Login

आधार हक्काचा - भाग ५(अंतिम भाग)

आधार हक्काचा - भाग - ५( अंतिम भाग)
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

टीम वनिता (संघ २)

आधार हक्काचा

भाग - ५ (अंतिम भाग)


निशा आणि निधीला बाबा भेटल्यामुळे खूपच आनंद झाला होता. सगळीकडे आनंदाने उड्या मारत 'आमचे बाबा आले, आमचे बाबा आले' असे सर्वांना सांगत होत्या. पोरींना पाहून दोघेही आनंदाने एकमेकांकडे पाहून नजरेनेच बोलत होते.

असेच आनंदाचे दिवस जात होते. साजिरीचा सुखाचा संसार पाहून दाजीबाचे मन भरून आले आणि त्याने वर्षभरातच डोळे मिटले ते कायमचेच.

दाजीबा गेल्यावर सगळे म्हणत होते, “पोरीचा संसार पाहण्यासाठीच जणू दाजीबा जिवंत होता.”

दिवसांपाठोपाठ दाजीबा गेल्याचे दुःख विसरून सूरज आणि साजिरी आपल्या संसारात रमून गेले. तो दोन्ही मुलींना सावत्र बाप असल्याचे कधीच जाणवून न देता पोटच्या पोरींसारखा जीव लावत होता. त्यांनी मुलींना खूप शिकवले. चांगले शिक्षण देऊन त्यांना हवी ती नोकरी मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. आता त्या दोघीही स्वतःच्या पायावर उभा राहिल्या होत्या. बघता बघता काही वर्षातच दोन्ही मुली लग्नाच्या वयाच्या झाल्या. सूरज आणि साजिरीने निशा व निधीचे त्यांच्या मनाप्रमाणे योग्य अशी स्थळे पाहून लग्न लावून दिली.

घरात उरले ते फक्त दोघेच म्हणजे साजिरी आणि सूरज. नंतरचे आयुष्य दोघे एकमेकांचे आधार बनून जगू लागले. मुली अधून मधून येत जात असतं, दरारोज फोन करून विचारपूस करत असत.

दोघीही आपापल्या संसारात रमून गेल्या. इकडे साजिरी आणि सूरज आता वयस्कर झाले होते. वयोमानानुसार काम करणे जमत नव्हते. काम करताना सूरज एकदा अचानक पाय घसरून पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.

नेहमीप्रमाणे निधीने साजिरीला फोन केल्यावर साजिरी तिला म्हणाली, “आगं निधी.. काल तुजं बाबा काम करताना पाय घसरून पडलं अन् त्यांचा पाय मोडलाय गं!”

"अरे बापरे! अगं काय सांगतेस आई? मी येते तिकडे, तू अजिबात काळजी करू नको.” म्हणत निधीने फोन ठेवून दिला आणि लगेच काही तासातच ती माहेरी पोचली सुद्धा.

सूरजला पाहून निधीला खूप वाईट वाटले, तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली,"घाबरु नका बाबा! मी आले ना आता. अजिबात काळजी करायची नाही. आजवर तुम्ही आमच्यासाठी खूप केलेय आता आमची बारी.” ताबडतोब तिने वडिलांना दवाखान्यात नेले. जास्त फ्रॅक्चर नव्हते पण तरीही ‘पायावर भार पडू देऊ नका’ असे डॉक्टरांनी सांगितलेले.

साजिरीला एकटीला काही सुधरणार नाही म्हणून निधी आणि निशा आपले वडील ठीक होईपर्यंत त्यांची सेवा करण्यासाठी आणि आई वडिलांना आधार देण्यासाठी आळीपाळीने माहेरीच राहिल्या. दोन्ही मुली आई वडिलांना खूप जीव लावत होत्या.

यांचे हे घट्ट नाते बघून सर्वजण म्हणायचे, “पोरी बापाचे पांग फेडत आहेत. किती जीव लावतात. लहान वयात सूरज मुलींचा आधार बनला आणि आता त्याच्या उतार वयात या दोन मुली त्याचा हक्काचा आधार बनत आहेत. नातं असावं तर यांच्यासारखं. अगदी जीवाला जीव देणारं!”

मुलींना पाहून सूरज आणि साजिरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
—-------------

समाप्त.