Login

जडली प्रीत ही न्यारी - भाग २

जडली प्रीत ही न्यारी - भाग २
मागील भागात आपण पाहिले की प्रशांत आणि सनिकाची ओळख फेसबुकवर होते. त्यांची गट्ट मैत्रीही होते आता पाहूया पुढे काय झाले.


जडली प्रीत ही न्यारी - भाग २


दोघांचे विचार जुळत होते त्यामुळे त्यांचे चांगलेच पटू लागलेले. एखादा विषय मिळाला की बराच वेळ त्यावर त्यांची चर्चा रंगत असे. प्रशांत अन् सानिकाची आता छान मैत्री झालेली. तसे पाहायला गेले तर प्रशांत हा अबोल होता पण एकदा का कुणाशी ओळख झाली की तो मनापासून त्याच्याशी बोलत असे. सानिका ही अगदीच मनमोकळी अन् बिनधास्त बोलणारी होती. एकदा मैत्री केली तर ती मैत्री निभावण्याचा मनापासून प्रयत्न करायची. परखड स्वभावाची असल्यामुळे तिला जर काही गैर वाटले तर ती शांत बसत नसे. ‘जशास तसे’ असे वागणे तिला आवडायचे.

तो अबोल आणि ती बोलकी अशा दोन विरुद्ध टोकाचे असूनही त्यांचे विचार जुळत होते त्यामुळे मैत्री अधिकच बहरत गेली.

प्रशांतला तिच्या या स्वभाव अतिशय आवडू लागला. तिचा हा बिनधास्तपणा त्याला आवडत असे. तिचे लाघवी बोलणे, तिच्यातील खरेपणा, भविष्याबद्दलचे तिचे विचार, कुटुंबाविषयीची ओढ, काळजी असे बरेच गुण त्याला खूप आवडायचे. त्याला तिच्याशी बोलण्याची इतकी सवय झाली की एखादे दिवस जरी तिच्याशी बोलणे झाले नाही तर त्याला अस्वस्थ वाटायचे. तिला न पाहताच त्याला हळूहळू ती खूप आवडू लागली होती. नकळत तो तिच्यात कधी गुंतला ते त्यालाही कळले नाही.

पण प्रशांतने तिला तसे कधीच जाणवू दिले नाही. तिचा स्वभाव पाहून तो तिला काही विचारायला घाबरत असे. अजूनही त्यांचे फक्त मेसेजनेच बोलणे होत असे. खूप विचार करून शेवटी धाडस करून प्रशांतने एकदा तिच्या मनातील भावना जाणून घ्यायचे ठरवले.

बोलता बोलता मुद्दाम तो तिला म्हणाला, “तुम्हाला एक विचारायचे होते पण रागावणार तर नाही ना?”

“आता अन् हे काय नवीन? रागवायचं काय त्यात. पटकन बोला जे काय बोलायचे ते!” सानिकाने जरा स्पष्टच बोलली.”

समोरून काय रिप्लाय येईल? आपली आहे ही मैत्री तुटेल का? ही भीती मनात होतीच पण तरीही मन मोकळे करणे गरजेचे होते म्हणून त्याने शेवटी विषय काढलाच. तो म्हणाला, “तुम्ही कधी प्रेमात पडला नाही का कुणाच्या?”

तिने हसण्याची स्माईली पाठवली अन् म्हणाली, “प्रेम.. अन् मी.. ! माझा अन् प्रेमाचा दूर दूर संबंध नसतो. प्रेम या गोष्टीवरचा भरोसा उडालेला आहे माझा. कसं असतं ना.. मुलगी फक्त आपली होईपर्यंत मुलं खूपच प्रेम उतू जातंय असं दाखवतात. पण एकदा का ती आपली झाली की त्यांचे खरे रंग दाखवतात!”

तिच्या या उत्तरमुळे प्रशांत गोंधळात पडला. असे का बोलते ही, त्याला कळेना म्हणून तो तिला म्हणाला, “असे का बोलताय काहीच कळेना. तुम्हाला कुणी धोका दिलाय का?”

तिने परत हसण्याची स्माईली पाठवली.

“आता काय झाले हसायला?”

“हसू नाही तर काय करु. मी आधीच सांगितले ना की माझा नि प्रेमाचा दूर दुरचाही संबंध नाही. तरीही माझा प्रेमभंग झालाय का? असे विचारताय.”

“ओके सॉरी.. पण असे का बोललात ते तरी सांगाल का?”

“मी स्वतः काही अनुभवले नाही पण माझ्या एक दोन मैत्रिणीचा अनुभव जवळून पाहिलाय. इतकेच काय माझ्या शेजारचे काका काकू यांचाही प्रेम विवाह झालाय पण आता तो रोज दारू ढोसून येतो अन् काकूला मारतोय. हे असं असतं का प्रेम?”

“प्रेमाचा खरा अर्थ मुलांना नक्की समजतो का? हा प्रश्नच आहे. त्यामुळे मी प्रेमाच्या भानगडीत पडत नाही.”

“मग तुमच्या मते प्रेम कसं असावं?”

“प्रेम निस्वार्थी अन् निरपेक्ष असावं, असं मला वाटतं.”

“हो नक्कीच. अगदीच बरोबर आहे.”

“काही उदाहरणे डोळ्यासमोर घडताना पहिली की पुरूषांवरचा विश्वास उडतो त्यामुळे आपलं काम करणे आई वडिलांना मदत करणे आणि निवांत राहणे मला बरे वाटते.” ती नाराजीच्या सुरात बोलत होती.

“असं काही नसतं ओ. सगळेच पुरुष सारखे नसतात बरं! प्रशांत मुलांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होता. एकदा विश्वास ठेवून बघायचा. तुम्हालाही तसाच अनुभव येईल असे तर नाही ना.”

“हो काऽऽऽ. बर.. पण निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती मिळायला तर हवी. ती माझ्या नशिबात असेल याची काय खात्री?”

“मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्या ते लक्षात येईना. तो मनातील भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता पण सांगताना खूप घाबरतही होता. ती कशी रिॲक्ट करेल त्याचा काही नेम नव्हता.”

“म्हणजे? .. तुम्हाला जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला ना. मला असे अडून अडून बोललेले समजत नाही अन् आवडत ही नाही.”

“अच्छा! ठीक आहे मी आता स्पष्टच विचारतो. पण रागावून आपली मैत्री तोडणार नाही असे प्रॉमिस करा.”

“ओके.. नाही तोडणार. आता बोला.”

“मला…. मला तुम्ही खूप आवडता! माझे तुमच्यावर प्रेम आहे हेच सांगण्याचा कधीपासून प्रयत्न करतोय.” अखेर त्याने मनातील भावना सानिकाला सांगून मोकळा श्वास सोडला.

गोंधळून गेलेल्या सानिकाला क्षणभर त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही म्हणून ती म्हणाली, “काहीही बोलू नका.. कसलं प्रेम अन् कसलं काय? एखाद्या व्यक्तीला न पाहता कुणी त्याच्या प्रेमात पडतं का कधी? जरा पटण्यासारखं तरी बोला.”

“का नाही पडणार बरं? चेहरा पाहून किंवा सौंदर्य पाहून प्रेमात पडणं वेगळं अन् मन किंवा स्वभाव पाहून प्रेमात पडणं वेगळं. तुम्हाला मी पाहिले नाही हे बरोबर आहे, पण मी तुमच्या स्वभावाच्या प्रेमात पडलोय. तुम्ही कसेही असलात तरीही हरकत नाही, पण मला तुम्ही खूप आवडता.”

तिच्यासाठी तो एक चारोळी पाठवतो…

“कधी रूसावे कधी हसावे
मन होई श्रावणसरी
कसे कळेना मनास माझ्या
जडली प्रीत ही न्यारी”


तिला काय उत्तर द्यायचे ते सुचेना. प्रशांत कितपत खरं बोलतोय ते तिलाही न समजणारे कोडे होते. गोंधळलेल्या अवस्थेत ती म्हणाली, “जाऊ दे.. मला प्रेमाच्या भानगडीत पडायचेच नाही! मी लग्न झाल्यावर नवऱ्यावर प्रेम करेन. बाकी या असल्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही.”

“अहो.. मग मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तुमची मर्जी असेल तर. फक्त तुमचा होकार आहे का सांगा. आहात का तयार?” असा प्रश्न त्याने तिला केला.

प्रशांत एक सुशिक्षित असून जॉब करणारा, आपले कुटुंब म्हणजे आई आणि भावाला सांभाळणारा मुलगा होता. तो स्त्रियांचा मान ठेवतो. बोलताना खूप आदराने बोलतो. तिला त्याचा हा स्वभाव खूप आवडायचा. बोलण्यावरून तर तो एक गुणवान आणि प्रामाणिक मुलगा वाटत होता पण तरीही सानिकाला त्याचे बोलणे म्हणावे इतके पटले नव्हते.

तिच्या मनात आले की कितीही झाले तरी फेसबुक म्हणजे एक आभासी जग आहे. त्यात असे कुणालाही न पाहता, प्रत्यक्ष न भेटता पटकन कसा काय विश्वास ठेवायचा. शेवटी ती विचार करु लागली, “हा इतकं बोलतोय पण तो त्याच्या मतावर कितपत ठाम राहू शकतो अन् आपल्या विश्वासाला हा किती पात्र आहे हे पाहायलाच हवे. एकदा का याने प्रत्यक्ष पाहिले की याचे प्रेमाचे भूत आपोआप उतरेल. कारण मी काही इतकी अप्सरा नाही. एका सामान्य मुलीच्या प्रेमात असं न पाहता कुणी पडेल का?”

तिचे एक मन म्हणत होती की, “तसा तो चांगला मुलगा वाटतोय खरं, चांगला मित्र म्हणून विश्वास ठेवायला काय हरकत आहे. पण तो बोलतोय तसे वागतोय का? टाईमपास तर करत नाही ना! याची परीक्षा घ्यायला हवी.” नकळतपणे तिलाही तो आवडू लागला होता.

सानिकाला एकटीला निर्णय घेणे पटत नव्हते. ती तिच्या घरच्यांच्या मनाविरुद्ध वागणार नव्हती. म्हणून ती त्याला म्हणाली, “तुम्ही एक काम करा”.

आता ही काय करायला सांगते हे पाहण्यासाठी तो आतुर होऊन म्हणाला, “हो.. बोला. तुमच्यासाठी काय करू ते सांगा!”

“मग ऐका..तुम्हाला जर मनापासून माझ्याशी लग्न करायचे असेल अन् खरंच प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या गावी माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घाला. जर माझ्या घरच्यांनी होकार दिला तर माझी काहीच हरकत नाही.”

प्रशांतचे तिच्यावर मनापासून प्रेम होते त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता त्याने तिच्या घरी जायचा निर्णय घेतला. तो म्हणाला, “ओके चालेल… येईन मी तिकडे. पण कधी अन् कसे यायचे ते कळवा फक्त.”

“हो कळवते.” आधी घरात तशी कल्पना देऊन ठेवते. ते जेव्हा यायला सांगतील तेव्हा मी बोलावते.”

“ठीक आहे. काही हरकत नाही. मी वाट पाहीन.”

—-------

क्रमशः

प्रशांत सानिकाच्या घरी कसा पोहोचेल ते पाहूया पुढील भागात.

—--------


©® सौ. वनिता गणेश शिंदे