Login

आधार हक्काचा - भाग -२

आधार हक्काचा भाग 2
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

टीम वनिता (संघ २)

आधार हक्काचा

भाग - २


लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस खूप सुखात आणि मजेत जात होते. वर्षभरात तिच्या घरी पाळणा हलला. गोड मुलगी घरात दरात दुडूदुडू धावू लागली. सर्व काही छान चालू होते.

बऱ्याच दिवसांनी साजिरी दाजीबाला भेटायला आली असता तो आजारी असल्याचे तिला समजले. वयोमानानुसार त्याला काम होत नसे. ती वडिलांच्या काळजीपोटी त्यांच्यावर रागवत म्हणाली,“ काय वं बाबा! मी इतकी परकी झाली का तुमास्नी? साधा फोन बी केला न्हाय मला. आव तुमाला काय झालं तर मी कुणाकडं बघायचं सांगा की? तुमीच माजे आई अन् बाबा हायेत का नाय? माज्याशिवाय तुमाला तरी कोण जपणार?”

“आगं पोरी तुजं बरोबर हाय गं! पण तुजं लगीन झालंय आता. माज्यापरिस तुज्या नवऱ्याचा अधिकार जास्तीचा हाय का न्हाय तुज्यावर? माजं काय गं म्हाताऱ्याचं. आज हाय.. उद्या न्हाय!” दाजिबा हलक्या स्वरात बोलत होता.

“असं अजिबात बोलायचं न्हाय हं बाबा! मी तर तुमाला एकट्याला ऱ्हाउच देणार न्हाय आता.” साजिरी त्रासलेल्या सुरात बडबडत होती.

साजिरीसोबत महेंद्रसुद्धा आला होता. सासऱ्याला बरं वाटत नाही म्हणून तो म्हणाला, “अगदी योग्यच बोलतेय साजिरी. आम्ही दोघंबी तुम्हाला एकट्याला सोडणार न्हाई. तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोतच की. मग असं वाईट साईट नका बोलू!”
त्या दिवसापासून दोघेही दाजीबा सोबत राहू लागले.

आता महेंद्र जणू घरजावईच झाला होता. पुढे एक दोन वर्षे जाताच त्यांना अजून एक मुलगी झाली. म्हणजे आता घरात लहान लहान दोन मुलींचा वावर होता. दिवसेंदिवस घरचा खर्च वाढू लागला. आर्थिक खर्चाचे नियंत्रण जुळेनासे झाले तेव्हा महेंद्र साजिरीला म्हणाला, “अगं साजिरी.. ऐक ना! गावात राहून आपल्याला आपलं घर सुरळीत चालवणं कठीण जातंय गं. मी काय म्हणतो.. मी मुंबैला जाव का कामासाठी? म्हंजी कसं सगळ ठीक व्हईल बघ. आपल्या पोरींच्या भविष्यासाठी आपल्याला काय तर करायला हवंय ना गं!”

“ अगदी माझ्या मनातलं बोलला तुमी. इथं आपण पुरेसा पैका कमवू शकत न्हाय, पण तुम्ही मंबैला गेला तर पोटापाण्याचा प्रश्न सुटंल आन् आपल्या लेकरांचं समदं ठीक व्हईल.” महेंद्रच्या बोलण्याला दुजोरा देत साजिरी संमती दर्शवत होती.

दोघांचे एकमत झाल्यावर महेंद्र काही दिवसातच नोकरीच्या निमित्ताने मुंबईला निघून गेला. सुरुवातीचे पाच सहा महिने सगळे सुरळीत चालू होते. दोघांचे दररोज फोनवरून बोलणे व्हायचे पण अचानक महेंद्रचे फोन येणे बंद झाले. बरेच दिवस झाले तरी त्याची काही खबर आली नाही. ना पत्र, ना फोन. कोणतीच माहिती कळत नव्हती. साजिरी त्याची पाखरासारखी वाट पाहत होती. मोठी मुलगी निशा दोन वर्षांची होती आणि छोटी मुलगी निधी अवघी वर्षभराची होती. इतके लहान लहान लेकरांचे संगोपन करायचे? नवऱ्याची काळजी करायची की थकलेल्या बापाला बघायचे? साजिरी खूप गोंधळून गेलेली. तिचे मन कशातच लागत नव्हते. काळजी करून करून दिवसरात्र नुसती झुरत बसायची.

महेंद्रची वाट बघत बघता जवळ जवळ पाच वर्षे लोटली, पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. मोलमजुरी करून साजिरी दोन मुलींचा आणि वडिलांचा सांभाळ करत होती.

मुली सजिरीला सारख्या म्हणू लागल्या, “ए आई.. सांग ना गं! आमचे बाबा कुठं गेलेत गं? कधी येणार आहेत सांग की गं? त्यांना आमची आठवण येत नाय का?”

मुलींचे बोलणे ऐकून सजिरीचा कंठ दाटून येत असे, पण त्यांची समजूत काढण्यासाठी ती म्हणाली, “बाळांनो, लवकरच येणार हायेत तुमचे बाबा आणि तुमाला माहिती हाय का.. तुमचे बाबा येताना लय खाऊ आणणार हायेत तुमच्यासाठी बरं का!”

निरागस मुलींना ते खरंच वाटायचं आणि आनंदाने उड्या मारत त्या दोघीही खेळायला जायच्या. साजिरी मात्र मनातच कुढत बसायची.

वय वाढल्यामुळे आणि मुलीच्या संसाराची फरफट पाहून दाजीबा हतबल झालेला. तो विचार करून करून मनाने खचून जात होता. शेवटी मुलीच्या काळजीने अंथरुणाला खिळून पडला.

साजिरी आता खूप म्हणजे खूपच एकटी पडली, कारण वडील असूनही काही उपयोग नव्हता. सगळी जबाबदारी एकटीवर येऊन पडली. तरुण स्त्रीला या जगात एकटे जगणे म्हणजे जणू तारेवरची कसरत असते आणि तीच कसरत साजिरीला करावी लागत होती; त्यामुळे ती अतिशय खचून गेली.
—-------------
क्रमशः