ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
लघु कथा लेखन (दुसरी फेरी)
संघ -२
अपहरण अन् प्रसंगावधान
मध्यान रात्र झालेली अन् जवळ ठेवलेल्या फोनची रिंगटोन वाजली तशी काव्या खडबडून जागी झाली. तिने पटकन उठून पाहिले तर रात्रीचे दीड वाजले होते. फोन हातात घेतला तर त्यावर तिच्या बहिणीचे म्हणजे दिव्याचे नाव दिसले. झोपेच्या तंद्रीतच ती म्हणली, “काय गं ताई.. काय झालं! इतक्या रात्री कसा काय फोन केलास?”
दिव्याच्या आवाजात भीती जाणवत होती. घाबरलेल्या स्वरात ती म्हणाली, “अगं.. विकी घरी आलाय का सांग ना!”
“का गं.. असे का विचारतेस? नाईट शिप चालू असल्यावर रात्री दीड- दोन वाजता येत असतो तो. तरीही थांब जरा; पलीकडच्या रूम मध्ये आलाय का नाही ते बघते.” म्हणत फोनवर बोलत बोलत काव्या अंथरुणातून उठून पलीकडील रुममध्ये डोकावू लागली. पाहते तर काय, विकी अजून घरी आला नव्हता.
दिव्याने म्हणाली, “काय झालं.. आहे का तो घरी?”
बेचैन झालेल्या ताईला समजावत काव्या म्हणाली, “अगं ताई.. तो कधी कधी घरी यायला थोडा उशीरही करत असतो. इतकी का काळजी करतेस?”
कापऱ्या आवाजात दिव्या म्हणाली, “ अगं.. थोड्या वेळापूर्वी त्याचा मल फोन आलेला मी तो उचलला पण तो काहीच बोलत नव्हता फक्त आजूबाजूला इतर काहीजणांचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे. नक्की काय झाले ते पाहायला मी तुला इतक्या रात्री फोन केलाय गं!”
“ताई.. तू काळजी नको करू दोन वाजेपर्यंत येईल तो. अन् नाहीच आला तर मग बघुया काय ते.” काव्याला विकीच्या रात्रीच्या घरी येण्याची वेळ माहित होती त्यामुळे ती थोडी निवांत होती पण तरीही ताईने जे सांगितले त्यामुळे मनात कुठेतरी वेगळे विचार चालू झालेले.
वीस वर्षाचा विकी कंपनीत नोकरी करत होता. काव्या शहरात राहत होती म्हणून तो आय टी आय केल्यावर गावाहून आपल्या मावशीकडे राहायला आलेला. त्या शहरातील त्याला जास्त काही माहिती नव्हती. तिथल्या परिसराची ओळख नव्हती. ठराविक भाग सोडला तर काही भागांचे नावसुद्धा त्याला माहित नव्हते. तो दोन शिफ्टमध्ये काम करत असे. सकाळी साडे सात ते दुपारी साडे तीन पहिली शिफ्ट असायची आणि दुपारी साडे तीन ते रात्री साडे अकरा दुसरी शिफ्ट असायची. एकेक आठवडा शिफ्ट असायची. सध्या त्याची सेकंड शिफ्ट चालू होती. त्यामुळे दुपारी दोन वाजता विकी ‘मावशी येतो गं!’ म्हणत कामाला जायला निघाला.
पण रात्रीचे दोन वाजून गेले तरी तो काही घरी आलाच नाही. तिकडून दिव्या काव्याला सारखी फोन करत होती. काव्या आणि दिव्या विकीला फोन लावायचा प्रयत्न करत होत्या पण त्याचा फोन बंद लागत होता. आता दोघींचीही पाचावर धारण बसली. मनात नको नको ते विचार थैमान घालू लागले.
विकीचा फोन लागत नसल्यामुळे त्याच्याशी कोणताच संपर्क होऊ शकत नव्हता. एक तास उलटून गेला. रात्रीचे अडीच वाजले तरीही त्याचा पत्ता लागेना. वाट बघताना काव्याचे काळीज धडधडत होते. काय करावे काहीच सूचत नव्हते. दिव्या तिकडून सारखी फोन करत होती. तिलाही तिकडे चैन पडेना.
काव्याचा नवरा किरण कामावरून थकून आल्यामुळे त्याला गाढ झोप लागकी होती. विकी बरोबर दीड वाजताच घरी येईल अशी काही फिक्स वेळ नव्हती. कारण कंपनीची बस कधी वेळेवर येत नसे. म्हणून तासभर वाट बघत बसण्याचा विचार करून काव्या फक्त घरातून आता बाहेर करत येरझाऱ्या घालत होती. पण शेवटी तिला काही राहवेना. तासाभराने तिने किरणला उठवले आणि अस्वस्थ होऊन म्हणली, अहो.. विकी अजून घरी आलेला नाही.”
किरण झोपेतच म्हणाला, “ येईल गं रोजच्या वेळेत; तू कशाला काळजी करतेस उगीच!”
अहो खूप उशीर झालाय, आत्तापर्यंत येऊन तो झोपतो सुध्दा पण आज अजून घरी पोचला नाही. काव्या विकीच्या काळजीने मनात घाबरली होती.
“काय सांगतेस! किती वाजले?” म्हणत तो खाडकन जागा झाला.
“अहो.. रात्रीचे अडीच वाजून गेलेत. हायवेवरून रस्ता ओलांडून यावे लागते त्याला. मनात काहीही येत आहे ओ. चला ना आपण त्याच्या स्टॉपवर जाऊन पाहून येऊ.” असे म्हणत काव्या खूप बेचैन झालेली.
किरण उठला आणि दोघेजण गाडीवर बसून विकी ज्या बस स्टॉप वर थांबायचा तिकडे निघाले. पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर बस स्टॉप होता. सुनसान रस्त्याला खूप अंधार होता. वाटेवरुन जाताना कुत्री भुंकत होती. काव्या खूप घाबरलेली. घरापासून काही अंतरावर जाताच मोटारसायकल अचानक बंद पडली. तेव्हा किरणच्या लक्षात आले की गाडीत पेट्रोल कमी होते. दोघेही गाडीवरून उतरले आणि गाडी ढकलत एक पेट्रोल पंपावर गेले. तिथे गाडीत पेट्रोल भरून पुढे विकीला शोधायला निघाले.
अंधारातून बारीक तीक्ष्ण नजरेने पाहत ते बस स्टॉपवर पोचले अन् पाहतात तर काय.. समोर बस स्टॉपवर विकी उभा होता. त्याच्याकडे पाहिले तर तो अतिशय विचित्र मनस्थितीत होता. काही क्षण काव्या अन् किरण त्याच्यासमोर जाऊन उभा राहिले तरी त्याला कशाचेही भान नव्हते. जणू काही तो कसल्या तरी दडपणात असल्याचे जाणवले.
त्याला बघून या दोघांच्या जीवात जीव आला.
त्याला बघून या दोघांच्या जीवात जीव आला.
विकीजवळ जातच काव्या त्याला म्हणाली, “अरे काय रे हे! असा का थांबलायस इथे? इतका वेळ कुठे होतास?”
विकी खूपच घाबरलेला होता. त्याला काय बोलावं तेही सुचत नव्हतं. नीट काही न सांगता तो म्हणाला, “काय नाही.. असेच थांबलोय.”
काहीतरी गडबड झालीय लक्षात येऊन काव्या शांतपणे त्याला म्हणाली, “ बरं.. चल घरी, बस गाडीवर.. घरी जाऊन बोलू.”
तिघेही गाडीवर बसले आणि घरी आले. घरी यायला तीन- सव्वा तीन वाजले असतील. काव्याने दिव्याला विकी सापडल्याचे फोन करून सांगितले तेव्हा कुठे दिव्या निवांत झाली.
बस स्टॉपवर असताना नीट काहीसे दिसले नव्हते पण घरी येताच विकीच्या चेहऱ्यावर कुणीतरी मारल्याच्या खुणा दिसत होत्या. डोळ्याजवळ काळे निळे झालेले. एक बाजू सुजलेली होती. हातावर आणि अंगावर ओरखडल्याचे निशाण दिसत होते. घरी आल्यावर विकीला जीव भांड्यात पडल्यासारखे वाटत होते. काव्याने आणि किरणने त्याला सावरत त्याची भीती कमी केली.
बस स्टॉपवर असताना नीट काहीसे दिसले नव्हते पण घरी येताच विकीच्या चेहऱ्यावर कुणीतरी मारल्याच्या खुणा दिसत होत्या. डोळ्याजवळ काळे निळे झालेले. एक बाजू सुजलेली होती. हातावर आणि अंगावर ओरखडल्याचे निशाण दिसत होते. घरी आल्यावर विकीला जीव भांड्यात पडल्यासारखे वाटत होते. काव्याने आणि किरणने त्याला सावरत त्याची भीती कमी केली.
आता तो बऱ्यापैकी सावरलेला तेव्हा काव्याने त्याला मनातील सगळे प्रश्न विचारले आणि तो झालेली घटना सांगू लागला. “अगं मावशी.. मी नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर आपल्या घरी चालत चालत येत होतो. फाट्यावरून हायवे क्रॉस करून अलीकडे येतच होतो तोवर तिथे रस्त्याकडेला एक रिक्षा अंधारात उभी असलेली दिसली. तिच्याजवळ चार पाच लोकं थांबलेली होती. त्यातील एकजण मला आवाज देत म्हणाला, ‘कुठे जायचेय?’ मी त्यांच्याकडे पाहत आपल्या घराच्या दिशेने हात करत रस्ता पार करत करत म्हणालो, “कुठे नाही.. समोर गावातच जातोय.”
“मी इकडे येतच होतो तोवर एकजण माझ्या मागून आला त्याने माझे हात पकडले आणि जो माझ्याशी बोलत होता त्याने मला त्या रिक्षात खेचले. रिक्षात दोघेजण आधीच बसले होते. मला गाडीत घातले आणि त्या दूरवर थोड्या आतल्या बाजूला ते गाव आहे ना बघ; त्या गावाजवळ सूनसान रस्ता आहे ना, तिथे अंधारात मला घेऊन गेले.” विकी सांगत होता आणि काव्या व किरण कान टवकारून ऐकत होते.
न राहून काव्या म्हणाली, “मग तिकडे का नेले? अजून काय केले त्यांनी तुला?”
पुढची कहाणी सांगत विकी म्हणाला, “तिथे गेल्यावर त्या चोरट्यांनी मला मारहाण करायला धमकवायला सुरुवात केली. चाकूची भीती दाखवली. मी त्यांचे चेहरे पाहिल्यावर त्यांना नंतर ओळखू नये म्हणून माझ्या डोळ्यावर मारले. माझा मोबाईल काढून घेतला, पैसेही काढून घेतले. आणि मला त्या अंधारात रिक्षातून खाली ढकलत ते भरधाव वेगाने रिक्षा चालवत निघून गेले.”
“अरे पण मग तुझ्या हातातील फोन त्यांनी काढू घेतला तर मग तुझ्या आईला तुझ्याकडून कॉल कसा गेला?” काव्या मनातील प्रश्नांचे निरसन करू लागली.
विकी म्हणाला, “अगं.. इमर्जन्सी डायलमध्ये आईचा नंबर सेव्ह केलाय. आमच्यात झटापट चालू असताना मी हळूच तो नंबर दाबून आईला फोन लावला. जेणेकरून मी संकटात आहे याचा ती अंदाज लावेल.”
“बरं झालं बाई.. तू हुशारीने प्रसंगावधान राखून डोकं चालवलंस; नाहीतर आम्हाला कळलेही नसते की तू अजून घरी आला नाहीस. मला वाटले की तू नेहमीप्रमाणे येऊन झोपला असशील.ताईने फोन केला म्हणून समजले तरी.” काव्या मोकळा श्वास सोडत बोलत होती.
पण अजूनही अनेक प्रश्न डोक्यात नाचत होते त्यामुळे ती म्हणाली, “अरे पण मग तुला तर इथले काहीच माहीत नाही, तरी तू परत आपल्या नेहमीच्या बस स्टॉपवर कसा काय पोचलास?” तुला तर दुसऱ्या अनोळखी रस्तावर अंधाऱ्या ठिकाणी नेऊन सोडलेले ना!”
हो.. हो. मला त्या अंधारात सोडलेले तेव्हा मी तिथे बरच वेळ थांबलो. खूप घाबरलो होतो. आजूबाजूला चिटपाखरूसुध्दा नव्हते. काहीच दिसत नव्हते. हातात मोबाईल नव्हता. रस्त्याच्या कडेला वेड्यासारखा उभा होतो. बऱ्याच वेळाने एक दुचाकी गाडी आली. तोही बहुतेक सेकंड शिफ्ट करून घरी जात होता. गाडीच्या उजेडात मी त्या माणसाला थांबण्यासाठी हात केला. पण मला एकट्याला अंधारात थांबलेला पाहून तोही थोडा बावचळला अन् पुढे निघून गेला.”
जरा पुढे गेल्यावर देव जाणे त्याच्या मनात काय आले आणि तो परत मागे येत मला म्हणाला “अरे.. तू इतक्या अंधारात का थांबलाय असा?”
मग झालेला सगळा प्रकार मी त्याला सांगितला तेव्हा तो मला म्हणाला, “मी त्याच बाजूला जात आहे; चल बस गाडीवर. मी तुला पोलीस स्टेशनला सोडतो, तू तिथे तक्रार कर.”
कहाणी पुढे सांगत विकी म्हणाला, “मी आधीच खूप घाबरलेलो. मला काहीच सुचत नव्हते. बुडत्याला काडीचा आधार अशी माझी अवस्था झालेली म्हणून तो जे म्हणले तसे करू या उद्देशाने मी त्याच्या गाडीवर बसून पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथे त्यांनी माझी तक्रार लगेच घेतली नाही. मलाच उलट सुलट प्रश्न विचारले. माझी अपहरण केस न घेता फोन हरवल्याची तक्रार नोंद केली तेही कच्च्या कागदावरच. मला सुरक्षित ठेवण्या ऐवजी उडवाउडवीची कारणे दिली. रात्रीच्या वेळी नागरिक कितपत सुरक्षित आहे याचा प्रत्यय पोलिसांच्या वागणुकीतून आला. पोलीस मला म्हणाले, “तू बस स्टॉपवर जाऊन थांब मागून आमची गाडी तिथे येईल.”
त्यांचे वागणे, बोलणे ऐकून मला त्या दुचाकीवाल्या माणसाने आपल्या नेहमीच्या बसस्टॉपवर आणून सोडले आणि तो पुढे त्याच्या घरी निघून गेला. बिचारा तो एकच माणूस इतक्या रात्री देवासारखा मदतीला धावून आला होता. त्यानंतर तुम्ही मला घ्यायला येण्यापूर्वी अर्धा तास मी तिथेच पोलिसांची वाट पाहत घाबरलेल्या अवस्थेत उभा होतो. अर्धा पाऊण तास झाल्यावर तुम्हीच आलात. पण पोलिसांचा काही पत्ता नाही. सुरुवातीला तुम्ही माझ्या समोर उभे आहात याचे भानही मला आले नाही. मी माझ्या विचारातच हरवलो होतो. आयुष्यात पहिल्यांदा असा अनुभव आलेला होता.”
“तुला समोर बघून खरंच मी खूप मोठ्या संकटातून बाहेर आले असं फिल झालेलं मला. बरं झालं बाई.. त्या चोराने तुझे फक्त पैसे आणि फोन काढून घेतले. तुला काय केले असते तर तुझ्या आईला मी काय उत्तर दिले असते?” काव्या सुस्कारा सोडत सांगत होती.
विकीच्या सुदैवाने तो सुखरूप घरी पोचला होता. तिकडे दिव्या देवाचे मनापासून आभार मानत होती. मुलगा सुखरूप घरी पोचल्यामुळे तीही खूप समाधानी झालेली. काव्या आणि किरण यांना आलेले दडपण नाहीसे झाले.
विकीचे अपहरण म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यात मिळालेला एक धडाच मिळाला होता. रात्री अपरात्री सावधानतेने राहावे आणि संकट आलेच तर त्याचा सामना करण्याचे धाडस आपल्यात असायला हवे.
काव्या त्याला धीर देत म्हणाली, "संकटकाळी धाडसाने वागावे. तू खरच खूप खंबीर आहेस. असाच रहा! यापुढेही असेच प्रसंगावधान राखून वागत जा. घाबरायचे नाही. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत, काळजी नको करू. आता निवांत झोपून घे; आराम कर.”
विकी सुखरूप घरी आल्यामुळे काव्या आणि दिव्या यांना सुखाची झोप लागली.
—----------
—----------
समाप्त.
©® सौ. वनिता गणेश शिंदे