नातं तुझं नि माझं - भाग २
पूनमने सासूबाईकडे फोन दिला अन् मायलेकींचे बोलणे सुरू झाले. आई दरवर्षी अगदी आतुरतेने लेकीची आणि नातवंडांची वाट पाहत असते, त्यामुळे लेक कधी येणार या उत्सुकतेने म्हणाली, “व्हय गं आंजू, मला सांग की कवा यतीस हिकडं? आगं तुझं सारखं ध्यान हुतंय गं पोरी. कधी तरी जरा लवकर येत जा की आपल्या आय बापासाठी. तुला आमची आठवण यती का न्हाय कधी.” बोलता बोलता यमुनाचे डोळे पाणावले होते.
आईच्या रडवेला आवाज ऐकून अंजलीचेही डोळे भरून आले. दाटलेला हुंदका आवारातच अंजली म्हणाली, “अगं आई… तुमची आठवण येणार नाही असे कसे होईल गं! तुला सांगते; असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी तुमची कुणाची आठवण झाली नाही. दररोज काही न काही कारणावरून तुमचा विषय निघतच असतो बघ. पण सासर ते माहेर हे अंतर किती लांब आहे हे तुला माहीत आहे ना गं, आणि इतक्या लांब सारखे सारखे येणे कसे काय शक्य होईल तूच सांग ना.”
लेकीचे बोलणे आईला समाजात होते पण आईच काळीज म्हणजे मुलासाठी सदैव तडफडत असतं. शेवटी मनाला आवर घालत यमुना म्हणाली, बरं बाई दिवाळीत यं, पण यं बाई; आन् आमास्नी भिटून जा गं. आमच्या जीवात जीव हाय तवर तुजी वाट बघत बसणारच ही म्हातारी.”
आईच्या बोलण्याने अंजलीला अस्वस्थ वाटू लागले अन् ती म्हणाली, “काय गं आई, असं का बोलतेस, आणि तुला शंभर वर्षापेक्षा जास्त आयुष्य आहे बरं का. त्यामुळे अजून बरीच वर्षे तुला माझे लाड पुरवावे लागणार आहेत.”
हसत हसत यमुना म्हणाली, “व्हय तर… तू यं की आधी, मग बघू लाड कौतुक करायचं.
कधी एकदा आईकडे जातोय असे होऊन ती आईला म्हणाली, “हो मी लवकरच येतेय, वहिनीला सांग की आम्ही येईस्तोवर दिवाळीची सगळी जय्यत तयारी होऊन जाऊ दे.”
फोनचा स्पीकर ऑन होता, पूनम काम करत करत या माय लेकींचे सगळे बोलणे ऐकतच असल्यामुळे ती म्हणाली, “अहो ताई..दरवर्षी सगळी तयारी करून आम्ही तुमचीच वाट बघत असतोय. यंदा काय वेगळं असणार हाय का? आवं तुमच्याशिवाय दिवाळीचा सणच साजरा करुसा वाटत नाय बघा. तुम्ही लवकर या बरं.”
लवकर येण्याचे आश्वासन देत अंजली म्हणाली, “हो वहिनी दोन दिवसातच निघतोय आम्ही. बरं आता आवरा तुमची काम बाकी आल्यावर निवांत गप्पा मारु.”
“व्हय व्हय.. चालतंय की” म्हणत पूनमने फोन ठेवला. आणि स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, “चला बाईऽऽऽ ताई यायच्या आत लवकर कामं उरकायला हवीत; म्हंजी कसं त्या आल्यावर मोकळा येळ भेटंल बोलत बसायला.”
—--------
क्रमशः
क्रमशः
©® सौ. वनिता गणेश शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा