नातं तुझं नि माझं - भाग १
काय गं पूनम… अंजू कधी येतो बोलली? परवा तू फोन लावला हुतास , तवा काय सांगितलं तिनं? सासूबाईं म्हणजे यमुना लेकीची विचारपूस आपल्या सूनेकडे करत होत्या.
“आवं आत्त्या.. ताई येत्याल की लक्ष्मीपूजन झाल्यावर. दर वर्षी आपल्याकडे दिवाळीत चार दिस का होईना पर ताई येऊन जात्यातच की. परवा फोन आलेला तवा फोनवरनं तुमच्यासोबतबी बोलल्याच न्हवं. जी तुमाला सांगितलं तीच मलाबी सांगितलं त्यांनी. त्यांचं आपलं एकच ठरल्यालं असतंय. वर्सात एकदाच माहरेला यायचं, तेच्यावर वरिसभर अजिबात फिरकायचं न्हाय.” पूनम आपले काम करत करत यमुनासोबत बोलत होती.
लेकीची बाजू समजून घेत यमुना म्हणाली, “काय करणार बाई; ती शेहरात र्हाती. तिथनं याचं म्हणलं तर लयच लांब हाय. दोन ल्हान ल्हान लेकरं घिवून यायला तिला जमत न्हाय गं सारखं सारखं!”
यमुनेच्या बोलण्याला दुजोरा देत पूनम म्हणाली, “तेबी हायच म्हणा. मलाबी लय वाटतं की ताईंनी अधून मधून माहेरी यावं. आपल्यासोबत हसत खेळत आनंदानं दिवस घालवावंत. त्यांची पोरं.. आमची पोरं.. सुट्ट्या कशा मजेत घालवतील पण त्यांच्या घरगुती अडचणींमुळं त्यांना इकडं येताच येत नाय.”
लेकीच्या काळजीने यमुना म्हणाली, “व्हय आगं…पर जाव दी; आपण तरी काय करणार म्हणा? तिला यकटीला इतक्या लांबचा परवास करणं म्हंजी नुसती तारंवरची कसरतच जणू. त्यापरिस तिला जवा जमल तवा आली तरी जीवाला घोर नाय लागत.”
या दोघी सासू सुनेचे बोलणं चालू असतानाच पूनमच्या फोनची रिंग वाजली. पूनमने फोन हातात घेऊन पाहिले तर नणंदेचाच फोन आलेला होता. तिने फोन उचलाला आणि म्हणाली , “हॅलो, बोला की ओ ताई. कसं काय बरं हाय का?
तिकडून पूनामची नणंद म्हणजे अंजली म्हणाली, “मी मस्त मजेत आहेत. तुम्ही सगळे कसे आहात?”
“आव…आत्ता तुमचाच विषय काढला होता आमी दोघींनी.” पूनम पटकन बोलून गेली.
काय बोलणं चालू होतं ते ऐकण्यासाठी अंजली उस्तुकातेने म्हणाली, “हो का.. का बरं..कशावरून आठवण झाली माझी?”
झालेले बोलणे सांगण्यासाठी पूनम म्हणाली, “दिवाळी आली नाय का तोंडावर त्यामुळं आत्या विचारात होत्या की दिवाळीसाठी इकडं कधी येणार हाय बरं तुम्ही?”
विषयाचे कारण समजताच अंजली म्हणाली, “अहो वहिनी, मी दरवर्षी प्रमाणेच येणार ना. किती वर्षे झाली बरं. आमचं नेहमीचं ठरलेलं आहे, ते तुम्हालाही माहित आहे ना.”
सगळं काही माहित असूनही नणंद येण्याची वाट पाहणारी पूनम हळवी होऊन म्हणाली, “बरोबर हाय ताई, मला हाय की माहिती पण तुमी जरा लवकर आलासा तर लय मस्त वाटतं. तुमी आला की सण असल्याचा आनंद डबल हुतो. घर कसं भरल्यागत वाटतं.”
भावजयच्या मनातील ओढ पाहून अंजली म्हणाली, “हो वहिनी, मला माहित आहे ना की तुम्ही सगळे माझी खूप वाट पाहत असता. पण मी एकटी येऊ शकतं नाही आणि आमच्या यांना जॉबवर सुट्ट्या घेण्यासाठी आधी तसे रीतसर सांगावे लागते मग तिकडे येता येते. तरीही लवकर येण्याचा नक्की प्रयत्न करू.”
परिस्थिती सावरून घेत पूनम म्हणाली, “मी आत्त्यांला हेच सांगत होती. आता तुमीच तुमच्या तोंडानं सांगा त्यास्नी; म्हंजी त्यांचं समाधान व्हईल.”
यमुनासोबत बोलण्यासाठी अंजली म्हणाली, “ठीक आहे.. द्या बरं आईकडे फोन; बोलते मी तिच्याशी.”
—------------
क्रमशः
क्रमशः
©®सौ. वनिता गणेश शिंदे