नाती जिव्हाळ्याची - भाग २
सुधीर आणि महेश हे दोघेही मेहनती मुलं होती. ते जिथे कामाला जायचे त्या मालकाच्या घराजवळच एक माणूस राहत होता. त्यांचा व्यवसाय म्हणजे पेंटींग. छोटी मोठी घरं, इमारती, बंगले, मोठ्या बिल्डिंग हे रंगविण्याचे काम तो करत करत असे. म्हणजे तो स्वतः काही करत नव्हता म्हणा. तो रंगकमाचे कॉन्ट्रॅक्ट घेत होता. त्याच्या हाताखाली माणसं कामाला होती. महेश आणि सुधीर प्रामाणिकपणे अन् चिकाटीने आपापली कामं चोख करत होती. ते सगळं कॉन्ट्रॅक्टर दररोज पाहत होता.
हे दोघे जेव्हा दुसरे काम शोधत आहेत हे एकदा त्याला समजले तेव्हा त्याने या दोघांना जवळ बोलावले आणि म्हणाला, “पोरांनो तुम्ही हे मंडप घालण्याव्यातिरिक्त दुसरे काम करू शकाल का?पण तुम्हाला ते जमेल का?”
जणू काही देवच पावला अशा आविर्भावात येऊन हे दोघेही एका सुरात म्हणाले, “होऽऽ.. नक्कीच करेन.. का नाही जमणार? काय काम आहे ते सांगून तर बघा!”
दोघांचा इतका विश्वास पाहून कॉन्ट्रॅक्टरसुध्दा भारावून गेला. तो म्हणाला, “ हे बघा मुलांनो.. मी इमारती रंग कामं घेतो. तुम्हाला रंगकाम करायला आवडेल का सांगा? सुरुवातीला थोडंफार मी शिकवेन त्यानंतर तुमचं तुम्हालाच सगळं करावं लागेल. चालेल ना?”
हो.. हो.. नक्की चालेल. आम्हालाही काम हवेच आहे. तुम्ही फक्त कसं करायचे सांगा आम्ही शिकू लगेच.” महेश आणि सुधीरने कॉन्ट्रॅक्टरला आश्वासन दिले.
या दोघांचे त्याला खूपच कौतुक वाटले. तो मनात म्हणत होता, “इतकी छोटी मुलं आणि किती हा आत्मविश्वास.”
आता महेश आणि सुधीर त्या कॉन्ट्रॅक्टरकडे पेंटिंग चे काम करायला जाऊ लागले. सुरुवातीला काही दिवस त्यांना ते काम जमत नव्हते पण कॉन्ट्रॅक्टर समजूतदार होता त्यामुळे त्याने या दोघांना खूप सांभाळून घेतले. हळूहळू काही दिवसातच त्यांना पेंटिंगचे काम खूप छान करता येऊ लागले. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचा विश्वास सार्थ ठरलं होता. तो त्यांचावर खुश झाला. पुढे महेश आणि सुधीर अगदी सराईत पेंटरसारखे रंगकाम करू लागले. त्यात त्यांचा चांगला जम बसला.
काही वर्षांनी सुजयचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा गावातच होती आणि पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण जवळच असलेल्या शेजारच्या गावात झाले. पण आता पुढे कॉलेजचे शिक्षण म्हणजे परगावी जावे लागणार आणि त्या शिक्षणासाठी खर्चही तसाच करावा लागणार. ते शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न सुजय समोर उभा राहिला.
विचारत मग्न असलेला सुजय शांत बसलेले पाहून सुधीर त्याला म्हणाला, “सुजय.. का रे इतका शांत बसलाय असा? काय झालं तुला? तब्बेत तर ठीक आहे ना तुझी?”
“काही नाही रे दादा; मी ठीक आहे. मला काही झालेले नाही.” हिरमुसलेल्या स्वरात सुजय बोलत होता.
“अरे मग इतका हसत खेळत राहणारा मुलगा तू अन असा शांत शांत का बसलायस ते तरी सांग ना?” सुधीर काळजीने त्याची विचारपूस करत होता.
दादा.. अरे मला पुढे शिकायची खूप इच्छा आहे रे पण ते कसं शक्य होईल काहीच कळेना. सुजय आपल्या मनातील सल भावापुढे मांडत होता.
“असं का बोलतोयस? अरे वेड्या.. मी आहे ना! तू का इतकं टेन्शन घेतोयस. तुला हवं तेवढं शिक तू. मी तुला शिकवेन. तू काही काळजी करू नकोस. तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करेन. तू निश्चिंत रहा.” सुधीरने सुजयला आश्वासन दिले.
मोठ्या भावाचे बोलणे ऐकून सुजयला आता खूप आधार मिळाला. त्याने प्रेमाने दादाला मिठी मारली. दोघे भाऊ असे एकत्र पाहून सिताचे मान भरून आले. भावाभावातील प्रेम पाहून ती खूप खुश झाली. मुलांच्या जवळ आली आणि दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, “ तुमा दोघास्नी असं एकत्र बघून लय बरं वाटलं मला. बाळांनो असंच आयुष्यभर एकमेकांना साथ द्या आन् एकमेकांच्या सोबत र्हा. तुमा दोघांला कुनाचीबी दिष्ट लागाया नको.”
सुधीर आईला म्हणाला, “आई तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना.. मी सुजयला हवी ती सगळी मदत करेन. त्याचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी.”
सुधीरचे हे बोलणे ऐकून सुजयला अधिकच बळ आल्यासारखे वाटले. त्याने आपली जिद्द पूर्ण करण्याचा निर्णय पक्का केला. मोठ्या भावाकडे नि आईला पाहून एक वचन दिले, “मी खूप शिकेन आणि आपली ही आत्ताची परिस्थिती एक दिवस नक्की बदलेन. तुम्हा दोघांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. पण दुःख होईल असे कधी वागणार नाही.आपल्यालाही चांगले दिवस येतील आणि ते मी आणेन हा शब्द आहे माझा.”
आई गालात हसत म्हणाली, “हो रे बाळा.. तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या होऊ देत हीच अपेक्षा हाय माझी. लय शिक आन् मोठ्ठा हो. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी हाय.”
—-------
क्रमशः
सुजय दिलेले वचन पूर्ण करेल का? सुधीर सुजयला कशी मदत करेल ते पाहूया पुढील भागात.
—------
©® सौ. वनिता गणेश शिंदे