Login

नाती जिव्हाळ्याची - भाग ३

नाती जिव्हाळ्याची भाग ३
नाती जिव्हाळ्याची - भाग ३


रेश्माने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यापुढे शिकायची तिची इच्छा नव्हती. सुधीर तिला म्हणाला, “ रेश्मा तू पुढे शिक. तुला हवे तेवढे शिक.”

पण रेश्माला शिक्षणाची फारशी गोडी नव्हती म्हणून ती म्हणाली, “दादा.. मला आता पुढे शिकायची इच्छा नाही अन् माझे तेवढं डोकं ही चालत नाही. तू आपलं सुजयला शिकव. तो हुशार आहे आणि त्याला आवड ही आहे.”

“अगं.. पण तू सुद्धा शिकलीस तर तुलाच फायदा होईल ना!” रेश्मानेही पुढे शिकावे अस सुधीरला वाटत होतं.

पण रेश्माला ते जमणारं नव्हतं त्यामुळे ती म्हणाली, “हो रे दादा.. पण माझं डोकंच चालत नाही ना! मग उगीच कशाला खर्चात पडायचं?”

समजावून सांगितले तरी ती ऐकत नाही तेव्हा सुधीर म्हणाला, “बरं बाई तुझी मर्जी. तुला जबरदस्ती करून काय उपयोग होणार म्हणा! त्यापेक्षा तुला ज्यात आवड आहे ते तू कर. तुला दुसरी काही मदत हवी असेल तर सांग, हा तुझा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर असेल.”

रेश्मा म्हणाली, “हो दादा.. नक्की सांगेन. पण आता शिक्षणाचे नाव घेऊ नको. बाकी काहीही सांग. मलाही हे माहीत आहे की आमचा दादा आमच्यासाठी खूप कष्ट करतो. त्यासाठीच वाटत की तुला जास्त त्रास होऊ नये.”

रेश्माने शिकायला नकार दिला आणि आईला घरकामात मदत करू लागली. सुजयने मात्रशहरातील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याचे पुढचे शिक्षण चालू झाले. शिक्षणासाठी लागणारा संपूर्ण खर्च सुधीर बघत होता. फक्त कॉलेज करून काही उपयोग होणार नाही हे सुजयला समजले तेव्हा तो सुधीरला म्हणाला, “दादा.. मला कॉम्प्युटर कोर्स करायचा आहे रे! पण त्यासाठी फी भरावी लागेल. नुसती शाळा शिकुन काय फायदा होणार नाही. जॉब करायचं असेल तर कॉलेजच्या शिक्षणा सोबतच कॉम्प्युटर पण शिकणं जरूरीचं आहे.”

“अरे मग तू ही शिक ना कॉम्पुटर. तुला जे शिकायचे ते शिक. तू तुझ्या पायावर उभा रहावंस एवढीच माझी इच्छा आहे.” सुधीर सुजयला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देत होता.

“अरे पण दादा.. पैशाचे काय करायचे रे. कॉम्प्युटर शिकायचे झाले तर त्यासाठी फी द्यावी लागेल ना. अन् आत्ता तू माझ्या कॉलेजच्या खर्च भगवतोस त्याचसोबत आईला घर खर्चात मदत करतोस. त्यात परत दुसरा खर्च कसं शक्य आहे सांग ना?” सुजय पैशाची काळजी करत बोलू लागला.

लहान भावाला धीर देत सुधीर म्हणाला, “त्याची चिंता तू नको करु. मी आहे ना! मग तू निश्चिंत राहा. आणि फक्त शिकायचं काम कर. बाकीचे मी पाहतो.”

दादाच्या अशा बोलण्यामुळे सुजयला खूप बरं वाटलं. पुढे त्याने कॉम्पुटर कोर्सला प्रवेश घेतला. अतिशय अभ्यास करुन सजय अगदी जिद्दीने कॉलेज आणि कोर्स पूर्ण करण्यासाठी धडपडत होता. तसेच आपल्या भावाला कशाची कमी पडू नये म्हणून सुधीर पडेल ते काम करून पैसे कमावत होता.

सीताला या दोघांचं एकमेकांवरील प्रेम बघून खूप आनंद होत असे. सुजयच्या बाबतीत तशी तिची चिंता कमी होती पण तिच्या मनात एक विचार सतत घोळत होता. एकदा त्या विचारातच ती हरवून गेलेली दिसाली. आईच्या मनात काय सलतेय हे जाणून घेण्यासाठी सुधीर तिला म्हणाला, “आई.. अशी का बसलीयस गं? काय होतय का तुला? एवढा कसला विचार करतेस इतका? काय झालंय ते तरी सांग? असं वाटतं की हल्ली तू सारखा कसला तरी विचार करत असतेस.”

“काय नाय रं बाळा. असंच बसलीय. इतकं काय इशेष नाय, तू नको ईचार करु. मी बरी हाय.” सीता सुधीरला समजावत होती.

अगं पण मला सांग तरी, तुझ्या मनात काय चालू आहे ते? अशी एकटीच झुरत बसत जाऊ नको गं!” आईच्या काळजीपोटी सुधीर तिला बोलतं करत होता.

*आरं बाळा.. आपली रेश्मा आता शाळा शिकत नाय, घरीच असती. शिवाय तिचं लग्नाचं वय झालंय. ‘तरणीताठी पोरं आन् जिवाला घोर’. असं असतंय. मला तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली हाय.” सीता मनातील तगमग मुलाला सांगू लागली.

“हाऽऽत्तेच्या.. हे कारण आहे होय. अगं आई.. तू एवढं टेन्शन कशाला घेतेस गं. अगं होईल की सगळं ठीक. बघुया तिच्यासाठी चांगलं स्थळ आणि उडवू की बार. नको जास्त विचार करु तू.” मुळातच समजूतदार असलेला सुधीर आईला आधार देत होता.

सुधीरजवळ मन मोकळं करुन सीताला आता हलकं हलकं वाटत होत. सध्या तिचाही हक्काचा एकमेव आधार म्हणजे तिचा मोठा मुलगा सुधीर हाच होता. तिने आपले दुःख कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी सुधीरच्या नजरेतून ते सुटत नव्हते. आईला दिलेल्या शब्दानुसार सुधीरने रेश्मासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली.

थोडीफार स्थळं त्याने शोधली होती. पण त्यात काही योग नीट जुळून येत नव्हता. रेश्मा दिसायला अगदीच सुंदर होती. रंगाने गोरीपान, पाणीदार डोळे, लांबसडक केस, लाल गुलाबी ओठ, चाफेकळी नाक, मध्यम बांध्याची शरीरयष्टी, उंचीही अगदी तिच्या सौंदर्याला शोभेल अशीच होती. त्यामुळे देखणेपणाच्या बाबतीत सीता आणि सुधीर निश्चिंत होते. काळजी होती ती फक्त मिळणारा नवरा आपली परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार जुळवून घेणारा असावा हीच. स्थळांची शोधमोहीम चालू होती. त्यातील एक दोन स्थळ भेटूनही गेलेलीत. पण काही जुळलं नव्हतं.

—----------
क्रमशः

रेश्माचे लग्न जुळेल का? ते कसे जुळेल? काय होईल पुढे ते पाहूया पुढील भागात.