Login

गुंतता हृदय हे..!- भाग १

Guntata Hruday he!

गुंतता हृदय हे..!- भाग १

संध्याकाळी निघायची तयारी करत असतानाच माझा फोन वाजला. फोनवरचं नाव बघायच्या आधीच एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत मोठ्ठ स्माईल आलं चेहऱ्यावर. त्याचाच फोन होता..

"हाय! मला वाटलं विसरलास की काय आज फोन करायला." मनावर काही क्षणापुर्वी आलेली मरगळ क्षणात नाहीशी झाली होती.

"असं कसं विसरेन. सॉरी सकाळपासून जरा कामात बिझी होतो म्हणून नाही जमलं फोन करायला. ऑफिसखाली आलोय. आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊया?" त्याच्या आवाजात आज वेगळाच उत्साह जाणवत होता. थोडेफार आढेवेढे घेत मी पण तयार झाले. शेवटी त्याला भेटायची ओढ होतीच. मी धावतच खाली आले. ऑफिसमधल्या मैत्रिणींना उगाच काहीतरी कारणं देऊन, सगळ्यांच्या नजरा चुकवत. मुख्य गेटमधून बाहेर पडल्यावर नजर आजूबाजूला भिरभिरत होती. त्याला शोधत.. आणि तेवढ्यात तो दिसला. पांढऱ्या रंगाचा कडक इस्त्रीचा शर्ट आणि ब्लॅक कलरची ट्राऊजर घालून बाईकला टेकून उभा होता तो. मला बघून चेहऱ्यावर एक गोड स्माईल आलं त्याच्या. मी धावतच गेले त्याच्याजवळ.

"आज काही स्पेशल? एकदम तयार होऊन आला आहेस." त्याच्याकडे चोरटे कटाक्ष टाकत त्याची नजर चुकवत मी विचारलं. खूप छान दिसत होता तो आज. तो मात्र फक्त हसून बाईकवर बसला आणि बाईक चालू करून माझ्या बसण्याची वाट बघत होता. 

देशमुख उद्यानाच्या एका कोपऱ्यात एक सुकी भेळ दोघांत शेअर करून खात होतो आम्ही. दाणे आणि कैरीचे तुकडे मी अगदी वेचून खात होते आणि तो मात्र उरलेलं. कैरी खाताना माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता तो माझ्याही नकळत. माझ्यावर खिळलेली त्याची नजर जाणवली तसं मी त्याच्याकडे बघितलं.

"एवढी कैरी नको खाऊस. खोकला होईल." तो उगाच काहीतरी बोलायचं म्हणून ओशाळून म्हणाला. मला हसायला आलं. कारण मगाशी भेळेची ऑर्डर देताना, 'भैया, कच्चा कैरी ज्यादा डालो.' असं आवर्जून सांगितलं होतं त्याने भेळवाल्याला.. पण आज त्याच्यात काहीतरी बदलल्यासारखं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि चिंता दोन्ही दिसत होतं. काहीतरी चालू होतं मनात त्याच्या. मी नजरेनंच विचारलं त्याला. थोडं घुटमळत, काहीसं लाजत आणि घाबरत त्याने विचारलं, "प्रिया, लग्न करशील माझ्याशी?" 

त्याच्या त्या प्रश्नाने हृदय शंभरच्या स्पीडने धावायला लागलं माझं. चेहरा गोरामोरा झाला होता. तेव्हाच त्याने माझे हात हातात घेतले. "आपल्याला एकमेकांना ओळखून पाच वर्ष झाली आता. स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही हा माझा अट्टाहास होता. तुही तो हसत हसत मान्य केलास. घरच्यांच्या प्रश्नांना एकटी सामोरी गेलीस. मी तुला फिरवून सोडून देईन ह्या समजापोटी तुझ्या घरच्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडायला सांगितले असतानाही तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवलास. आज मी एक यशस्वी वकील झालोय ते तुझ्यामुळेच. कॉलेजमध्ये असताना किती उनाड होतो मी. तू स्थैर्य आणलंस माझ्या आयुष्यात, तुझ्या ह्या साध्या, निरागस, संयमी स्वभावाने. कसा गुंतत गेलो तुझ्यात कळलंच नाही. मला माहितीये तुझ्या मैत्रिणींची लग्न होताना बघून तुलाही वाटलंच असेल आपलंही लग्न व्हावं. पण कधी माझ्यावर दडपण येऊ दिलं नाहीस त्याचं. आता अजून वाट नाही बघावी लागणार तुला प्रिया. सांग ना, करशील माझ्याशी लग्न?" माझ्या डोळ्यांत खोलवर बघत तो म्हणाला. किती प्रेम होतं त्या नजरेत, किती माया होती त्या स्पर्शात.

उत्तर द्यायला मी तोंड उघडलं खरं पण शब्द गळ्यात दाटलेल्या आवंढ्यातच विरले. नुसतीच होकारार्थी मान हलवून मी त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवलं. काही वेळ दोघं शांतपणे तो स्पर्श, तो क्षण अनुभवत होतो. इतक्या वर्षांचं स्वप्न आज पूर्तीकडे निघालं होतं. कॉलेजमधल्या एका निखळ मैत्रीपासून सुरु झालेला प्रवास आज आयुष्यभरासाठीच्या नात्यात बदलत होता. अंधार पडायला लागला तश्या उद्यानाच्या वॉचमनच्या फेऱ्या वाढायला लागल्या. कोपऱ्यात बसलेल्या जोडप्यांवर लक्ष ठेवण्यासाठी. मी काही म्हणायच्या आधीच तो म्हणाला, "चल प्रिया, तुझ्याकडे कोणी अशा नजरेनं बघितलेलं नाही आवडणार मला."

जीवापाड प्रेम असूनही कायम मर्यादेत असणारा तो आज मात्र हक्काने माझा हात पकडून मला बाईकपाशी घेऊन आला. पण त्या स्पर्शातही फक्त प्रेम होतं आणि काहीसा हक्क.. लालसा मात्र नव्हती. माझं मन नकळत सुखावलं. घराच्या गल्लीपासून काही अंतरावर आल्यावर मी त्याला बाईक थांबवायला सांगितलं. निघत असतानाच त्याने माझा हात धरला "गुड नाईट किस? माझ्या होणाऱ्या बायकोकडून?" 

मी काहीसं लाजूनच त्याच्याकडे बघितलं. "नाही हां निशांत. हे लग्नानंतर. तुला माहिती आहे ना हे सगळं माझ्यासाठी किती स्पेशल आहे?" त्याने हसून मान हलवली. 

"आज तुझा होकारच पुरेसा आहे. बाकी सगळ्यासाठी मी तू म्हणशील तोपर्यँत थांबायला तयार आहे." माझ्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला.

"येते मी आता. उगाच कोणीतरी बघेल. खूप उशीर झालाय. घरी वाट बघत असतील." मी त्याच्या हातातून हात सोडवून घेत म्हणाले. पण मन आज त्याच्यापासून दूर जायला तयार नव्हतं. पाच वर्ष वाट बघितल्यावर आता मात्र त्याच्यापासून लांब राहायचा विचारही करवत नव्हता. त्यालाही कदाचित असंच वाटत असावं.

"मी काय म्हणतो, आत्ताच मंदिरात जाऊन लग्न करूया का आपण? नको तो दुरावा आणि नको ते वाट बघणं.." माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तो म्हणाला आणि मी खदखदून हसले.

"पाच वर्ष गेली.. तसेच पुढचे दिवसही जातील की. ह्या दुराव्यानेच तर मनं अजून जवळ येतात ना. मी वाट बघेन तुझी, अण्णांकडून माझा हात मागण्यासाठी." नकळत हात त्याच्या गालावर गेला. तसा तो गोड हसला. 

"मी सोडायला येऊ का घरापर्यंत? तू असं रात्री एकटीने जाणं नाही पटत मला. अण्णांची काळजी असेल तर मी आज वर येऊन तुझा हात मागतो त्यांच्याकडे." मी निघत असताना तो काळजीने म्हणाला.

"नको, तू नंतर कधीतरी ये. इतक्या रात्री ही गोष्ट बोलणं योग्य नाही ना. आणि काळजी कसली, तू इथे कोपऱ्यावर पोहोचेपर्यंत घरी पोहोचेन मी. " म्हणून मी निघाले. रस्ता क्रॉस करून गल्लीत शिरायच्या आधी त्याच्याकडे वळून बघितलं. तो हसून माझ्याकडे बघून हात हलवत होता. मी गेल्याशिवाय तो जाणार नाही ही गेल्या पाच वर्षांची सवय.. दोघांचीही.

चेहऱ्यावर न मावळणारं हसू आणि मनात मणभर आनंद घेऊन काहीशी बागडतच चालले होते मी घराकडे. हातावरचा त्याच्या ओठांचा स्पर्श अजूनही गोड शिरशिरी आणत होता. त्याचं लग्नासाठी विचारणं अजूनही मनात रुंजी घालत होतं. मनातून मी आत्ताच मिसेस. प्रिया निशांत अष्टेकर झाले होते. स्वतःच्याच धुंदीत चालत मी त्या अंधाऱ्या वाटेवर येऊन पोहोचले. अजून पाच मिनिटं आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे माझं घर होतं. मोजून दोन पाऊलं टाकली आणि मला समोरून ते दोघं येताना दिसले..

क्रमशः!

© मृण्मयी कुलकर्णी  

0

🎭 Series Post

View all