Login

आधार हक्काचा - भाग -४

आधार हक्काचा - भाग -४
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

टीम वनिता (संघ २)

आधार हक्काचा

भाग - ४

साजिरी या गोष्टीचा खूप विचार करत होती. तिला सध्या एक भक्कम आधाराची गरज होतीच. कारण तारुण्यात असताना एकाकी जीवन जगणे तिला असह्य होत होते. शिवाय पदरी दोन मुली होत्या त्यांचे संगोपन करणे तसेच अंथरुणाला खिळून असलेल्या वडिलांची सेवा करणे, त्यांचे आजारपण बघणे आणि सगळ्या अडचणींवर मात करणे तिला खूपच कठीण जात होते. तिच्यासोबत तिच्या मुलींची फरफट होऊन त्या बिचाऱ्या निरागस मुली विनाकारण होरपळून जात होत्या. नर्मदामुळे साजिरीकडे एक संधी चालून आली होती.

साजिरीने वडिलांना सर्व सांगितले. दाजीबाच्या मनात जे होते तेच नर्मदा बोलत होती; त्यामुळे त्यानेही लगेच होकार दिला.

दोन तीन दिवसांनी नर्मदा पुन्हा एकदा साजिरीला म्हणाली, “बोल मग, तू काय ठरवलंस साजिरी! झाला का नाय पक्का विचार तुझा?”

शेवटी दाजीबाचा होकार असल्यामुळे साजिरी निर्णय सांगण्यासाठी म्हणाली, “हे बघा वैनी! दुसरं लगीन करायचं म्हणलं तर माझ्या बापाचं काय होईल? त्यांना कोण बघणार? तुमाला तर माहितच हाय की ते कुठल्या अवस्थेत हायत. मी त्यांना असं एकट्याला सोडून जाऊच शकत नाय.”

“इतकचं हाय न्हवं! आगं पण तुला त्यांना सोडुन जावंच लागणार न्हाय गं.” त्यावरचा मार्ग काढत नर्मदा बोलू लागली.

“अन् ती कसं काय बरं?” साजिरीच्या मनातील उस्तुकता वाढली होती.

"आगं, त्याला सध्या कुणीच नाय; बायको हुती ती पण एका अपघातात मरुन गीली. आता त्यो एकटाच हाय. त्यालाबी कुणाच्या तरी सोबतीची गरज हाय. वाटलं तर त्यो हितं तुमच्याजवळ इवून ऱ्हाईल. मनानं आणि सभावानं लय चांगला हाय. दोघं एकत्र आलासा तर दोघांचबी कल्याण हुईल गं!. म्हणून म्हणती माझ्यावर इस्वास ठीव; तुझा होकार आसंल तर लगीच त्याला बोलावून घिती."

नर्मदावर विश्वास ठेवून साजिरी होकार देत म्हणाली, “बरं चालतंय.. मग घ्या बोलवून. बोलणी करूया आपण.”

नर्मदाने त्याला बोलावून घेतले. त्याचे नाव सूरज. सूरज अगदीच बोलक्या मनाचा होता. सूरज काही बोलण्याआधी मनात आढेवेढे न ठेवता साजिरी सूरजला स्पष्टपणे म्हणाली, “हे बघा.. मी आधीच सांगतेय की मी लग्नानंतर माज्या वडलांना सोडून तुमच्यासोबत येऊ शकणार नाय. तुमची इथं ऱ्हायाची तयारी आसंल तरच आपण पुढं बोलू.”

सूरज स्मितहास्य करत म्हणाला, “माझी काहीच हरकत नाही, तसेही मला कुणीच नाही. मी एकटाच आहे; त्यामुळे मी इथे राहू शकतो. लग्नानंतर तुमचे वडील ते माझ्या वडीलांसारखेच असणार. शिवाय मी मुलींनाही पोटाच्या मुलांसारखे जपेन, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका.”

सूरजच्या या बोलण्यामुळे साजिरीला खूपच बरं वाटत होतं. साजिरी आणि सुरजचे विचार एकमेकांना पटले आणि त्या दोघांनी पुनर्विवाह केला. दोघेही खूप सुखावले होते. बऱ्याच दिवसांनी कुणीतरी हक्काचे माणूस मिळाले होते; त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

मुलींना वडील मिळाल्यामुळे साजिरी त्यांना म्हणाली, “पोरींनो.. हे बघा तुमचे बाबा!”
सूरज मुलींना जवळ घेत म्हणाला, “निशा, निधी यापुढे तुमचे सगळे लाड मीच पुरवेन. आजवर जे काही तुम्हाला हवे होते ते सगळे देण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही आनंदी तर आम्हीही आनंदी.”
—--------
क्रमशः