Login

जडली प्रीत ही न्यारी - भाग ३

जडली प्रीत ही न्यारी - भाग ३
मागील भागात आपण पाहिले की प्रशांत सानिकाला न पाहता न भेटताच तिच्या प्रेमात पडतो. तिला लग्नासाठी मागणी घालतो. ती त्याला तिच्या घरी बोलावते. आता पाहूया तो काय करतो.


जडली प्रीत ही न्यारी - भाग ३


“आईऽऽ तुला एक सांगायचे आहे गं.”सानिका मनातील तिढा सोडवण्यासाठी आईशी बोलू लागली. आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती.
“हा.. बोल ना बाळा.” मुलगी काय सांगते ते ऐकण्यासाठी काम करायचे थांबून आई तिच्याकडे पाहते.

“अगं.. मला एका मुलाने प्रपोज केलंय.. म्हणजे लग्नासाठी मागणी घातलीय.”

“हो का.. मग तू काय सांगितलेस?” पोळी लाटता लाटता आईने तिच्याकडे वळून विचारले.

“त्याला मी बोलले की माझ्या घरी येऊन मागणी घाल. तुम्ही जे म्हणाल तेच मी करणार गं!काय करू तू सांग बोलवायचे का त्याला.”

“हे बघ सानिका.. आपण दोघी निर्णय घेऊ शकत नाही. आपल्या घरात सगळे मिळून निर्णय घेतात. तू तुझ्या वडिलांना अन् दादा वहिनीला सांग. सगळेजण काय म्हणतात ते बघ. ते जर हो म्हणाले तर बोलव त्याला.”

“हो चालेल.. मी उद्याच बोलते बाबांशी.” अस म्हणत सानिका बाहेर निघून गेली.

त्या रात्री जेवायला सगळे एकत्र बसले तेव्हातिने जे आईला सांगितले तेच बाबांना आणि दादा, वहिनीला सांगितले.

मुलीच्या आयुष्याचा विचार डोळ्यासमोर दिसला अन् बाबा पटकन म्हणाले, “अगं पोरी.. तुमची ओळख तर फेसबुकवर झालीय असं म्हणतेस, मग तो खरं बोलत असेल कशावरून?”

“बाबा तो खर बोलतोय की खोटं.. हे पाहण्यासाठीच तर त्याला मी आपल्या घरी बोलवले आहे ना.”

सगळी परिस्थिती सांभाळून घेत दादा म्हणाला, “तुला मान्य असेल तर मुलाला बोलावून घे. लग्न तुला करायचे आहे. तुझी पसंद ती आमची पसंद, अन् तू चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची खात्री आहे आम्हाला.”

“मग.. कधी घेवू बोलावून ते सांगा?” सानिकाने उत्साहाने बाबांना विचारले.
‘परवा’… बाबा अन् दादाने एका सुरात एकाच वेळी उच्चारले. अन् सर्वांना हसू फुटले.

“चालेल… मी परवाच त्याला बोलवून घेते इकडे. बघू काय होतंय!” असा बोलून जेवण करु लागली.


सानिकाने प्रशांतला मेसेज केला अन् म्हणाली, “परवा गुरुवारी तुम्ही इकडे येऊ शकता का?. मी तशी घरी कल्पना दिली आहे.”

“हो नक्की येईन. मलाही तुम्हाला भेटायचे आहे. मी येणारच आहे ओ, पण त्यासाठी तुमचा पत्ता अन् फोन नंबर द्याल की नाही?” फोन नंबर यासाठी की वाटेत रेंज असेल नसेल पत्ता नाहीच सापडला तर फोन करून विचारता यावे म्हणून”

“हो… हो… देते. इतकं स्पष्टीकरण नका देऊ.” म्हणून तिने तिचा पत्ता अन् फोन नंबर दिला.

या दोघांचे बोलणे झाल्यावर प्रशांतने त्याच्या जिवलग मित्राची म्हणजे शंतनुची गाठ घेतली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “ए भावा मी काय म्हणतो ऐक ना.. पण तू नकार द्यायचा नाहीस बरं!

“अरे आधी सांग तर खरं!” शंतनुने प्रशांतच्या पाठीवर थाप टाकली.

“अरे मला एक मुलगी आवडलीय रे.. तिला लग्नासाठी मागणी घालायला जायचंय. तुला माझ्यासोबत यावं लागेल.”

“काय.. काय सांगतोस काय!” डायरेक्ट लग्नच.”
शंतनु आश्चर्याने विचारू लागला.

“अरे हो खरंच.. मी मस्करी नाही करत. मला फेसबुकवर एक मुलगी भेटली. तिच्याशी छान मैत्री झाली, ती खूप आवडते मला. तिच्या प्रेमातच पडलोय रे मी. पण ती म्हणते की घरी येवून मागणी घाला. तू ही चल ना सोबत.”

“ ए नको रे बाबा. ती गोड बोलून बोलवून घेईल अन् तिच्या घरचे आपल्याला बेदम मारतील. त्यापेक्षा नकोच रे बाबा!” घाबरलेला शंतनु बोलला.

“अरे नाही रे.. असं नाही होणार. मला पूर्ण खात्री आहे. ती तसं काही करणार नाही. तेवढा विश्वास आहे मला. तू चल तरी माझ्यासोबत.”

पण.. खरं बोलतेय ना ती? नायतर बघ. आधी या फेसबुकमुळे लोक काहीही करतात. उगीच काही भानगड व्हायला नको.” मनातला गोंधळ शंतानुच्या डोक्यात थैमान घालत होता. अन् तो प्रशांतला ते बोलूनही दाखवत होता.

“काही नाही होणार. जाऊन तर बघू. पुढे जे होईल ते होईल.” धाडसाने प्रशांतने शंतानुला समजावले.

“अच्छा.. ठीक आहे. दोस्तीसाठी काहीपण. जे होईल ते होईल. चल जाऊ. येतो मी तुझ्यासोबत. पण ती राहते कुठं ते तर माहित आहे का?”मित्रासाठी सदैव तत्पर असणारा शंतनु अखेर जायला तयार झाला.

“हो तर.. तिने पत्ता दिलाय ना. अरे तिचं गाव खूप लांब आहे रे. एकटे कसं जाऊ? म्हणून तर तुला सोबत चल म्हणतोय ना.

“ओके..ओके जाऊया.” म्हणत शंतनु ने प्रशांतला शब्द दिला.

गुरुवार उजाडला अन् ते दोघे तिच्या गावी जायला निघाले. यांच्या गावापासून तिचे गाव जवळ जवळ अडीचशे ते तीनशे किलोमीटर इतक्या दूर अंतरावर होते. पण तिने कोणत्या एसटी ने आणि कसे यायचे ते व्यवस्थित सांगितले होते. संपूर्ण प्रवासात शंतानुच्या मनात एकच भीती होती की तिने खरंच लग्नासाठी बोलवलंय की अजून विपरीत काही घडेल.

इकडे प्रशांतचा मात्र तिच्यावर खुप विश्वास होता तो शंतानुला समजावत होता. त्याच्या मनात फक्त एकच हुरहूर होती की तिच्या घरचे लग्नाला होकार देतील का. मला माझे प्रेम मिळेल की नाही?

अनोळखी मार्ग, अनोळखी ठिकाण, सगळं काही वेगळंच वाटतं होत. गाव जवळ येईल तशी मनातील हुरहुर अधिकच वाढून काळीज जोरजोरात धडकू लागले. डोळे तिला पाहण्यासाठी आतुर झालेले. कारण या आधी तिला कधीच पाहिले नव्हते. ही पहिलीच भेट होती. त्यामुळे मनात उत्कंठा दाटून आलेली. तो एक गाणं गुणगुणू लागला.

“अनदेखी, अनाजनी सी
पगली सी, दिवानी सी
जाने ओ कैसी होगी रे..

ओ.. चोरी से चुपके चुपके
बैठी है दिलं मे छुप के
जाने ओ कैसी होगी रे…”

प्रवास करता करता दिवस मावळून अंधार पडू लागला. आता मात्र मनात थोडी भीती वाटून शंतनु घाबरला होता अन् प्रशांत त्याला समजावत होता.

सकाळी अकरा वाजता ते दोघे बाहेर पडलेले पण कोणत्या गाड्या कुठे थांबतात याची कल्पना नसल्याने पोहोचायला रात्र झाली. दिवसभर बसचा प्रवास करून पाय सुजले. शंतनु खूप वैतागला होता. पण आता मित्रासाठी सोसणे याशिवाय पर्याय नव्हता. बसमधून स्टॉप वर उतरल्यावर रिक्षा केली, अन् ते दोघे एकदाचे तिच्या घरी पोहोचले.

मध्यम बांध्याची, सावळ्या रंगाची, जवळ जवळ साडेपाच फूट उंच, टपोरे पाणीदार डोळे, सुंदर काळेभोर केस असलेली मुलगी समोर उभी होती. तिला पाहताक्षणी प्रशांत तिच्याकडे पाहून गोड हसला हीच सानिका आहे हे त्याने ओळखले. आपल्याकडे बघून हसणारा मुलगा म्हणजे हा प्रशांतच असणार याची खात्री झाल्यावर ती सुध्दा गालात हसली.

दिसायला अगदी देखणा जणू राजबिंडाच. गोरापान, सहा फूट उंच, धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेला सुंदर असा मुलगा पाहून ती बावरून गेली. दोघांची नजरानजर झाली अन् दोघेही नजर चोरुन लाजले.

सानिका अन् घरचे त्यांची वाट पाहत होते. तुमच्या दोघात प्रशांत कोण हे दादाने विचारताच ‘मी.. मी प्रशांत’.. म्हणून प्रशांतने स्वतःची ओळख करून दिली. शंतनु मात्र घाबरुन मागे मागेच थांबलेला. तिच्या घरच्यांनी यांचा खूप चांगला पाहुणचार केला. तेव्हा कुठे शंतनुच्या जीवात जीव आला. अरेंज मॅरेज असते त्याप्रमाणे सगळ्या रीतिभातीनुसार इकडची तिकडची विचारपूस झाली. या दोघांना एकमेकांशी बोलू दिले. अन् प्रशांत परत आपल्या गावी जायला निघू लागला.

तेव्हा सानिकाचा दादा म्हणाला, “अहो आता रात्र खूप झालीय, इतक्या रात्री नका जावू. आजची रात्र मुक्काम करा अन् उद्या जा.” शंतनुला अजूनही कुठेतरी मनात भीतीच होती. पण तरीही परत जायला रात्रीच्या वेळी गाड्या मिळणार नाहीत म्हणून ते दोघेही मुक्कामाला थांबले.

दुसऱ्या दिवशी आपल्या गावी परत गेले. सानिकाचे मन बोलत होते की, “हा इतका सुंदर असेल वाटलं नव्हतं मला. मी तर याच्यापेक्षा कमी देखणी आहे मग कसं काय प्रेम करेल हा माझ्यावर. आता तिकडे गेला की विसरून जाईल.”

सानिकाच्या घरच्यांना मुलगा खुप आवडला. जे बोलला ते करून दाखवले त्यामुळे तिलाही त्याच्यातील खारेपणा पटला. प्रशांत कुणालाही आवडेल असाच सुस्वभावी होता.

“आपण त्याची इतर माहिती काढू अन् पुढे लग्नाचं ठरवू. सध्या तर पसंद आहे मुलगा.”
बाबा खुश होऊन घरातील सर्वांना सांगत होते.

सानिकाच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला. पण जोवर तो तिकडून फोन करत नाही तोवर आपण काही सांगायचे नाही असे ठरवून सानिका गप्प बसली.

तिकडे पोहचताच प्रशांतने सानिकाला मेसेज करून म्हणाला, “आपण फोनवर बोलू शकतो का.”

आता याला काय सांगायचे असेल ही मनात आतुरता असलेली सानिका त्याला म्हणाली, “करा फोन. काही हरकत नाही, आपण फोनवर बोलू शकतो.”

—-----------

क्रमशः

फोनवरून काय बोलणं होईल या दोघांचं ते पाहूया पुढील भागात.