स्पर्श पहिल्या सरींचा

स्पर्श पहिल्या सरींचा...
स्पर्श पहिल्या सरींचा...


फेर धरून गगनी
धुंद बरसती मेघ
देते चाहूल हळूच
एक चमकती रेघ

येती धावून अंगणी
श्वास भिजवण्या धारा
मन चिंब चिंब होते
येता अलगद वारा

स्पर्श पहिल्या सरींचा
मला खुणावतो असा
ओल्या कुशीत शिरतो
आठवांचा थेंब ठसा

गंध धरेशी सांडता
जीव गंधाळतो वेडा
वाऱ्यासवे मंद मंद
झुले गवताचा शेडा

देही भिनतो गारठा
येतो मोहरून जीव
पाश तोडून गारवा
अशी ओलांडतो शीव

स्पर्श उरतो मनात
जरी ओसरला पूर
मिठी पावसाची अशी
उरतेच हुरहुर
© कामिनी खाने

छायाचित्र सौजन्य : गुगल

सदर कवितेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.