Login

नातं तुझं नि माझं - भाग ५ (अंतिम भाग)

नातं तुझं नि माझं - भाग५(अंतिम भाग)
नातं तुझं नि माझं - भाग ५ (अंतिम भाग)


आवडीची भेटवस्तू पाहून दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दोघी एका सुरात म्हणाल्या, “ थॅन्क्स दादा, थॅन्क्स अहो.”
आणि हे ऐकून सगळेजण हसू लागले.

अंजली म्हणाली, “दादा.. पण तुला कसे काय माहीत मला हेच टॉप्स आवडलेले.”
तोच प्रश्न त्याला पूनमनेही केला, “सांगा ना तुम्हाला कसं कळलं की असं टॉप्स मला पाहिजे होतं.”

अमर दोघींना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, “ अग बायांनो मी काहीच केलेले नाही. मुळात हे गिफ्ट मी घेतलेच नाही. पूनम तुला दिलेले गिफ्ट अंजलीने तुझ्यासाठी माझ्याकडे दिलेले आणि अंजली तुला दिलेले गिफ्ट हे पूनमने तुझ्यासाठी माझ्याकडे दिलेले. हा… आत्ता फक्त मी ते तुमच्याकडे सुपूर्द केले इतकंच.”

आई बाबा एकमेकांकडे बघत म्हणाले, “असंय होय.. तरी आम्ही म्हणतोय इतकं सारखं दिसणारी वस्तू कशी काय आली बरं?”

पण सारंग आणि अमरला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेच नव्हते. न राहून सारंग म्हणाला, “ मला सांगा दोघींचे गिफ्ट एकसारखेच कसे काय बरं?”

त्यावर अंजली म्हणाली, “वहिनी तुम्हाला आठवतंय का गेल्या दिवाळीला आपण मोबाईलवर ऑनलाईन वस्तू पाहत होतो तेव्हा आपल्या दोघींना असेच टॉप्स आवडलेले तेव्हाच मी ठरवलेले की पुढच्या दिवाळीला ते गिफ्ट तुम्हाला द्यायचे म्हणजे द्यायचे.”

अंजलीच्या हातावर टाळी देत हसत पूनम म्हणाली, “अगं बाई गंऽऽऽ असाच ईचार मी बी तवा केल्याला. आन् तवापासून मी पै पै करून साठवत होते या दिवाळीला तुम्हाला तेच गिफ्ट मी देण्याचं ठरवलं होतं.

अंजली पूनमला म्हणाली, “वहिनी मागे एकदा तुम्हाला हेच कानातील टॉप्सचे डिझाईन आवडलेले.ते माझ्या लक्षात होते म्हणून मी येताना ते आठवणीने आणले.”

पूनमचे मन भरून आले अन् ती म्हणाली, “ताई त्याचवेळी तुमालाही ती डिझाईन आवडली होती म्हणून आज तुमच्यासाठी आवर्जून घेतली. शेवटी आपण नणंद भावजय असलो तरी आधी खूप छान मैत्रिणी आहोत. एकमेकींची सुख दुःख वाटून घेत आजवर जगात आलोय.”

अंजलीचे मन आनंदाने भरून आले ती म्हणाली, “हो वहिनी, आणि यापुढेही आपण असेच आनंदाने राहणार आहोत. आपल्या माणसांशिवाय घराला कधी घरपण येत नसतं.”

नणंदेचे बोलणे ऐकून पूनम भारावून गेली आणि म्हणाली, “बरोबर हाय ताई तुमचं. म्हणूनच तुमी आल्याशिवाय आन् आपण सगळे एकत्र असल्याशिवाय एवढा मोठा सण साजराच करूसा वाटत नाय. तुमी आमची शान हायत.”

पूनम आणि अंजलीने एकमेकींना मिठीत घेतले आणि दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघीजणी म्हणू लागल्या -

जरी आपण नणंद भावजय
तरीही आपली मैत्री अनमोल,
छोट्या मोठया गैरसमजाने
ढळणार नाही कधीच तोल.

विश्वासाची दोर भक्कम
गुंफली आहेत गोडीने,
आयुष्यभर टिकवून ठेवू
नाते दोघी मिळून जोडीने.

या दोघींचे बोलणे ऐकून आई बाबांना अगदी भरून पावल्यासारखे झाले. अमरला तर काय बोलावं तेच सुचत नव्हतं. तो फक्त कान देऊन ऐकत बसला होता. आपली बहीण आणि बायको इतक्या चांगल्या वागतात हे पाहून तो देवाचे आभार मानत मनातच म्हणाला, “देवा जन्मोजन्मी मला हीच बहीण आणि हीच बायको लाभू दे रे बाबा!”

सारंग मनोमन खूप खुश होत म्हणाला, “असे नाते आणि अशीच आपुलकी सर्व माहेरवाशिणींना मिळाली तर मुलीला किंवा सुनेला कधीही परकेपणाची जाणीव होणार नाही.

आपल्या माणसांसोबत सर्व सुख दुःख वाटून घेतली तर आनंद द्विगुणित होतो. कुणाला कधीही परकेपणाची जाणीव होऊ न म्हणजेच नाती घट्ट जपणे. आणि ज्या घरात नणंदेची भूमिका ही हक्क गाजवण्यापुरती नसून माहेरच्या माणसांना समजून घेत प्रेमाने नाती जपून मैत्रीपूर्ण संबंध राखण्याची असते त्या घरात सुखाला पारावर उरणार नाही.

मुलीचे आणि सुनेचे हे मैत्रीपूर्ण नातेसंबंध पाहून यशोदाच्या मनात सहज भाव तरळू लागले ते म्हणजे -

नांदे घरी ज्याच्या अशी
छान जोडी सून लेकीची,
कशी भासेल उणीव तिथे
प्रेम, माया, आपुलकीची.
—-------

समाप्त: