तडक बाहेर जाण्यासाठी निघाली. नवीन ठिकाणी तिला कशाचाही अंदाज येईना ,पण हर्षसोबत बोलणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यासाठी बाहेर तर जावेच लागणार होते.

हिंमत करुन अगदी सावकाश आवाज होऊ न देता तिने अलगद रुमचा दरवाजा उघडला. जिना उतरुन ती खाली हॉलमध्ये आली. सगळेचजण झोपले होते. अगदी सावकाश मेन डोअर उघडून ती बंगल्याचा बाहेर आली. समोर झोपाळ्यावर हर्ष बसला होता. कसल्या तरी विचारांत तो खोलवर गुंतला होता. नेत्रा त्याच्या समोर येऊन उभी राहिली, हेही त्याच्या लक्षात आले नाही.

"हर्ष...हर्ष!" दोनदा नेत्राने त्याला आवाज दिला. तेव्हा कुठे त्याची तंद्री भंग पावली.

"अरे! नेत्रा! तू इथे! ह्यावेळी? झोपली नाहीस अजून?"

"झोप लागेना म्हणून खिडकीत आले तर खाली तुम्ही दिसलात. म्हणून मग म्हटलं तुम्हाला कंपनी द्यावी." हलकेच स्माइल करत नेत्रा उत्तरली.

"मला कंपनी द्यायची असेल तर आधी अहो जाहो करणं बंद करावं लागेल तुला. बघ हे जमत असेल तरच थांब, नाहीतर झोप जाऊन." लटक्या रागातच हर्ष बोलला.

"अच्छा! तसा प्रयत्न नक्की करेल मी." हसतच नेत्रा बोलली.

"काय ग जेवण केलं ना तू व्यवस्थित?"

"हो" नेत्राने होकारार्थी मान डोलावली.

"अगं! हर्षुचा ड्रेस तर एकदम परफेक्ट होतोय ग तुला."

"हो ना, तुमची बहिण खूपच गोड आहे पण. अगदी तुमच्यासारखी. मनापासून काळजी घेतली तिने माझी?"

लटक्या रागातच हर्षने नेत्राकडे पाहिले.

"सॉरी! सॉरी! तुमची नाही, तुझी बहिण." त्याच्या रागाने पाहण्याचे कारण लगेचच नेत्राच्या लक्षात आले आणि तिने त्वरीत तिचे वाक्य बदलले.

हर्षलाही मग हसू आले.

"एवढ्या उशिरा तू असा बाहेर काय करतोस पण? झोप नाही का येत?"

"नाही अगं. झोप नाही आली की मी इथे येऊन बसतो. रात्रीच्या या शांततेत मन अगदी फ्रेश होऊन जातं."

"मग झालं का मन फ्रेश?" अजूनही तो टेन्शनमध्ये असल्याचे पाहून नेत्राने मुद्दामच असा उलट प्रश्न केला.

"हो." नजर चोरतच तो उत्तरला.

"नको लपवूस, बोल! कसलं टेन्शन आलंय तुला?

"जाऊ दे गं, ते नाही एवढं महत्त्वाचं. तू बोल! काही बोलायचे होते का तुला माझ्याशी?"

"हो म्हणजे खरं तर त्यासाठीच मी बाहेर आले होते." खाली मान घालत नेत्रा उत्तरली.

"बोल ना मग. तू आधी बसतेस का इथे?"

"नाही! नको, बस तू." असं डायरेक्ट त्याच्या शेजारी बसताना तिला ऑक्युअर्ड फील होत होतं. म्हणून तिने स्पष्ट नकार दिला.

"बरं बाई! मी उठतो, तू बस इथे." त्यालाही जणू तिच्या मनाची घालमेल त्वरीत समजली.

"बरं! एक काम करुयात, आपण त्या चेअरवर बसुयात. म्हणजे दोघांनाही अवघडल्यासारखे नाही होणार.

दोघेही मग बागेतील चेअरवर जाऊन बसले.

"बोल आता? काही प्रॉब्लेम आहे का?"

"आहे नाही रे. पण खूप मोठा प्रॉब्लेम झालाय माझ्यासोबत. कसं सांगू तेच कळेना झालंय? काही गोष्टी आता जरी मी लपवल्या तरी कधी ना कधी त्या समोर येतीलच. तेव्हा मात्र प्रॉब्लेम आणखीच वाढतील. मला नवं आयुष्य दिलंय तू. त्यामुळे तुझ्यापासून नाही काही लपवायचे मला. इतक्या विश्वासाने तू मला तुझ्या घरी घेऊन आलास. तेही घरच्यांच्या परवानगी शिवाय. चुकीचे आहे रे हे,पण तरीही तू मला आधार दिलास. मग मीही तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही असे माझे मन मला सांगत आहे."

"निःसंकोचपणे बोल. कुठलीही मदत लागली तर मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा असेल हे ध्यानात ठेव."

हर्षचे हे असे आधराचे बोलणे ऐकून नकळतपणे नेत्राचे डोळे पाणावले.

"काय ग! काही प्रॉब्लेम आहे का? प्लीज मोकळेपणाने बोल माझ्याशी."

"हर्ष उगीच तू मला वाचवलंस रे? तेव्हाच जर मरण आले असते तर मग सगळेच प्रश्न सुटले असते." बोलता बोलता नेत्रा त्या दिवशीचा प्रसंग आठवून पुन्हा शहारली.

"हे बघ! मी आधीच सांगितले आहे तुला, मी नाही तर, तू मला वाचवलंय. कसं! ते नको विचारु. पण तू तरी कुठे सांगितले आहेस, तू इतका टोकाचा निर्णय का घेतला ते?

काही क्षण ती शांतच बसली आणि एक मोठा उसासा टाकत ती बोलू लागली.

"काल पोलिस ज्या तरुणीची चौकशी करत तिकडे पोहोचले होते ती दुसरी तिसरी कोणी नसून मी होते हर्ष." बोलता बोलता तिचे डोळे पुन्हा पाणावले.

"काय...??" नेत्राच्या तोंडचे वाक्य ऐकून हर्षच्या पायाखालची जमीनच सरकली. ताडकन तो उठून उभा राहिला.

"म्हणजे! खरंच काल तुझ्यामागे गुंड लागले होते?" अत्यंत भावूक स्वरात हर्षने प्रश्न केला.

"हो.." डोळ्यांतील आसवे अलगद टिपत नेत्रा उत्तरली.

पुढे काय झाले असेल याची आपसूकच हर्षला कल्पना आली.

'हिच्यासोबत नक्कीच वाईट प्रकार घडलेला आहे आणि म्हणूनच ही आत्महत्या करायला निघाली होती तर. मी पण किती मूर्ख आहे, पोलिसांनी एवढे विचारले तरी माझ्या कसे काय लक्षात नाही आले. आधी माहीत असतं तर...पण अजूनही वेळ गेलेली नाही. हिला हवी ती मदत मला करायला पाहिजे.'

हर्षच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. स्वतःचे दुःख बाजूला सारून तो नेत्राचे दुःख हलके करत होता. आता तर त्याला स्वतः पेक्षाही नेत्राचे दुःख कैकपटीने मोठे वाटू लागले होते.

"अगं! किती त्रास सहन केलास तू नेत्रा. शब्दानेही बोलली नाहीस. तू ओळखतेस का त्याला?"

"त्याला मी कशी विसरेल?"

"अगं! मग मगाशीच तू पोलिसांना सर्व सत्य सांगून टाकायला हवे होतेस.?"

"इतकं सोपं आहे का ते? अरे एखाद्या स्रीसाठी तिची अब्रू म्हणजे तिचा दागिना असतो. असे असताना तिच्या दागिन्यालाच जर कोणी हात घातला तर समाज तिच्यापाठी भक्कमपणे उभे रहायचे सोडून तिलाच दोषी ठरवून मोकळा होतो. तिलाच पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते."

"एवढ्या रात्री तिला बाहेर जायची मग गरजच काय होती? तिने असेच कपडे का घातले नि तसेच का घातले? अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिला तीच कशी चुकीची आहे, हे दाखवून दिले जाते. पण, त्याला दोषी म्हणणारे तुलनेने कमीच सापडतील. मग तूच सांग हर्ष, तिने मृत्यूला जवळ करणे हाच उत्तम पर्याय नाही का? जो की मी सुद्धा निवडला होता."

"अजिबात नाही. मृत्यू हा पर्याय असूच शकत नाही यावर. गुन्हा त्याने करायचा आणि शिक्षा मात्र तू का भोगायची? आणि तेही आजन्म."

हर्ष नेत्राचे मनोबल वाढवत होता पण त्याचेच मन त्याला खात होते. 'मी हीचे मनोबल वाढवत आहे खरं, पण मी खरंच त्या योग्य आहे का? इथे माझेच प्रॉब्लेम मला सोडवता येईनात. मग हिचे प्रॉब्लेम मी काय सोडवणार?'

क्षणभर तो विचारांत गुंतला. नेत्राला मात्र त्याच्या शब्दांमुळे वेगळेच बळ मिळाले होते.

"बरं मला एक सांग, ती व्यक्ती नेमकी कोण होती? तू ओळखतेस म्हणाली ना त्याला?"

"हो.. चांगलीच ओळखते! दोन तीन महिन्यांपुर्वी माझ्या सावत्र मामाने त्याचे स्थळ आणले होते माझ्यासाठी. पण त्या फालतू, व्यसनी आणि बेजबाबदार माणसाला मी स्पष्ट नकार दिला. त्याचाच त्याने आज बदला घेतला. आईला मात्र मी त्याला होकार द्यावा असे मनोमन वाटत होते. इतर चांगल्या चांगल्या स्थळांना मात्र ती स्वतः नकार देऊन मोकळी व्हायची. तिचे वागणे माझ्याही समजण्याच्या पलिकडे होते."

तितक्यात, हर्ष आणि नेत्रा दोघेही गप्पा मारत असताना नेमके निलम काकीने पाहिले. आधीच नेत्राला घरात घेऊन येण्यावर आक्षेप घेणारी ती आता या दोघांना असे एकत्र पाहून आणखीच बिथरली.

क्रमशः

आता निलम काकी शांत बसेल का? काय असेल तिचे पुढचे पाऊल? हर्ष करु शकेल का नेत्राला मदत? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर
0

🎭 Series Post

View all