Login

गुंतता हृदय हे..! - भाग २

Guntata Hruday he!

गुंतता हृदय हे..!- भाग २

चेहऱ्यावर न मावळणारं हसू आणि मनात मणभर आनंद घेऊन काहीशी बागडतच चालले होते मी घराकडे. हातावरचा त्याच्या ओठांचा स्पर्श अजूनही गोड शिरशिरी आणत होता. स्वतःच्याच धुंदीत चालत असताना मी त्या अंधाऱ्या वाटेवर येऊन पोहोचले. अजून पाच मिनिटं आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे माझं घर होतं. मोजून दोन पाऊलं टाकली आणि मला समोरून ते दोघं येताना दिसले..

पुढे..

त्या दोघांना बघून भीतीची एक लहर सर्वांगातून गेली माझ्या. मी आजूबाजूला बघितलं. रस्त्यावर कोणीच नव्हतं. वस्ती चालू होण्यासाठी अजून एक वळण पार करायचं होतं.  पुन्हा मागे फिरावं का? ह्या विचारात होते मी.. पण तेवढ्यात त्यांच्यातल्या एकाने पुढे येऊन माझा हात धरला. प्रतिकारासाठी मी हात उचलायचा प्रयत्न केला पण त्याचवेळी काहीतरी टोकदार मला पाठीत टोचल्याचं जाणवलं आणि माझं शरीर शिथिल झालं.

पुढच्या सगळ्या घटना एखाद्या स्लोमोशन भयपटाप्रमाणे माझ्यासमोर घडत होत्या. जवळच्याच दाट झाडीत ते मला घेऊन गेले. आसपासच्या झाडाझुडपांनी, काट्यांनी ओरबाडले जात होते मी. पण पुढे घडणारं ह्यापेक्षा कित्येक पटीने भयानक असणार होतं. एखाद्या जनावराप्रमाणे त्यांनी मला तिकडच्या मोकळ्या जमिनीवर टाकलं. क्षणाचाही विलंब न करता ते दोन नराधम माझ्या शरीरावर तुटून पडले. वेदनेने काळीज पिळवटून निघत होतं. कोणत्याही क्षणी आपल्याला जाग येईल आणि हे भयानक स्वप्न संपेल असं मी माझ्या वेड्यामनाला समजावत होते. पण त्या वेदना.. त्या वाढतच गेल्या. शरीराची हालचाल बंद झाली असली तरी त्याला होणाऱ्या वेदनांची जाणीव मात्र जराही कमी झाली नव्हती. स्वतःच्याच नजरेत पडत चालले होते मी.. त्यांच्या त्या किळसवाण्या स्पर्शाने. अतीव वेदनेने मी डोळे मिटायचा प्रयत्न केला, पण बाकीच्या शरीराप्रमाणे माझ्या पापण्यांनीही असहकार पुकारलेला. माझ्या आयुष्यात घडत असलेली ही घृणास्पद घटना माझ्या उघड्या डोळ्यांमार्फत माझ्या मनाच्या स्मृतीपटलावर कायमची कोरली जात होती. आयुष्याच्या अंतापर्यँत ती आता अशीच राहणार होती.. तिथं निपचित पडून तो अत्याचार सहन करत असतानाच अचानक माझ्या मनात त्याचा विचार आला..'निशांत'. 

'एक गुड नाईट किस? माझ्या होणाऱ्या बायकोकडून?' त्याचे शब्द माझ्या कानांत घुमले. का नकार दिला मी त्याला? लग्नाच्या पवित्र बंधनात अडकल्यावर होणाऱ्या शरीरांच्या पवित्र मिलनाची स्वप्न बघत होते मी.. पण माझ्या निशांतच्या वाटेचं सुख ह्यांनी ओरबाडून घेतलं.. आणि आता? आता काहीच नव्हतं उरलं.. मन आक्रंदत होतं. डोळ्यांतून नुसतेच अश्रू ओघळत होते. ते दोघं अजूनही अर्वाच्य शिव्या देत माझ्या शरीराचे लचके तोडत होते. शेवटी असह्य झालेल्या वेदनांनी माझी शुद्ध हरपली..

____****____

माझे डोळे उघडले तेव्हा समोर पांढऱ्या भिंती दिसत होत्या, पांढरे पडदे दिसत होते. स्वर्ग? त्या मरणप्राय वेदनांनंतर आपण स्वर्गात येऊन पोहोचलो आहोत, आता किमान ह्या छिन्न विछिन्न मनाने आणि शरीराने त्याच्यासमोर जावं लागणार नाही हाच काय तो दिलासा होता मनाला. पण हे काय.. माझ्याबाजूला लोकांचे बोलण्याचे आवाज येत होते. अण्णांचा आवाज.. हो त्यांचाच आवाज होता तो. मी मान वळवायचा प्रयत्न केला. पण शरीर अजूनही साथ देत नव्हतं. तेव्हाच ओटी पोटात एक तीव्र वेदना जाणवली.. बाकीचं शरीरही ठणकत होतं. तेवढ्यात माईचा चेहरा समोर आला. 

"प्रिया, ऐकतेयस का? काहीतरी बोल ना. अहो, तुम्ही तरी सांगा पोरीला. जे झालं ते झालं. आपण आहोत ना. माझी पोर वाचणं महत्वाचं आहे." ती धाय मोकलून रडत होती.  

"हे बघा, तिच्यावर बलात्कार करताना तिला पाठीच्या कण्यात इंजेक्शनने ड्रग दिलं होतं. त्याने तिची सेंट्रल नर्व्ह डॅमेज झाली आहे. ह्यातून बाहेर येणं म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावं लागेल." एक अनोळखी आवाज म्हणाला. तसा माईचा धीर सुटला. ती छाती बडवत माझ्या बाजूला बसून राहिली. एक दोन दिवस गेले. समोरच्या पांढऱ्या भिंतींपलीकडे माझं जगच नव्हतं. आसपासच्या लोकांची बोलणी कानावर पडत होती.  पोलिसही येऊन गेले, त्या दोघांना पकडल्याचं सांगून गेले. पण पुराव्यांअभावी ते सुटायची शक्यता आहे असंही म्हणाले. त्यांच्या पापांचा एक जिवंत पुरावा मृतवत समोर पडला असताना ते मात्र सुटणार होते. मन पुन्हा एकदा खचलं. माझं आयुष्य उध्वस्त करून ते मात्र परिपूर्ण आयुष्य जगणार होते, संसार करणार होते,  पालकत्व अनुभवणार होते आणि म्हातारपणी निवांत मारणार होते. आणि मी? मी ह्या पांढऱ्या भिंतीकडे बघत मरणाची भीक मागणार होते. पण अशातच एक दिवस.. तो आला.. निशांत! माझ्या डोळ्यांसमोर त्याचा चेहरा दिसला आणि इतके दिवस बधीर  झालेल्या त्या मनात प्रेम, काळजी, दुःख अशा अनेक भावना एकत्रच उफाळून आल्या.

"प्रिया.." माझ्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला. ऊर दाटून आला होता. पटकन पुढे जाऊन त्याच्या  मिठीत शिरावं असं वाटत होतं. ह्या सगळ्यांतून मी गेलेले पण त्याच्या चेहऱ्यावर शतपटीने अधिक वेदना होत्या. इतके दिवस त्याला सामोरं जावं लागू नये म्हणून मनोमन देवाची प्रार्थना करत होते. पण आज त्याला बघून कुठेतरी कणभर, अगदी कणभर दिलासा मिळाला होता मनाला. त्याचा रोडावलेला चेहरा, दाढीची खुंट, लाल डोळे, अस्ताव्यस्त केस.. त्याने तळमळत घालवलेल्या दिवसांची साक्ष होते. चेहऱ्यावर अपराधीपणाची जाणीव होती. माझ्याकडे बघून भरल्या डोळ्यांनी तो नाईलाजाने मान हलवत होता. 

"आय एम सॉरी प्रिया. मला माफ कर. आयुष्यभरासाठी तुझी जबादारी घेणार होतो पण पहिल्याच दिवशी कमी पडलो गं. का मी तुला एकटीला जाऊ दिलं. कसा स्वतःला माफ करू मी." माझ्या हातावर डोकं टेकवून बाजूला रडत बसला होता तो. आयुष्यात इतकं असहाय्य मला कधीच वाटलं नव्हतं. त्याच्या दाट केसांतून हात फिरवावा, त्याला उराशी कवटाळून धीर द्यावा आणि स्वतःला त्याच्या सुरक्षित मिठीत झोकून द्यावं असं वाटत होतं. पण उरातल्या हृदयाव्यतिरिक्त बाकी काहीच साथ देत नव्हतं. हॉस्पिटलच्या त्या भयाण शांततेत माझ्या कृश हातावर डोकं टेकवून माझ्या हृदयाचे मंद ठोके ऐकत होता तो. पोहोचत असतील का माझ्या भावना त्याच्या पर्यंत? ती रात्र तो तसाच माझ्या बाजूला बसून राहिला. त्या रात्री खूप दिवसांत पहिल्यांदा मला शांत झोप लागली..

"ज्यांनी तुझी ही अवस्था केलीये त्यांना मी सोडणार नाही प्रिया. दे विल हँव टू पे फॉर धिस!" सकाळी निश्चय करून तो निघून गेला. दिवस पुढे जात होते. लोकांचं आयुष्यही पुढे जात होतं. मी मात्र तिथेच होते. त्या पांढऱ्या भिंतीकडे आणि त्यावर नव्याने बनत असलेली कोळिष्टकं बघत. निसर्गातल्या त्या इवल्याश्या जीवाचं आयुष्यही पुढे जात होतं. आणि मी? दिवसाआड निशांत भेटायला येत होता. त्याच्या दिवसाबद्दल सांगत होता, पुस्तकं वाचून दाखवत होता, दोघांत एक हेडफोन्स लावून माझ्या आवडीची गाणी ऐकवत होता. माई आणि अण्णांनीही त्याचं असणं स्वीकारलं होतं बहुदा. म्हणा आता त्यांना कसली चिंता असणार होती. ह्याहून वाईट काय घडणार होतं? 

जवळपास वर्ष होत आलं असावं. हळूहळू निशांतचं येणं कमी झालं आणि शेवटी बंदच झालं. सुरवातीला तो दिसला नाही की कावरीबावरी होत होते मी. पण हळूहळू मनाने त्याचं नसणं स्वीकारलं होतं. शेवटी त्याचंही आयुष्य इतरांप्रमाणे पुढे जाणारच ना. किती दिवस आमचं एकतर्फी प्रेम पुरणार त्याला.? एव्हाना डॉक्टरांपासून माझ्या जन्मदात्यांपर्यंत सगळ्यांनीच मी ह्यातून कधीच बाहेर येणार नाहीये हे सत्य स्वीकारलं होतं. असं असताना तो तरी कशाला हे प्रेम कुरवाळत बसेल. आयुष्यभर प्रेम करण्याच्या आणाभाका घेणं आणि प्रत्यक्षात अशा कठीण परिस्थितीतून त्या निभावणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. शरीराप्रमाणेच मनही हळू हळू शिथिल होत चाललं होतं. आणि एक दिवस.. अचानक तो पुन्हा समोर आला!

क्रमशः!

© मृण्मयी कुलकर्णी  

0

🎭 Series Post

View all