Login

मैत्रेय भाग १

मैत्रीचे अनोखे बंध
भाग पहिला

"असं का होतं आहे माझ्या मनाला? मनातल्या शब्दांना?  कुठेतरी मन एकटंच भरकटत जातं. किती समजावलं मनाला तरीही  त्याचीच ओढ लागते. त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, त्याचा द्वेष करते तरीही त्याचीच ओढ का लागते?"

"त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करूनही त्याच्याजवळच जाते. मी त्याच्या आठवणीत जगते. काय जादू आहे त्याच्यात? की त्याच्याशी बोलताना मन माझं हरवून जातं. खूप बोलावसं वाटतं. थोडं रागावावं, थोडं हसावं पण त्याच्यासोबत. त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. मी त्याच्याकडे ओढली जाते."
     
"त्याच्या चेहऱ्यावरचे भाव-भावना अलगद मला मोहरतात. त्याचं हास्याचं गुपीतचं वेगळं आहे. का मला त्याचा भास होतो? या विचारांत माझं मन रात्र रात्र जागतं. नक्की काय होतं मला? कधी कधी मला वाटते मी वास्ताविक जगात आहे की काल्पनिक दुनियेत? या क्षणांना नक्की बोलू काय? हे तर प्रेम नाही ना?"
      
"माझं मन खूप वेगळं आहे. त्याचं मन जाणून घेता घेता मी कधी त्याच्या प्रेमात पडले हे मला कधीच कळले नाही. मी जसं त्याच्या प्रेमात आहे तसा तोही असेल ना? याचं उत्तर मी त्याच्यात शोधते. प्रेमाला कोणतीच भाषा नसते, कोणतेही बंधन नसते. प्रेम हे अपार आहे ते कधी होईल, कुठे होईल सांगता येत नाही."

"एकमेकांच्या मना मनाचा संवाद म्हणजे प्रेम. एकमेकांना होणारी संवेदना म्हणजे प्रेम. न बोलताही सारं काही समजणारं, एका नजरेला एका नजरेने दिलेला इशारा म्हणजे प्रेम."

"एक हृदय दुसऱ्या हृदयाकडे धावणारे. पण माझं हृदय मात्र हृदयाला समजून न घेतल्यासारखे आहे. तसा तो निरागस, राजबिंडा, थोडासा मस्तीखोर, थोडा रागीट, चिडखोर. त्याचं वर्णन करायला माझे शब्दच माझ्यावर रुसतात. तो एक कोडं आहे. मैत्रीचा सच्चा दोस्त आहे. तो सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे. मी जशी प्रेमात आहे, तशी मी त्याला आवडत असेल ना?"

असा विचार ईश्र्वरी करत ऑफिसमध्ये डेस्कवर बसली होती. एवढी विचारात गुंग होती की बाजूला काव्या तिच्यासोबत बोलत होती, हे सुद्धा कळत नव्हते तिला. शेवटी काव्याने जोरात चिमटा काढला तशी ईश्वरी जोरात किंचाळली. फ्लोअरवरचा सगळा स्टाफ तिच्याकडे बघू लागला. तिला क्षणभर काहीच कळले नाही. सगळेजण तिला विचारू लागले, काय गं काय झालं? किंचाळलीस का?

कोणाला काय बोलावे, हेच तिला कळत नव्हते. शेवटी काव्याने सांगितले,"तिचं लक्ष नव्हतं म्हणून मी तिला चिमटा काढला."

मध्येच सुधीर बोलला, "मॅडमचं कधी लक्ष असतं का? नेहमी आपलं धडपडतच असतात नाही तर विचार करत असतात. म्हणून आपल्या ऑफिसच्या थोर विचारवंत आहेत त्या."
त्याच्या या वाक्यावर सगळेजण हसायला लागले.

ईश्वरीला मात्र राग आला, "ओय सुधीर मी तुझ्याकडे नंतर बघते." म्हणत ती तिथून निघून गेली.

त्यांनतर एक एक करत सगळेजण आपापलं काम करायला निघून गेले.

"कायं गं ईश्वरी, कसला एवढा विचार करत बसली होती."

" काही नाही गं! सांगेल नंतर तुला."

ईश्वरी आणि काव्या यांची ओळख ऑफिसमध्येच झाली होती. आफिसच्या पहिल्या दिवसापासूनच दोघींची मैत्री जमली होती. ती मैत्री एवढी घट्ट होती कि कोणी कधीच तोडू शकत नाही. ऑफिसमध्ये त्यांच्या मैत्रीवर सगळे जण जळायचे. त्यांचा खडूस बॉस त्यांना एकत्र  गप्पा मारताना बघितलं की, लगेच एक फाईल त्यांच्या पुढ्यात तयार असायची.

"ईशू हा खडूस बॉस ना माझ्या डोक्यात जातो. एक वर्षात ईश्वरीने खूप प्रगती गेली होती. बेस्ट एम्प्लॉयी असा अवार्ड सुद्धा ईश्वरीने  पटकावला होता. एक हुशार आणि स्मार्ट मुलगी अशी तिची ओळख होती. तशी ती लहानपणापासूनच हुशार होती.

काव्या तिला नेहमी चिडवायची, "हुशार कोकरू आणि आई-बाबांचं लाडकं लेकरू."

ईश्वरी ही आई बाबांना एकटी असल्यामुळे तिचे खूप लाड झाले. तिचा प्रत्येक हट्ट तिचे आई बाबा पूर्ण करायचे.

क्रमशः

पुढे काय काय होणार इश्र्वरीच्या आयुष्यात? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® रेश्मा बोडके
0

🎭 Series Post

View all