Login

नाती जिव्हाळ्याची - भाग ८

नाती जिव्हाळ्याची भाग ८
नाती जिव्हाळ्याची - भाग ८

सुजय आणि तन्वी मनातील विचार एकमेकांना सांगत होते. दोघेही आता मोठे झालेले त्यामुळे सारासार विचारबुध्दीने निर्णय घेण्याची क्षमता दोघांकडेही नक्कीच होती. सुजयला तन्वी आवडत होती पण मैत्री तुटू नये म्हणून त्याने तिला तसे कधी बोलून दाखवले नव्हते. अशातच ती तिच्या वडिलांना न पटणारी गोष्ट होती. त्यामुळे तो तिला आपली मैत्री कशी टिकवायची हे सांगत होता.

तन्वीने सुजयच्या नजरेतील भाव ओळखलेले त्यामुळे तिनेच पुढाकार घेण्याचे ठरवले अन् त्याला म्हणाली, “अरे पण सुजय..आपलं नातं फक्त मैत्री पुरतेच मर्यादित आहे का रे? तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का?” तन्वी सुजयला मनातील भावना पटवून देण्याचा प्रयत्न करु लागली.

आता सुजयने ओळखले होते की तन्वी त्याच्या प्रेमात पडलीय पण तो तिच्या तोंडून ऐकू पाहत होता. तिची भावना समजून घेत तो तिला म्हणाला, “तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोलशील का आता!”

तन्वी खूप रडवेली झाली होती तिला व्यक्त होण्याशिवाय पर्याय नव्हता. ती सुजयला म्हणाली, “ मी आता तुला मनापासून खरं खरं सांगतेय, नीट ऐक! माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे रे.. मला तू खूप आवडतोस. अगदी लहानपणापासून. ‘आय लव्ह यू सुजय.’ मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय.”

तिच्या नजरेतील भाव त्याला तिच्या प्रेमात अधिकच खेचत होते. तिचे पाणावलेले डोळे पुसत तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो, “अगं.. अशी रडू नको गं. मीही आज तुला एक गोष्ट खरी खरी सांगणार आहे. इनफॅक्ट कबूल करणार आहे असं समजलं. अग राणी माझंही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे गं. पण तुझ्या मनात काय आहे हे माहीत नव्हते आणि आपली मैत्री मला हवी होती म्हणून मी कधी व्यक्त झालो नाही. पण आज परत एकदा सांगतो. आय लव्ह यू व्हेरी मच.

“तू माझ्या सोबत असलीस तर कुणाशीही लढायची माझी तयारी आहे. तुझे वडील एक दिवस स्वतः तुझा हात माझ्या हातात देतील हा शब्द आहे माझा, विश्वास ठेव माझ्यावर! पण तोवर तू धीर धर.” हा विश्वास सुजयने तन्वीला दिला होता.

सुजय खूप स्वाभिमानी होता. त्याने मनाशी पक्की गाठ बांधली की, “एक दिवस मी इतका श्रीमंत होईन की तन्वीचे बाबा स्वतः माझ्या हातात तन्वीचा हात देतील. माझी जिद्द आहे की माझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेन.”

खरोखरच प्रेमात इतकी ताकद असते की ते कोणतीही गोष्ट करण्याचे बळ देते हे खरंय. मनातील स्वप्न जिद्दीने साकारून सुजय आता एक बिझनेसमॅन झाला होता.

सुजय खूप बिझी झालेला पण त्यातून वेळ काढून तो तन्वीला भेटण्यासाठी मुंबईला गेला होता तो म्हणाला, “माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, आता तुझे वडील मला नाकारू शकणार नाहीत. बघ काही दिवसात तेच आपले लग्न लावून देतात की नाही. काही दिवसच थांब. अन् हो.. जरी ते आपल्या लग्नाला तयार झालेच नाहीत तर मी तुला एकटीला कधी सोडणार नाही. त्यांची संमती घेण्याचा प्रयत्न करूच अन्यथा आपला निर्णय आपण घेऊ. पण तुझी संमती आहे ना यासाठी?”

हे काय विचारण झालं का रे.. मी तर फक्त तुझीच आहे अन् तुझीच राहीन शेवटपर्यंत. तन्वी अगदी भावूक होऊन बोलत होती.

तन्वीसोबत लग्न करण्याचा ठाम निर्णय घेऊन सुजय आपल्या मामाला म्हणाला, “मामा.. मला तन्वीसोबत लग्न करायचे आहे. मला ती खूप आवडते आणि तिलाही मी आवडतो. हा पण एक अडचण आहे?”

त्यावर डोळे टवकारत मामा त्याच्याकडे पाहून म्हणाले, “कोणती अडचण आहे रे? मला सांगशील का?”

सुजय म्हणाला, “ तन्वीच्या वडिलांना आधी मी आवडत नव्हतो कारण मी गरीब घरातील मुलगा होतो. पण आता तसे राहिले नाही ना. मग काय हरकत आहे त्यांना. तुम्ही आमच्या लग्नाची बोलणी करता का त्यांच्याजवळ?”

थोडासा विचार करत मामा म्हणाले, “ओके, मी विषय काढतो त्यांच्याकडे. बघू काय म्हणतात.”

सुजय शांतपणे म्हणाला, “हो चालेल.. पण जरा लवकरच विचारा. मला जास्त दिवस इथे थांबता येणार नाही.”


मामा मोठ्या जोशात येऊन म्हणाले, “हो.. आज रात्रीच विचारतो. जे होईल ते होईल. बघू काय ते एकदाचे. तुझा बार तर उडवून द्यायचाच आहे ना!”

तन्वीचे घर शेजारीच होते त्यामुळे दोन्ही घरात बऱ्यापैकी संबंध होते. तिचे वडील दिवसभर जॉबला जात होते अन् रात्री सातनंतर घरी यायचे. आता रात्रीचे आठ वाजले होते. त्यामुळे सुजयचे मामा तन्वीच्या घरी गेले. त्यांना पाहून तन्वीचे बाबा म्हणाले, काय ओ.. या वेळी कसं काय येणं केलं?”

मामा घरात जाऊन बसले त्यानंतर दोघेजण इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा मारु लागले. शेवटी मामांनी लग्नाचा प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. ते म्हणाले, खरं तर आज खास एका विषयावर बोलण्यासाठी मी मुद्दाम तुमची भेट घ्यायला आलोय आणि ही गोष्ट जाणकारांनी बोलणे जरुरीचे वाटतेय. तुमची परवानगी असेल तर बोलू शकतो का?”

आता हे कोणत्या विषयावर बोलणार बरं? या विचारत असलेले तन्वीचे बाबा म्हणाले, “अच्छा..अच्छा.. काय बोलायचं ते बोलू शकता. काही हरकत नाही.”

—--
क्रमशः

मामांनी लग्नाचा विषय काढल्यावर काय होईल? तन्वीचे बाबा लग्नाला होकार देतील का? ते पाहूया पुढील भागात.

—----

©® सौ. वनिता गणेश शिंदे