Login

उतावळा नवरा - भाग -१

उतावळा नवरा भाग १
शीर्षक - उतावळा नवरा - भाग १

आरशात बघून केस विंचारत थोबडाला खंडीभर पावडर थापून नट्टापट्टा करत दामू स्वतःलाच खालवर न्याहाळत होता.

त्याच्याकडे बघून यशोदा म्हणाली, “ स्वारी कुठं चाललीय म्हणायची.”

“तुला कळत न्हाय का गं आयं? का कळून न कळल्यागत वागतीस? आगं तुझं पोरगं आता लग्नाच्या वयाचं झालंय का न्हाय? मग.. का माझं लगीन लावून दिना झालीयास. तुला तुज्या पोराची कायबी पडली न्हाय बग.” असं गोड बोलून दामू आईला शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करत होता.

“व्हय तऽऽऽर… नुकतंच मिसरुड फुटलेल्या पोरावाणी वागतूय भाड्या. घोड्यागत झालाय पर दमडी कमवायची आक्कल न्हाय तुला, आन् निघाला लगीन करायला. बायकुला काय इक खायाला घालणार हायेस काय? आधी चार पैकं कमवायला शिक आन् मंग लगीन करायला उठ. ‘उतावळा नवरा आन गुडग्याला बाशिंग’ अशी गत झाली हाय तुजी.” यशोदा हातातील भांडी जोरजोराने आदळून घासत तावातावाने आपल्या लेकाला शिव्या घालू लागली.

यशोदाकडे दुर्लक्ष करून दामू घराबाहेर पडला. पोटभर खाऊन, दारोदारी हिंडून उगीच टिवल्या बावल्या करत डेरेदार पोटावर हात फिरवत गप्पा मारणाऱ्या दामूला बघून चिडवण्यासाठी तुक्या म्हणाला, “आर दाम्या अजून किती पॉट वाढवतुस रं? येक दिस फुटंल बिटल‌ बग.”

तुक्याचे बोलणे मनावर न घेता दामू म्हणाला, “हं.. असं कसं फुटंल? ह्या दामूचं पॉट म्हंजी इतकं हालकं न्हाय बरं का तुक्या.”

तुक्यासोबत बोलून तो गावातील पारावर जाऊन पेंगत बसला. बसल्याजागी डुलक्या घेण्याची त्याची रोजचीच सवय. त्या दिवशी छोट्या मुलांनी त्याच्या कानात कोंबडीच्या पिसाने गुदगुल्या केल्या अन् लपून बसले. दामू खाडकन् जागा होत म्हणाला,”आरं कोण हाय त्यो..माझी खोड का काढतुय? झोपल्यालं बघवत न्हाय काय?” असं बोलून तो पुन्हा डुलक्या घेऊ लागला. त्याची फिरकी घेत लहान मुले त्याच्यावर हसत होती.

लेकरु कसलंही असलं तरीपण आईला ते खूप प्रिय असतं. आपल्या मुलाच्या सगळ्या चुका पोटात घालून घेणे हे आईच्या रक्तात किंवा ममतेत भिनलेलेच असते. कोणतेही काम करताना दामू खूप कंटाळा करायचा. आईने काही काम सांगितले की त्याचे उत्तर ठरलेले असायचे, “आगं आये करतू की, थांब थोडा वेळ; इतकी काय घाई हाय तुला?”

यशोदा त्याच्यावर खूप चिडायची. त्याला बडबडत म्हणायची, “मुडदा बसवला तुजा. यक काम धड करत न्हाय. नुसता खादीला खातू आन् बस्तूया; कधी सुधारणार हाय देवालाच ठावं. देवाऽऽ जराशी तरी बुध्दी दे रं बाबा ह्याला. माजा लय जीव गाळतंय कार्ट!”
—-------------
क्रमशः

आइतखाऊ, आळशी दामू लग्न व्हावे म्हणून काय काय युक्त्या करेल ते पाहूया पुढील भागात.
—----------------