Login

नाती जिव्हाळ्याची - भाग १

नाती जिव्हाळ्याची - भाग १

नाती जिव्हाळ्याची - भाग १


“ए आईऽऽऽ…अगं मी काय म्हणतोय ते ऐक ना गं!खूप झालं काम करणं. आता विश्रांती घे तू. अन् आमच्यासोबत राहायला चल. अशी गावाकडे एकटी नको राहू.” सुजय आईच्या काळजीने तिला आपल्यासोबत शहरात राहायला चल असं म्हणाला.

“होय रं पोरा. मी बी लय दमलीय बघ. आता म्हातारपणी मला तर कुठं काम व्हतंय रं. आन हितं एकटीला अजिबात करमत न्हाय. तुमी दोघं माझ्यासंग व्हता तवा लय भारी वाटायचं, पर आता रोजचा दिस जाता जात न्हाय. त्यापरिस मी येती तुमच्याकडं र्‍हायाला.” कष्ट करून थकलेली सीता आपल्या लेकरांकडे शहरात राहायला जायला तयार झाली.

तरुण वयातच नवरा सोडून गेलेला त्यामुळे सगळी जबाबदारी एकट्या सीतावर येऊन पडली होती. नवऱ्याची आठवणीत हंबरडा फोडून रडताही येत नव्हते तिला. ती रडायला लागली की मुलं कावरीबावरी होऊन केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघायची. पदरी दोन मुलं अन् एक मुलगी होती. मुलं अगदीच लहान लहान. सीताला सुधीर, सुजय आणि रेश्मा अशी तीन मुलं होती. सुधीर सर्वात मोठा मुलगा तो आठवीत शिकत होता, रेश्मा सहावीत शिकत होती अन् सुजय खूपच लहान म्हणजे तो चौथीत शिकत होता. एक दिवस अचानक काळाने डाव साधला अन् या तिन्ही मुलांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले होते.
हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे वडील देवाघरी गेले.

नवऱ्याची साथ अर्ध्यावरच सुटली आणि सीता खूप एकटी पडली. काय करावं हे तिला सुचत नव्हतं. जीवन नकोसं झालेलं पण आपलं दुःख बाजूला ठेऊन मुलांसाठी खंबीर होऊन त्यांना आधार देण्यासाठी तिला जगणं भागच होतं. मन घट्ट करून तिने मुलांचा सांभाळ करायचं ध्यास घेतला. पडेल ते काम करून ती मुलांना सांभाळत होती.

कसेबसे दिवस जात होते. आता सुधीरची दहावी पूर्ण झाली होती. बापाच्या माघारी मुलं समंजसपणे वागत होती. आपली आई एकटी कमावते याची त्यांना जाणीव होती. शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून सुधीरने आईला मदत व्हावी म्हणून कामाला जायचे ठरवले. तसा तो वयाने लहानच पण त्याच्याकडे समज खूप होती.

आईची धडपड सुधीरला काळात होती त्यामुळे आईला म्हणाला, “आई अग तू एकटीच कुठवर राबनार गं मीही मदत करतो तुला. आपण दोघे मिळून काम केले तर पोटापाण्याची गैरसोय होणार नाही ना.

मुलाचे बोलणे ऐकून सितला गहिवरून आले सुधीरच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली “बाळा तुला काय म्हणू रं आता; किती समजूतदारपणा दाखवतोयस! आर परतू अजून बारका हायस, तुला कुठलं काम जाणार हाय सांग बर?”

“त्याची काळजी तू नको करु, मी बघेन काहीतरी. मला जमेल असच काम करेन तू माझी काळजी सोड.” सुधीर आईला समजावत होता.

कुठंनं इतका शाणपणा आलाय रं तुझ्यात. किती काळजी करतुस माझी. सीता हळवी होऊन बोलू लागली.

वडील नसल्यावर काय हाल होतात हे अनुभवल्यामुळे आता आईची काळजी वाटून सुधीर म्हणाला, “आई अगं तुझ्याशिवाय कोण आहे गं आम्हाला. तूचं आमचं जग आहेस गं. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी.”

“बरं बाबा.. तुला वाटतंय तर कर तू. पण जिवाला जपून कर. लय तरास व्हईल असं काय नको करु म्हंजी झालं.”

“हो गं आई. अवघड कामं नाही करणार मग तर झालं ना!”

“हा.. मग ठीक हाय, जरा जपूनच कामं करायची. आता आपणच एकमेकांना आहोत. तुला दोन बारकी भावंडं हायत हेबी ध्यानात ठीव.”

“हो मला आहे लक्षात. त्यांच्यासाठीच करायचं आहे सगळं. तू निश्चिंत रहा.”

सुधीरचा मित्र महेश जवळच्याच गावात कामाला जात होता. पूर्वी गावाकडे काही कार्यक्रम असेल तर खूप मोठ मंडप घालण्याची पद्धत होती. हल्ली डिझायनर हॉल झाले त्यामुळे ती पद्धत क्वचित ठिकाणीच पाहायला मिळते. ज्या माणसाचा मंडप सेट होता त्याच्याकडे महेश कामाला जात होता. महेश हा सुध्दा सुधीरच्या वयाचाच होता. सुधीर त्याला म्हणाला, “ए भावड्या.. मलापण काम बघ ना तिकडे. तुझ्यासोबत मीही येवू शकतो का रे कामाला?”

पाठीवर थाप मारत महेश लगेच म्हणाला, “होऽऽऽ चालेल की, मी उद्याच विचारतो मालकाला अन् तुला घेऊन जातो सोबत.”

महेशच्या या बोलण्याने सुधीरला खूप आधार मिळाला. आता आपण आपल्या आईला मदत करू शकेल या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

दुसऱ्या दिवशी महेशने त्याच्या मालकाला विचारले अन् त्यांनी सुधीरला घेऊन ये असे सांगितले. घरी आल्या आल्या महेशने ही बातमी सुधीरला दिली तेव्हा त्याला खूप आनंद झाला.

पुढे ते दोघे मिळून रोज एकत्र कामाला जाऊ लागले. खरं तर ते जे काम करत होते ते काम दररोज मिळेल असे नव्हते. शिवाय या कामातून त्यांना म्हणावे असे पैसेही मिळत नव्हते. त्यामुळे ते दोघे या कामातून वेळ मिळेल तेव्हा अजून दुसरे काम मिळतेय का ते शोधत होते. त्यासाठी ते दोघे मिळून सोबतच जायचे.

—---------

क्रमशः

आता अजून दुसरे कोणते काम मिळाले त्यांना? काय होईल पुढे? आईला कसा मदत करेल सुधीर? ते पाहूया पुढील भागात.