Login

आधार हक्काचा - भाग - ३

आधार हक्काचा भाग ३
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

टीम वनिता (संघ २)

आधार हक्काचा

भाग -३


साजिरी एकटी असल्यामुळे जगातील वाईट लोकांच्या वासनी नजरा, वाईट विचार आणि वाईट बोलणे हे सगळे सोसत ती जगत होती. जुन्या विचारांच्या काही म्हाताऱ्या टोमणे मारत म्हणायच्या, “काय करावं बाई! हीचा नवरा तर हिला सोडून गेला. हीच्यातच काय तरी खोट आसंल, त्याशिवाय जाईल का कुणी? बरं गेला ती गेला पर मागं आलाबी न्हाय, काय झालं त्याचं, देवालाच ठावं!”

लोकांचे टोमणे ऐकून साजिरीला खूप वाईट वाटायचे. रात्र रात्रभर तिला झोप लागत नसे. या बुरसटलेल्या विचारांच्या जगात एकट्या स्त्रीने जगणे तितकेसे शक्य नव्हते.

साजिरीने नवऱ्याचा खूप शोध घेतला पण आठ वर्षे होऊन गेली तरी त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता.
मनाने खचलेल्या सजिरीला एकटेपणा खात होता. तिला आता एका भक्कम आधाराची उणीव भासत असे.
अशातच एक दिवस वयाने तिच्यापेक्षा थोडीशी मोठी असलेली तिची शेजारीण नर्मदा घरात येऊन बसली. दोंघीच्या गप्पा सुरू असताना नर्मदा तिला म्हणाली, “साजिरी.. आगं अशी एकटी किती दिस ऱ्हाणार गं बाई? या दुनियेत तरण्या ताठ्या बायनं जगणं म्हंजी इस्तवासंगं खेळण्यागत हाय बघ!”

"मला समदं कळतंय वैनी, पण तेला काय इलाज हाय का सांगा की तुमीच? माजं मेलीच नशीबच फुटकं हाय म्हणायचं नाय तर काय वं! लगीन झालं अन् दोन अडीच वर्षात नवरा मंबैला जातो म्हण गेला ती बेपत्ताच झाला. बापाचा आधार हुता तर देवानं तेलाबी धरणीवर लोळत पाडलं. आत या दोन पोरींना कसं सांभाळायचं? काय करायचं? माजं तर डोकं काम देत नाय बघा!” साजिरी नर्मदाजवळ आपलं मन मोकळं करत होती.

“म्हणूनच माझ्या डोक्यात एक इचार आलाय त्यो तुला पटतूय का सांग? मला तर आसंच वाटतंय की तू दुसरं लगीन करावंस. आगं म्हंजी तुज्या पोरीस्नी बापाचं पिरेम मिळंल आणि तुलाबी हक्काचा आधार मिळंल गं!” नर्मदा साजिरीला जगण्यासाठी नवीन दिशा दाखवत होती.

अचानक विषय काढल्यामुळे गोंधळलेली साजिरी पटकन म्हणाली, “काय पण काय बोलताय वैनी! आवं मला दोन लेकरं हायती आणि या वयात माझ्याशी कोण लगीन करणार हाय वं?"

साजिरीच्या भल्यासाठी धडपडणारी नर्मदा म्हणाली, “ तू फक्त व्हय म्हण! बाकीचं मी बघती. आगं माझ्याकडं हाय एक पोरगं. सभावान आगदी तुज्यावाणीच हाय बघ. शांत, संयमी, सुसभावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हंजी तुला तुझ्या पोरींसकट स्वीकारंल असाच हाय. त्येला पण बायको न्हाय. एकटच ऱ्हातुय. तुमच्या दोघांचं लगीन झालं तर त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटलं अन् तुज्याही. दोघं एकमेकांचा आधार बनून नवीन आयुष्य जगावं असं मला वाटतं गं!”

साजिरी नर्मदाच्या बोलण्याच्या विचारत हरवून गेलेली असताना नर्मदा पुन्हा एकदा साजिरीकडे पाहत म्हणाली, “निवांत विचार कर एक दोन दिस, अन् मला तुजा निर्णय सांग. तुझ्या होकाराची मी वाट बघती. हे बघ साजिरी यात तुझा फायदाच व्हईल. नीट विचार कर अन् मला लवकर सांग.” असे म्हणत ती तिच्या घरी निघून गेली.

—-------
क्रमशः