Login

जडली प्रीत ही न्यारी - भाग १

जडली प्रीत ही न्यारी भाग १
जडली प्रीत ही न्यारी - भाग १


असाच होता, मनात माझ्या,
माझा साजन गं….
स्वप्नी पाहिला तसा भेटला
माझा साजन गं …
माझ्या सजना, रे माझ्या राजा…


हे गाणं गुणगुणत सानिका आपल्या कामात मग्न होती. मागून हळूच येऊन तिचे डोळे बंद करून प्रशांत गुपचूप उभा राहिला. पण तिने पटकन त्याचा स्पर्श ओळखला अन् लाजून म्हणाली, “अहो.. तुम्ही कितीही लपून छपून आलात अन् डोळे बंद केले तरी बंद डोळ्यांना त्याचा काही फरक पडत नाही हं.”

लाडेलाडे प्रशांत तिला विचारू लागला, “ते कसं काय बरं?”

“गेली पाच वर्षे अनुभवते आहे हा स्पर्श. मग त्याला डोळ्यांची गरज कशी पडेल! सांगा ना?”

तसा प्रशांत सानिकाचे झाकलेले डोळे सोडून तिच्या समोर येत म्हणाला, “ हाऽऽ हे मात्र अगदी बरोबर बोललीस बघ. आपल्या प्रिय व्यक्तीला डोळे बंद असतानाही ओळखता येते कारण त्या व्यक्तीचा स्पर्श अगदी जवळचा असतो.”

“नवरा बायकोचं नातंच असं असतं ओ! मनातील भाव समजून घेणारा तुमच्या सारखा नवरा मला मिळाला हे माझे भाग्य आहे.” असे बोलताना तिच्या नजरेत नवऱ्याविषयी असलेले प्रेम स्पष्ट दिसत होते.

“तुम्हाला आठवतं का ओ! आपली ओळख कशी झाली ते?” प्रश्नार्थक नजरेने पाहत सानिका प्रशांतला विचारू लागली.

हो मग… अजूनही ते दिवस आठवले की त्याच आठवणीत मन हरवून जातं.

बोलता बोलता ते दोघेही भूतकाळातील गोड आठवणींत रमून गेले.

प्रशांतला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड अन् सानिकाला लिखाणाची खूप आवड. त्याला काही वाचायला मिळाला रे मिळाला की तास न् तास वाचन करत बसायचा. काहीजण तर त्याला वाचन वेडा म्हणायचे. लहानपणी प्रशांतचे वडील त्याला गोष्टींची पुस्तके आणून देत असत. नंतर तो जसा शाळेत जाऊ लागला तसे तो स्वतः च हवी ती पुस्तके आणून वाचायचा. तर सानिकाला कथा, कविता, चारोळी, लेख असे काहीसे लिहायची. त्यासोबत तिलाही वाचानाची आवड होती.

प्रशांत कॉलेजला जावू लागला आणि पुस्तकांऐवजी मोबाईल फोन वापरू लागला. पूर्वी सगळ्यांकडे साधे कीपॅड फोन असायचे. त्यावरून फक्त येणारे अन् जाणारे कॉल इतकेच काय ते संवादाचे माध्यम होते. नंतर त्यात थोडी सुधारणा होऊन फेसबुक या मध्यामाची भर पडली. त्यामध्ये अनोळखी व्यक्तीशीही संपर्क होऊ लागला. न पाहता कुणासोबत ही मेसेजद्वारे बोलता येऊ लागले. फेसबुकाचा वापर काही लोक मनोरंजन किंवा आवश्यकता म्हणून करायचे तर काहीजण फक्त टाईमपास म्हणून करायचे. अनेकजण तर फसवणूक सुध्दा करायचे. कुणावर विश्वास ठेवायचा अन् कुणावर नाही ते कळनेही अवघडच.

प्रशांत मात्र बाहेरून पुस्तक आणून वाचाण्याऐवजी फेसबुकवर वाचनाचे साहित्य शोधायचा अन् वाचायचा. कॉलेज पूर्ण झाले अन् तो जॉब करू लागला पण त्याचे वाचन काही बंद पडले नाही. कामावरून घरी आले की रात्री निवांतक्षणी तो वाचन करायचा त्याशिवाय त्याला झोपही लागत नसे.

वाचनाच्या सवयीतून प्रशांतला लिखाणाची सवय जडली. मनात अन् डोक्यात शब्दांचा साठा खूप असल्यामुळे अतिशय उत्तम प्रकारे त्याला कवितांची रचना करता येऊ लागली. पुढे जाऊन तो स्वतः फेसबुकवर आपल्या कविता पोस्ट करू लागला.

फेसबुकवर काही ग्रुप असतात तिथे काहीजण काव्य स्पर्धा घेतात. असेच एक ठिकाणच्या गृपवर चित्रकाव्य स्पर्धा होती. त्यात प्रशांतने आणि सानिकाने भाग घेतला होता. तेव्हा त्या दोघांची ओळख झाली. तिथल्या कविता वाचता वाचता त्याने सहज सानिकाची रचना वाचली अन् त्याला ती खूप आवडली. हुबेहूब चित्राला साजेशी रचना होती तिची. इतकी उत्कृष्ट मांडणी, शुद्ध व्याकरण आणि वास्तविक वाटणारे लिखाण पाहून तो भारावून गेला. विचार करण्यास भाग पाडणारे तिचे लिखाण त्याला खूप आवडले.

सानिका म्हणजे एक साधी सरळ मुलगी. जी आपल्या आई वडिलांवर निस्सीम प्रेम करणारी, नाकासमोर चालणारी, जॉब करून आई वडिलांना मदत करणारी अन् वेळ मिळेल तसे लिखाणाची आवड जोपासणारी अशी होती.

ती नेहमी स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलवर तिच्या कथा, कविता पोस्ट करत असे. तिच्या पोस्ट लगेच वाचता याव्यात म्हणून त्याने तिला तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, पण सानिकाने त्याची ती रिक्वेस्ट लगेच स्वीकारली नाही. तिला एक सवय होती की कुणीही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर आधी त्याची पूर्ण प्रोफाईल चेक करायची आणि मनाला पटले तरच मैत्री स्विकारायची.

प्रशांतने सानिकाला पर्सनल मेसेज केला, कारण त्याला तिच्याशी बोलावेसे वाटू लागले. मेसेजद्वारे तो तिला म्हणाला, “नमस्कार मॅडम.. मला तुमच्या कथा अन् कविता खूप आवडतात. खूप छान रचना असून उत्तम प्रकारे मांडणी केलेली असते.”

“आभारी आहे तुमची. तुमच्यासारखे वाचक असतील तर लिखाणाचे सार्थक होते.” असा रिप्लाय सानिकाने त्याला दिला.”

“माझ्याशी मैत्री कराल का?” असे निःसंकोचपणे प्रशांतने तिला विचारले तेव्हा ती त्याच्याशी मैत्री करायला लगेच तयार झाली नाही.

तिने ‘बघू’..म्हणून वेळ मारून नेली.

त्यानंतर तिने प्रशांतचे प्रोफाईल तपासून पाहिले. त्याच्यावरील माहिती तिला बरी वाटली. तसेच त्याच्या काही कविता वाचल्यवर तिला त्या आवडल्या. अगदी काळजाला भिडणारे, मनात खोल रुतणारे शब्द त्याच्याही कवितेत होते. तोसुद्धा एक साहित्यप्रेमी आहे त्यामुळे मग तिने त्याच्याशी मैत्री करायचे ठरवले. तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.

त्यानंतर तिने प्रशांतला मेसेज केला आणि म्हणाली, “मी तुमच्याशी मैत्री करायला तयार आहे.”

त्याला खूप आनंद झाला. तो तिला म्हणाला, “मला माहित होतं की तुम्ही माझ्याशी नक्की मैत्री कराल.”

सानिकाला त्याच्या बोलण्याचे नवल वाटले. आश्चर्याने ती म्हणाली, “असं का बरं! इतकी खात्री कशी काय?”

मनाने चांगली असणारी माणसं दुसऱ्याचं मन समजून घेतात. अन् आजवरच्या माझ्या माहितीनुसार तुमचा स्वभाव खूप छान आहे. एखाद्या विषयी मनातून काही संकेत येतात म्हणूनच मला खात्री वाटत होती.

“खरं सांगू का या सोशल मीडियावर माझा सहसा विश्वास नाही बसत. कारण हे एक आभासी जग आहे. यात कुणी कुणाशी कितपत खरं बोलेल हे सांगता येत नाही. अन् अनोळखी व्यक्तींवर कसा विश्वास ठेवावा हेच कळत नसतं.” सानिका स्वतःचे मत प्रशांतला पटवून देत होती.

“हो मलाही माहित आहे. पण सगळे सारखेच नसतात. या जगात अजूनही बरीच माणसं आहेत जी खरेपणा मानतात अन् तसे वागतात. विश्वासावरच तर कोणतंही नातं अवलंबून असतं ना?” प्रशांत सानिकाला समजावत होता.

“तुमचं बरोबर आहे ओ! पण ती माणसं कशी ओळखायची हा सुद्धा एक प्रश्नच आहे ना?”

“त्यासाठीच एकमेकांशी बोलणे महत्त्वाचे असते. संवादातून माणूस बऱ्यापैकी समजतो असे मला वाटते.”

“तुमचंही बरोबर आहे, पण तरीही मनात कुठेतरी भीती असतेच. कारण हे अनोळखी जग आहे हे तरी मान्य आहे ना!”

“हो नक्कीच. मी सहमत आहे.”

त्यांच्यात या अशा गप्पा रंगात गेल्या. त्यांनी एकमेकांची जुजबी माहिती शेअर केली त्यातून हे समजले की दोघेही उच्च शिक्षित असून जॉब करतात. त्याचसोबत आपल्या आवडी जोपासतात.

पुढे असेच अधूनमधून त्यांचे मेसेजवरचे बोलणे चालू झाले. दोघेही एकमेकांचे मत व्यक्त करत होते. अन् त्यातूनच त्यांना एकमेकांचे स्वभाव अधिक समजू लागले. हळूहळू त्यांच्यातील बोलणे वाढले, अन् संवादामुळे त्या दोघांच्यात आता चांगली मैत्री तयार झाली होती. ते एकमेकांची सुख- दुःखं शेअर करू लागले. त्याला तिचा स्पष्टवक्तेपणा खूप आवडला होता. तसेच सानिका स्वत:पेक्षा जास्त आपल्या कुटुंबाचा विचार करते हे प्रशांतच्या मनाला जास्त भावलेले.


—----------

क्रमशः

प्रशांत आणि सानिकाची मैत्री कोणते वळण घेते ते पाहूया पुढील भागात