तुझ्या चाहुलीने

पाऊस आणि ती
तुझ्या चाहुलीने...

भिजलेल्या वाटांवर
आस तुझ्याच येण्याची
दाटलेल्या नभाखाली
ओढ कवेत घेण्याची...

झाले धूसर सारेच
स्पष्ट तुझीच प्रतिमा
पाहण्यास तुला सख्या
विसरते माझ्या सीमा...

हसणाऱ्या नयनांचा
मोह टाळू सांग कसा
चोरट्याशा पावलांचा
मनी उमटला ठसा...

गारव्यात चिंबचिंब
बिलगून जाई वारा
तुझ्या चाहुलीने पहा
अंगावरी हा शहारा...

थेंब टपोरे झरती
कधी बरसती गारा
गंधाळून बघ जीव
शोधे तुझाच किनारा...
© कामिनी खाने

छायाचित्र सौजन्य : गुगल

सदर कवितेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.