मागील भागात आपण पाहिले की घरात सर्वजण नेत्राचे आणि नेत्राने बनवलेल्या चहा तसेच स्वयंपाकाचे कौतुक करत होते. हे सर्व निलम काकीला टोमणे मारत आहेत असा तिने
समज करुन घेत सवयीप्रमाणे तिने घरच्यांसोबत हुज्जत घातली आणि तिथून ती निघून गेली. आता पाहुयात पुढे...
समज करुन घेत सवयीप्रमाणे तिने घरच्यांसोबत हुज्जत घातली आणि तिथून ती निघून गेली. आता पाहुयात पुढे...
"हर्षु! कशाला उगीच तिच्या नादी लागतेस? ती कशी गरम डोक्याची आहे माहिती आहे ना तुला?" नयना ताई लेकीला समजावणीच्या सुरात बोलल्या.
"आरडाओरडा करुन आपलं म्हणणं इतरांवर लादल्याने ते खरं होत नाही. ते तिनेही ध्यानात ठेवावं ना आई. उठसूठ इतरांचा अपमान करायची एक संधी सोडत नाही. समोरच्याला काय वाटेल याचा जराही विचार करत नाही. घरात काम कमी आणि मनमानीच जास्त करत असते. हे असे वागणे काय कामाचे? नेत्रा घरात आल्यापासून मी पाहतिये, सारखी तिच्यामागे हात धुऊन लागलेली असते. तिला घराबाहेर काढण्याचे मनसुबे आखत असते. सुपर्णाच्या वेळीही ती हेच करत होती. पण, तुम्ही सगळे तिच्या चुकांकडे नेहमी कानाडोळा करत आलात. कारण एकच फक्त घरात शांतता नांदावी. अगं आई! पण असा प्रामाणिक विचार कधीतरी तिनेही करावा ना."
"बस झालं हर्षु! तू जिच्याबद्दल बोलतिये ना, ती तुझी काकी आहे आणि जरा वयाचं पण भाग ठेऊन बोल. नको त्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा अभ्यासात लक्ष घातले तर ते तुझ्यासाठीच फायद्याचे असेल." महेश काकांना आपल्या बायकोबद्दल हर्षुने हे असे काही बोललेले अजिबात आवडले नाही. म्हणून त्यांनी तिला मध्येच टोकले.
"अरे बापरे! कुठे होता हा वाघ आतापर्यंत? तिला सांगण्यापेक्षा जरा तुझ्या बायकोला चार गोष्टी समजावल्या तर ते तिच्यासाठी आणि घरासाठीदेखील फायद्याचंच ठरेल ना महेश?" आजीने हर्षुची बाजू घेत महेश काकालाच त्याची चूक दाखवून दिली.
आजीपुढे बोलण्याची मात्र त्यांची हिंमतच झाली नाही. शांतपणे ते त्यांच्या रुममध्ये निघून गेले.
'खरंच हर्षु म्हणते तसं सुपर्णाला घरात येवू न देण्यामागे निलमचा तर हात नाही? हिच्या सांगण्यावरुन सुपर्णाने हर्षसोबत लग्नाला नकार तर दिला नसेल? हर्षुच्या त्या एका वाक्याने नयना ताईंचे विचारचक्र मात्र तीनशे साठ अंशात झटकन फिरले.
परंतु, आता त्या विषयावर जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नव्हता.
रात्रीची जेवणं आटोपून जे ते आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले.
दोन तीन दिवसांतच नेत्रा इनामदारांच्या घरात छान रुळली. अधूनमधून घडलेला प्रसंग आठवला की आतून खूप तुटल्यासारखे वाटायचे तिला. पण आजूबाजूला जीव लावणारी माणसंही होती. त्यामुळे तिच्या दुःखाचा तिला विसर पडत असे.
रात्रीच्या नीरव शांततेत नेत्रा घरच्या विचारांनी हळवी झाली.
'आज तीन दिवस झाले मी घरापासून लांब आहे. सावत्र असली म्हणून काय झालं? पण आईला, मामाला एकदाही माझा शोध घ्यावासा वाटला नसेल का? मी मेले की जिवंत आहे? हेही त्यांना ठाऊक नाही. पण लग्नाच्या वयाची पोर घरातून अचानक गायब होते आणि तिला शोधण्याचा साधा प्रयत्नही केला जात नाही. खरंच आई वडिलांनंतर आपलं असं या जगात कोणीही नसतं.'
विचार करता करता नेत्रा भूतकाळात रमली नि क्षणभर तिचे डोळे पाणावले.
विचार करता करता नेत्रा भूतकाळात रमली नि क्षणभर तिचे डोळे पाणावले.
दुसऱ्या दिवशी हर्षने नेत्राला त्यांच्या कंपनीत छोटीशी नोकरी देण्याचा प्रस्ताव माधवरावांसमोर मांडला. त्यांनीही तो लगेचच मान्य केला. महेश काका आणि निलम काकी सोडून घरातील सर्वांनीच हर्षच्या या निर्णयाचे स्वागत केले. महेश काकांचा देखील जास्त काही प्रश्न नव्हता पण निलम काकीमुळे त्यांचा देखील नेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता.
नवीन नोकरीमुळे नेत्रालादेखील मनातून खूपच आनंद झाला. तसा कामाचा अनुभव होताच तिच्या गाठीशी. तिही उत्सुक होतीच.
त्याच दिवशी नेत्रा हर्ष आणि माधवरावांसोबत त्यांच्या कंपनीत गेली.
"थँक्यू सो मच हर्ष. खूप उपकार आहेत रे तुझे माझ्यावर. खरंच मी आयुष्यभर तुझे उपकार नाही विसरणार. म्हणजे फक्त तुझेच नाही तर तुमच्या संपूर्ण फॅमिलीचे." अगदी प्रांजळपणे नेत्रा म्हणाली.
"आज मी जे करतोय ते जर तुला उपकार वाटत असतील तर मग तू तर माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर त्यापेक्षाही जास्त उपकार केलेत. हे मीही आयुष्यभर नाही विसरणार नेत्रा."
हर्षचे हे वारंवार येणारे कोड्यातले बोलणे नेत्राला मात्र विचार करायला भाग पाडत होते.
हर्षच्या बोलण्यावर नेत्रा विचारांत पडली. तेवढयात तिला माधवरावांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तिच्या आवडी निवडीचा त्यांनी अगोदर अंदाज घेतला.
कंपनीतील कामाची माहिती हर्षने मग तिला समजावून सांगितली. कंपनीतील इम्पोर्ट केलेल्या रॉ मटेरियल्सच्या डेली अपडेशनची जबाबदारी नेत्रावर सोपवण्यात आली. अर्थातच हर्ष आणि इतर लोक होतेच मदतीला.
नेत्राची कामाची आवड आणि तत्परता यामुळे आठच दिवसांत तिने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. तिची जबाबदारी ती उत्तमरीत्या पार पाडत होती. सगळेचजण तिच्या कामावर खुश होते. घरात तर आता रोजच तिचे कौतुक होऊ लागले. तिलाही मनातून खूपच आनंद व्हायचा मग.
बघता बघता महिना होत आला. नेत्राच्या कामात आता बऱ्यापैकी सफाईदारपणा आला होता.
दिवसागणिक नेत्रा आणि हर्षमधील मैत्रीदेखील वाढत होती. नेत्राच्या कामातील सफाईदारपणा हर्षला मात्र जास्तच भावला होता.
एकीकडे हर्षच्या मनात सुपर्णाबद्दल राग तर दुसरीकडे नेत्राचे सतत त्याच्या अवतीभोवती असणे त्याला मनातून कुठेतरी आवडू लागले होते. त्यालाही आता तिची जणू सवयच होत चालली होती. एकमेकांचे मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण झाले होते दोघेही. मैत्रीचे नाते दिवसागणिक दृढ होत होते.
अनोळखी दिशा आता एक होवून एकाच मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी जणू मनोमन इच्छुक होत्या. पण दोघांचाही भूतकाळ त्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या आड येऊ पाहत होता.
'खरं तर तू आधी भेटायला हवा होतास रे हर्ष मला. खूप उशीर झाला तुला माझ्या आयुष्यात यायला. तुझी आणि माझी कधीच बरोबरी होऊ शकत नाही, हे कळतंय पण वळत नाही रे. तुझं असं सतत सोबत असणं मनाला वेगळाच आनंद देऊन जातं. तुझे रुबाबदार व्यक्तिमत्त्व डोळ्यांत किती साठवू आणि किती नको असं होऊन जातं कधीकधी. पण मला आता तोही अधिकार नाही.'
रात्रीच्या अंधारात बंद पापणीपल्याड हर्षचाच विचार सुरू होता नेत्राच्या मनात. प्रयत्न करूनही तिला झोप काही लागेना.
तिकडे हर्षचीदेखील काही वेगळी अवस्था नव्हती. नेत्राचा चेहरा काही केल्या त्याच्या डोळ्यासमोरून हटायलाच तयार नव्हता आणि सुपर्णासोबतच्या प्रत्येक आठवणीला मुळासकट उपटून काढण्याचा तो मनापासून प्रयत्न करत होता.
'नेमकं काय होतंय मला असं? जी व्यक्ती आयुष्यात यावी असं मनापासून सतत वाटत होतं ती मात्र क्षणात साऱ्या स्वप्नावर पाणी फिरवून निघून गेली. तर जी व्यक्ती ध्यानी मनी नसतानाही आयुष्यात येते आणि हळूहळू मनात घर करते.
आता पुन्हा एकदा त्याच वाटेवर मन का धावू पाहतंय? नेत्रा आणि माझं नातं मैत्रीच्या पलिकडे तर नाही ना जात? पण प्रेम तर एकदाच होतं, असं मी ऐकलंय. मग काय सुरू आहे हे सगळं? नेत्राची सोबत का मला हवीहवीशी वाटत आहे? तिचं सतत अवतीभोवती असणं मनाला वेगळंच समाधान देऊन जातं.'
हर्षच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. विचार करता करताच तो झोपी गेेला.
आता पुन्हा एकदा त्याच वाटेवर मन का धावू पाहतंय? नेत्रा आणि माझं नातं मैत्रीच्या पलिकडे तर नाही ना जात? पण प्रेम तर एकदाच होतं, असं मी ऐकलंय. मग काय सुरू आहे हे सगळं? नेत्राची सोबत का मला हवीहवीशी वाटत आहे? तिचं सतत अवतीभोवती असणं मनाला वेगळंच समाधान देऊन जातं.'
हर्षच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. विचार करता करताच तो झोपी गेेला.
एके दिवशी नेत्राच्या आईला नेत्रा सदाशिवराव इनामदारांच्या घरी राहते आणि त्यांच्याच कंपनीत कामाला जाते, याची कुणकुण लागली. अर्थातच नेत्राच्या मामाला आधी नेत्राबद्दल समजले तेव्हा त्यांनीच तिची संपूर्ण माहिती काढली.
नेत्राच्या सावत्र मामाची एक जवळची व्यक्ती काही सामान घेऊन एक दिवस कंपनीत गेली असताना त्याला तिथे नेत्रा दिसली. त्याने लगेचच मामांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर मामाने तिची सर्व माहिती मिळवली. त्यात अर्पिता स्वतःची खरी ओळख बदलून इनामदारांच्या घरी राहते, हेदेखील मामांना समजले. त्यांनी लगेचच त्यांच्या बहिणीला म्हणजे अर्पिताच्या सावत्र आईला ही गोष्ट सांगितली.
"तर हिने आता इनामदारांच्या पोराला जाळ्यात ओढले की काय? त्यात ओळख बदलून त्या लोकांना फसवत आहे ही? पण आता बघच, त्यांच्याच नजरेत तिची किंमत शून्य नाही केली तर नावाची प्रमिला नाही मी. एक दिवस ते लोक स्वतःहून हिला हाकलून देतील घरातून. तेव्हा इथेच येईल ना!"
"ताई तू नेमकं काय करणार आहेस आता? जे काही करशील ते सक्सेस होवू दे म्हणजे झालं. थोडी काळजी घे आणि विचारपूर्वक कर जे काही करायचे ते. दरवेळी तोंडावर पडतेस. सहा महिने झाले पोरगी घरातून बेपत्ता आहे आणि आताच तिचा कळवला आला असे दाखवू नकोस त्यांना. त्याने तूच मूर्ख ठरशील. कळतंय का मी काय म्हणतोय ते?"
"हो रे, चांगलंच कळतंय मला." प्रमिला ताई खुनशी सुरात उत्तरल्या.
क्रमशः
काय करेल आता नेत्राची आई? जाणून घ्या पुढील भागात.
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा