Login

नातं तुझं नि माझं - भाग ३

नातं तुझं नि माझं - भाग३
नातं तुझं नि माझं - भाग ३


दिवाळी सुरू झाली लक्ष्मीपूजन झाल्यावर अंजलीने माहेरी फोन केला आम्ही गाडीला बसलोय संध्याकाळपर्यंत पोहोचू घरी. ती आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत माहेरी जाण्यास निघाली. माहेरी जायचं म्हटलं की बाईच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज येतं. तेच तेज अंजलीच्या चेहऱ्यावर दिसताच चिडवणायासाठी सारंग म्हणाला, “काय मग नेहमीप्रमाणे आजही एका मुलीची कळी अगदी खुललीय जणू.”

लाजतच अंजली म्हणाली, “जा तिकडे.. तुमचे आपले काही तरीच. आज काय पहिल्यांदा जात आहोत का आपण?”

सारंग बायकोची तारीफ करत म्हणाला, “अगं तसं नाही गं; पण माहेरी निघाल्यावर तू खूप खुशीत असते ना त्यामुळे अजूनच सुंदर दिसतेस.”

नवऱ्याने केलेल्या कौतुक ऐकून अंजलीला खूप समाधान वाटत होते. दोघेही आपल्या मुलांसोबत हसत खेळत प्रवास करू लागले.
दिवसभराचा प्रवास करून ते एकदाचे माहेरी पोचले. माहेरघरी जाताच तिला जाणवले की तिकडे सर्वजण आतुरतेने त्यांची वाट पाहत होते. लहान लहान भाचे कंपनी तर दारातच वाट पाहत थांबलेले. यांना पाहताक्षणी आनंदाने नाचत म्हणाले, ए आईऽऽऽ आत्त्या आली बघ.” धावत जाऊन त्यांनी आत्त्याला मिठी मारली.
मुलांना जवळ घेत आत्त्याबाई हसतमुखाने घरात गेली.

समोर आई वडील बसले होते. त्यांनी आपल्या मुलीला जवळ घेतले आणि मग काय वर्षभराच्या गप्पांना सुरुवात झाली. बोलता बोलता जेवणाची वेळ झाली. पूनमने नणंदेसाठी नंदेच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. माहेरवाशीण माहेरी आली की तिचे लाड करावेत अशी एक रीत यमुनाने पूनमला सांगितली होती आणि पूनमचे आपल्या नणंदेशी छान जमत होते त्यामुळे तीही अगदी प्रेमाने अंजलीचे सगळे हट्ट पुरवत असे.

वहिनी आपल्याला किती जीव लावते हे अंजलीला दिसत होते त्यामुळे तीही तिच्या कर्तव्यात मागे पडत नव्हती. पूनम आणि अंजलीचे नाते नणंद भावजयचे असेल तरीही त्या अगदी खूप छान मैत्रिणी असल्यासारख्या राहत होत्या. प्रत्येक सुख दुःख शेअर करत होत्या. एकमेकींना समजून घेत होत्या.

आवडीचे जेवण बघून अंजलीला अतिशय आनंद झाला. आज ती समाधानाने जेवून तृप्त झाली. सगळ्यांचे जेवण झाल्यावर सर्वजण हॉल मध्ये गप्पा मारत बसले. बराच वेळ झाल्यावर यमुना म्हणाली, “चला बरं आता, बाकीच्या गप्पा उद्या मारुयात. पावणं परवासात दमून आल्यात; सगळेजणं झोपून घ्या, त्यांस्नी आराम करू दे.

पूनम अंथरूण ठीक करण्यासाठी बेडरुममध्ये पुढे निघून गेली. लहान मुले गप्पा ऐकत खेळता खेळता झोपी गेलेले.

अमर आणि अंजली हे दोघे बहीण भाऊ अजूनही हॉलमध्येच होते. दुसऱ्या दिवशी दीपावली पाडवा आणि भाऊबीज एकच दिवशी आले होते. म्हणून अंजलीने येतानाच एक गिफ्ट आणले होते. दादाला आवाज देत अंजली म्हणाली, “हे घे दादा उद्या पाडवा आहे ना तर वहिनीसाठी हे गिफ्ट दे तिला खूप आवडेल.”

अमर आश्चर्याने म्हणाला, “अगं काय हाय हे! न् याची काय गरज होती; तू कशाला आणलेस, मी आणणारच होतो ना उद्या.”

“असू दे रे दादा.. यावर्षी मी पसंद केलेले गिफ्ट दे वहिनीला. तिला तेवढेच बरं वाटेल; आणि हो हे सरप्राईज ठेव, आत्ता तिला काही सांगू नकोस हं.” दादाला बजावत अंजली म्हणाली.

“ठीक आहे नाही सांगत.” असे म्हणत गालातल्या गालात हसून तो बेडरुम मध्ये निघून गेला.
—-- —---
क्रमशः