प्रीत अबोल

प्रीत अबोल...
प्रीत अबोल...

चेहऱ्यास त्या लाजऱ्या
एका कटाक्षाची आस
कसं सांगेल सख्या रे
सभोवती कोण भास..

भान नसे कोणतेच
हुरहुर उरी दाटे
मखमली फुलांमध्ये
जणू टोचतात काटे..

मोहरते ती गंधाने
श्वास केसांत माळते
विसरून सारे मोह
पुन्हा तुलाच भाळते..

मुका स्पर्श सुखावतो
प्रीत अबोल फुलते
अलवार चाहुलीने
सखी बावरी खुलते..
© कामिनी खाने

छायाचित्र सौजन्य : गुगल

सदर कवितेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.