Login

एका प्रौढ स्त्रीचे भाव स्पंदन

मराठी कविता
संसाराच्या खूप वर्षांनंतर दुसऱ्या पर्वात ही प्रौढ प्रेमिका काय म्हणतेय बघू.

‘एका प्रौढ संसारी स्त्री चे मनोगत….’ रंगत संगत

जगलो सख्या किती वर्षे एकमेकांसाठी,
अवतीभवती होता किती किलबिलाट.
दु:खाचे ते जव सहज उपटून टाकले,
हसत दिली साथ बघ सहज झाली वाट. १

प्रौढ वळणावरही रेलुनी मनात आहे गंध,
डोळ्यात ऊमटे अपुल्या बघ रंग प्रितीचे.
डोळ्यांनीच बोलावे सखया ही प्रेम भाषा,
फुटती धुमारे किती ? अन् रंग वेगळे त्यांचे. २

नजरेत तुझ्या रे मी सदा अडखळले,
लाजले अन् बघ पुरतीच कशी बावरले.
ठाऊक आहे मज तू आहे भारी खट्याळ,
दुरूनच तू नजरेने मला सदा कवळले. ३

तुझ्या डोळ्यात भाव मोरपिशी दिसती,
तुझे डोळे बघून जुईची फुले ऊमलती.
ओढ माझीच सदैव तुला मी हे जाणते,
मखमली स्पर्शात तुझ्या रंध्रे माझी भिजती. ४


आहे रे मी अधुरी तुझ्या स्पर्शाविना,
कधीच कळल्या मजला माझ्या भावना.
वयोगाठ अता झाली पुरती जुनी अपुली,
प्रेमाची ही रंगत संगत अजूनही संपेना. ५

रहा असाच सदैव माझ्या जीवनी सख्या,
तू असता माझ्या डोळ्यात सजे उत्सव.
तुझ्या विना अधुरा हा प्रेमंगोफ दोघांचा
मिळूनी दोघे साजरा करू आनंदोत्सव. ६
________________________________
©® मीनाक्षी वैद्य.


वाटायचं कधीकधी...

वाटायचं कधी कधी आपणच का सगळं सांगायचं
वाटायचं त्यालाही कळायला हवं
कधीतरी दुस-याच्या मनातलं असतं वाचायचं...
नाहीच जमलं वाचणं तर विचारायचं...
'कशी आहेस?' .....नुसतं विचारलं तरी मनाचा होतो झोपाळा...

मन होतं सावरीच्या कापसासारखं हलकं
आणि तरंगू लागतं निळ्या आकाशाच्या पटांगणात
किती गिरक्या घेतल्या तरी मन भरतच नाही
तो मात्र लांब उभा असतो...गंम्मत बघत
माझी उडणारी तारांबळ बघून हसतो..म्हणतो,

"किती करशील धांद्रटपणा..जरा मोठी हो."
त्याला काय माहित त्याच्या असण्याने ही तारांबळ उडते
त्याच्यासमोर मनाने मी लहानच असते
त्यांचं रागावणं ही आवडतं या धिटुकल्या मनाला.
त्यांचं असणं,त्यांचं बोलणं,त्यांचं रागावणं
हे सगळंच मोरपिशी असतं.
या मोरपिशी स्पर्शातच मला गुंतायच आहे.
आयुष्यभर त्यातच रुजायचं आहे.
-------------------------------------------------- ©® मीनाक्षी वैद्य.