Login

नाती जिव्हाळ्याची - भाग ६

नाती जिव्हाळ्याची भाग ६
नाती जिव्हाळ्याची - भाग ६

आपला भाऊ कर्जबाजारी झालाय. त्याच्याकडे आपल्या गरजा भागवण्यासाठी पैसे मागणे योग्य नाही. याची कल्पना सुजयला होती. त्यामुळे तोसुद्धा आपल्या भावाला हातभार लावावा म्हणून कॉलेज करत करत पार्ट टाईम जॉब करू लागला.

सुधीर रात्रंदिवस खूप मेहनत करत होता. कधी एकदा आपण कर्जमुक्त होतोय असे त्याला वाटत असे. कारण तो खूप स्वाभिमानी मुलगा होता.

सीता सावकाराला दिलेल्या शब्दाला जागून आपला शब्द पाळत होती. सावकाराचे शेतातील काम असो वा घरातील, पण ती सर्व कामं निमूटपणे न कंटाळता करत होती.

काही दिवसात सीताने आणि सुधीरने मिळून सावकाराचे कर्ज फेडले. तेव्हा कुठे डोक्यावरचे ओझे उतरल्यामुळे त्यांना सुखाची झोप लागू लागली.

एकदा रेश्मा माहेर घरी आली. ती एकदम उत्साही आणि आनंदी वाटत होती. तरीही सीता तिला म्हणाली, “ आगं रेश्मा.. घरी सगळी चांगलं वागत्यात का गं तुझ्याशी? खुश तर आहेस का तुझ्या परपंच्यात?”

आईच्या मनातील शंकेचे समाधन करण्यासाठी रेश्मा म्हणाली, आई… मी माझ्या संसारात खूप खुश आहे गं. तू माझी काळजी अजिबात करु नको. मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळाला आहे.. सासू आईसारखी माया लावते आणि सासरे तर वडिलांची कमी भरून काढतात. मला कशाचीच कमी पडू देत नाहीत. तू निश्चिंत रहा.

सासरचे कौतुक मुलीच्या तोंडून ऐकल्यावर सीताचा जीव भांड्यात पडला. ती म्हणाली, “ चला लयच बरं वाटलं बघ ऐकून. तुझी काळजी मिटली. आता एकदा सुजय आणि सुधीर या दोघांचं सगळं मार्गी लागलं की मी निवांत व्हईन.”

आईच्या मनातील चिंता कमी करण्यासाठी रेश्मा म्हणाली, “होईल गं आई.. सगळं चागलं होईल. तू खूपच काळजी करतेस कशाचीही. आता मुलं मोठी झालेत. तू जास्त विचार करण सोडून दे. नंतर तुलाच त्रास होतो बघ.”

“आगं पोरी.. आई हाय मी. काळजी तर वाटणारच की गं. तुला आता समजल सगळं. जवा तू आई व्हाशिल तवा माझं म्हणणं तुलाबी कळलं.” येणाऱ्या भविष्याच्या गोष्टींची कल्पना सीता रेश्माला देत होती.


आईच्या बोलण्याचा अर्थ कळल्यावर रेश्मा लाजतच म्हणाली, “ हं.. तुझं आपलं काहीतरी. ते बघू पुढचं पुढं!” त्यानंतर दोघीही गोड हसत गप्पा मारत बसल्या.

माहेरपण झाल्यावर रेश्मा पुन्हा एकदा आपल्या सासरी निघून गेली. आणि सीताचे पूर्वीप्रमाणे रोजचे दिनक्रम चालू झाले.

बघता बघता तीन वर्षे निघून गेली. आता सुजयचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. सोबतच कॉम्पुटरचा कोर्सही केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर कुठेतरी जॉब शोधून आपल्या भावाला आणि आईला मदत करायची हा विचार त्याच्या डोक्यात सतत घोळत होता. त्यानुसार तो एके ठिकाणी कामाला जाऊ लागला. आपला भाऊ आपल्यामुळे जास्त शिकू शकला नाही ही सल नेहमी त्याच्या मनात सलत होती.

एकदा सुजय गावी आला होता. आपल्या वडिलांच्या जागी भावाने सगळी जबाबदारी पार पाडली याची जाणीव त्याला होती. त्यामुळे दादा साठी आपण ही काहीतरी करायचंच ही जिद्द त्याच्या मनात होती. त्यामुळे तो सुधीरला म्हणाला, “ दादा.. मी काय म्हणतो ते पटतय का बघ. तू फक्त दहावीचं शाळा शिकलायस. मला वाटतं तू अजून पुढे शिकावे. आता माझ्या शिक्षणाचे ओझेही तुला नाही. शिवाय तुला आमच्यामुळे शिकता आले नाही. आजवर जे तू माझ्यासाठी केलेस ते आता मी तुझ्यासाठी करेन. पण तू तुझे शिक्षण पूर्ण कर.”

दादाला काही ते पटले नाही. त्यामुळे तो म्हणाला, “काहीही बोलतोस. आता कुठे शिकतोय सांग. हे काय वय आहे का शिकायचे. सगळी मुलं माझ्यापेक्षा लहान आणि मी एकटच मोठा ते काय बरं दिसतं का?

“अरे दादा.. तुला इच्छा आहे ना शिकायची. मग तू शिक ना. अन् हे बघ तू मुक्त विद्यापीठातून शिकू शकतोस. त्यासाठी रोजच् शाळेत जावे लागणार नाही. रोजची कामं करत शिक्षण घे पण शिक.” सुजय सुधीरला समजावत होता.

आता सुजय जॉब करत होता त्यामुळे तो सुधीरला पैसे देण्यास सक्षम होता. सूजयचे बोलणे सीता ला पटले कारण जबाबदारी लवकरच अंगावर पडल्यामुळे सुधिरची स्वप्न अपूर्ण राहिली होती. पण आता सुजय ती पूर्ण करु पाहतोय याच तिला फार कौतुक वाटलं. या दोन भावाभावातील प्रेम पाहून ती खूप समाधानी व्हायचे.

शेवटी सीताच सुधीरला म्हणाली, “आर पोरा.. तो इतकं सांगतोय तर मग शिक की तू. तुळाबी अधिकार हाय तुझी इच्छा कशाला मारतुस. तुमी दोघं सुखात आनंदात र्‍हावं हीच माझी बी इच्छा हाय.”

आई अन् भाऊ खूप फोर्स करू लागल्यामुळे सुधीर पुढे शिकायला तयार झाला. त्याने मुक्त विद्यापीठातून त्याचे शिक्षण चालू केले.

सुजय जॉब करत करत त्याच्या बुध्दी चातूर्यावर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत होता. खूप मेहनत घेऊन हळूहळू त्याने प्रगती करत करत फूड प्रोडक्टचा स्वतंत्र असा स्वतः चा बिझनेस सुरू केला. त्याचबरोबर सुधीरनेही कॉलेज करत करत इंटेरियर डिझायनरचा कोर्स केला.

कॉलेज आणि कोर्स पूर्ण झाल्यावर तोसुद्धा सुजयसोबत शहरात रहायला गेला. आता दोघे भाऊ मिळून एकत्र राहत होते. एकमेकांना मदत करत होते. सीता एकटीच गावीच होती. पण पूर्वीसारखी आर्थिक परिस्थिती उरली नव्हती आता तिची दोन्ही मुले चांगला पैसा कमवत होते. तिला रानात काम करण्याची गरज नव्हती.

—----

क्रमशः


सीता एकटीच गावी राहील की आपल्या मुलांकडे शहरात राहायला जाईल? सुधीर आणि सूजयच्या आयुष्यात पुढे काय होईल? ते पाहूया पुढील भागात.

—--------

सौ. वनिता गणेश शिंदे