ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम वनिता (संघ २)
आधार हक्काचा
भाग -१
“काय दाजीबाऽऽ आरं पोरीचं लगीन करतुस की न्हाय? लग्नाच्या वयाची झाली पोरगी. कवा बार उडवणार हाईस?” गावातील पाराच्या कट्ट्यावर बसलेल्या दाजीबाच्या जवळ जात कोंडीबा त्याच्याकडे विचारपूस करत होता.
लेकीच्या भविष्याची चिंता मनात सतावत असतानाच मित्राने विषय काढताच दाजीबा म्हणाला, “काय सांगू लका, लय काळजी वाटतंय बघ. रातचा डोळ्याला डोळा लागत न्हाई. कसली ती झॉप यत न्हाई गड्या. सारखा मनात साजिरीच्या लग्नाचाच ईचार घोळत अस्तूय. काय करावं कायबी सुचत न्हाय रं?”
दोस्ताच्या खांद्यावर हात ठेऊन धीर देत कोंडीबा म्हणाला, “ये भावा.. आरं आसं म्हणून कसं चालल रं? नगं लय इचार करुस; निघलं कायतरी मार्ग!”
“व्हय रं कोंडीबा, तुझ्या म्हायतीत हाय का यकादं पोरगं? आपल्याला काय सावकार नगंय, फकस्त माझ्या साजिरीला खाऊन पिऊन सुखात ठेवंल असं पॉर भेटाया पायजे. म्हंजी मी मराया मोकळा.” दाजीबा पोरीच्या जबाबदारीतून सुटकेचा श्वास सोडण्यासाठी धडपडत होता.
पण खास जिगरी दोस्त असलेला कोंडीबा जरा ठसक्याने बोलत म्हणाला, “आरं काय बोलतुयस! तुझं तुला तरी कळतंय का? पोरीचं लगीन लावून देणं.. हितवर ठीक हाय, पर इतक्या लवकर मरणाच्या गोष्टी करतूयास. ही काय पटलं नाय ब्बॉ आपल्याला! परत असं बोललास तर तुझ्याबर म्या कधीच बोलणार न्हाय.”
“बरं बरं.. माफ कर मला. न्हाई बोलणार तसं कधी! पर तू रुसू नगं माझ्यावर. आरऽऽ या जगात तुझ्याशिवाय आन् साजिरीशिवाय दुसरं कोण हाय रं मला? तुला तर म्हाईत हाय की माझी बायकू तर आमची पोरगी बारकी असतानाच गिली. तवा तूच मला आधार दिलास न्हव! म्हणून तर म्या सावरू शकलो. तवापास्न आजवर तू माजी साथ कवा सोडली न्हाईस. लय मदत कीलीस, तशीच आताही यव्हढी मदत करणार न्हवं? यकदा तिचं लगीन लाऊन दिलं म्हणजे लय मोठ्या जबाबदारीतन रिकामा होईन. मग काय आपण दोघं असच गप्पा मारत बसाया मोकळं.” दाजीबा कोंडीबाचा रुसवा काढण्यासाठी बोलत होता.
“आरं ही काय इचारनं झालं व्हय रं! आरं तुजी पोर म्हंजी माजीबी पोरच नाय का लका. करुया की काय ना काय जुगाड, आन् थोड्या दिसातच साजिरीचा बार उडवून देऊया. तू कशाला टेन्शन घीतुस! पल्याडच्या गावात माज्या म्हायतीत हाय यक पोरगं. यका मध्यस्थ्याशी बोलून बघुया.” असे म्हणत कोंडीबाने खिशातून फोन बाहेर काढला आणि नंबर डायल करत कुणाला तरी फोन लावला.
—-----------
शिवेपलीकडच्या गावातील एका पाहुण्याला कोंडीबाने फोन केला.
“ हॅलो पाहुणे, कसं काय बरं हाय न्हवं?"
"होय होय.. समदं ठीक हाय! लय दिवसानं आठवण आली आमची.” समोरून फोनवरून पाहुण्यांनी गंमतीदार टोमणा ऐकवला.
"आता काय करायचं, कामात्न यळ तर कुठं मिळतुय सांगा की? आठवण तर येतच अस्ती. बाकी ठीक चालुय का सारं?” कोंडीबा आपुलकीने बोलत होता.
तितक्याच आपुलकीने पाहुण्यांनी उत्तर दिले.
“तुमच्या आशीर्वादानं सगळं ठीकठाक चालूय बघा. आज फोन करायला कसा काय यळ भेटला बरं?”
“तुमच्या आशीर्वादानं सगळं ठीकठाक चालूय बघा. आज फोन करायला कसा काय यळ भेटला बरं?”
“आवं, हुतं एक काम म्हणून तातडीनं आठवण आली. एक ईचारायचं हुतं! इचारू काय?"
“बिनधास्त इचारा की राव!” पाहुणे पटकन बोलून गेले.
“तुमच्या मुलाचं लगीन करायचं हाय, आसं ऐकायला मिळालं. त्यासाठीच फोन केलाय. एक स्थळ हाय आमच्याकडं. मुलगी दिसायला बरी हाय. काम एकदम झक्कास करती. कामात कुठंबी कमी पडणार नाय बघा.
मग तुमाला जमणार आसल तर कधी येताय ती सांगा? कसंय अगोदर फोन करा, म्हणजे इकडच्यांना तशी कल्पना द्यायला बरं!” कोंडीबाने कामापुरती थोडक्यात मुलीची माहिती देऊन टाकली.
मग तुमाला जमणार आसल तर कधी येताय ती सांगा? कसंय अगोदर फोन करा, म्हणजे इकडच्यांना तशी कल्पना द्यायला बरं!” कोंडीबाने कामापुरती थोडक्यात मुलीची माहिती देऊन टाकली.
“बरं बरं.. घरातल्यांना इचारतो. नवऱ्या मुलाचं पण मत घेतो आन् मग कळवतो तुमाला कधी येणार ती!” पाहुण्यांनी कोंडीबाला त्यांचं मत सांगितलं.
कोंडीबा म्हणाला,“चालंन, चालंन.. अमी वाट बघतो तुमच्या फोनची. आता ठीवू का फोन?”
“ठीक हाय.. ठेवा मग.” म्हणत पाहुण्यांनीही फोन बंद केला.
दोन दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी पाहुण्यांचा फोन आला.
“आमी येतोय उद्याच्याला पोरगी बघायला.” त्यांनी सांगितले .
“आमी येतोय उद्याच्याला पोरगी बघायला.” त्यांनी सांगितले .
“बरं बरं, चालतंय की! सांगतो पोरीच्या घरी; या आमी वाट बघतो.” खुश होऊन कोंडीबा बोलत होता.
दुसऱ्या दिवशी साजिरीला पाहायला मुलगा आला. साजरी नटून थटून आवरून बसली होती. नावाप्रमाणेच ती दिसायलाही साजरी होती. नाकी डोळी नीटस. मध्यम बांध्याची, तिचे डोळे घारे, नाक लांब सडक, काळेभोर केस, रंगाने जरा सावळीच पण चेहरा अगदी उठावदार दिसत होता. साडीत तर अगदीच खुलून दिसू लागलेली.
पाहुणे मंडळीसमोर साजरी येऊन बसली. तिच्यासमोरच नवरा मुलगा बसला होता.
दिसायला जणू राजबिंडा, गोरापान, रुबाबदार. जास्त शिकलेला नव्हता, बारावी पास होता. पोटापुरते कमवत होता. मुलीला काही कमी पडणार नाही याची हमी देत होता.
“साजिरी आईविना वाढलेली पोर हाय, पण ती अतिशय संस्कारी आन् गुणी मुलगी हाय. परिस्थितीची जाणीव हाय तिला. लहानपणापासूनच तडजोड तिज्या रक्तात भिणल्याली हाय. सैपाकात बी लय उत्तम हाय बरं का! तुमास्नी तक्रारीला जागा मिळायची न्हाय. लय गुणाची हाय आमची साजिरी.” असं बरंच काही सांगून कोंडीबा साजिरीचे गुणगान सांगत होता.
नवऱ्या मुलाचे नाव महेंद्र. तो स्वभाने अगदी शांत होता. बोलाचाली होताच दोन्ही कुटुंबांना स्थळ पसंद पडले आणि लग्नाची पुढची तयारी सुरू झाली. काही दिवसातच साजिरी आणि महेंद्रचे लग्न पार पडले. आणि त्याचा संसार सुरू झाला.
—------------
क्रमशः
क्रमशः
©® सौ. वनिता गणेश शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा