नातं तुझं नि माझं - भाग ४
बेडरूममध्ये गेल्यावर पूनम अमरची वाट पाहत होती. तो आत येताच ती त्याला म्हणाली, “अहो ऐकलं का? मी काय म्हणती, उद्या पाडवा पण हाय अन् भावबीज पण हाय. दोन सण एकत्रच आल्यात. मग उद्याची काय जुळणी केलीय का नाय?”
डोक्यावरून हात फिरवत अमर मनात विचार करत होता की आता हीचा काय बेत आहे ते बघुया असे ठरवून तो म्हणाला, “आता त्यात काय जुळणी करायची हाय बरं; नेहमीप्रमाणे यंदाही पार पडायचं सगळं.”
लाडात येत पूनम त्याला म्हणाली, “माझं थोडं ऐकता का?”
“बोल की, तुझा काय वेगळा विचार हाय का?”
पूनम म्हणाली, “वेगळा इचार काय नाय पण यंदा मी एक वस्तू आणलीय ताईंसाठी. ती त्यास्नी द्यावी अशी माझी इच्छा हाय.”
बहीण आणि बायको दोंघींनी मिळून जणू यालाच सरप्राईज दिल्यासारखे वाटत होते. मनात खुश होऊन तो बायकोला म्हणाला, “हात्तेच्या इतकंच होय. चालतंय की मग. काय आणलय ते दे बरं मला.”
अमरने आधीच गिफ्ट बघू नये म्हणून पूनम त्याला म्हणाली, “देती मी पण तुम्ही आत्ताच ते उघडू नका. उद्या ताईंना दिल्यावर त्या उघडतील तवाच बघा.”
“बरं बाईऽऽऽ नाही उघडत दे तरी माझ्याकडे.” असे म्हणत त्याने पूनमकडचे गिफ्ट घेऊन स्वतःजवळ ठेवले.
आता मात्र अमर खूप अधीर होऊन दुसऱ्या दिवसाची वाट पाहत झोपी गेला.
दुसरा दिवस उजाडला आणि दिवाळी पहाटेचे स्नान वगैरे आटोपले. घरातील सर्वजण पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यासाठी सज्ज झाले. तेवढ्यात अंजली आईला आणि वहिनीला म्हणाली, आज आपण एक गंमत करूया, आपल्याला मिळालेले गिफ्ट सर्वांनी एकत्रच उघडून पाहायचे.”
अंजलीची कल्पना सर्वांना आवडली त्यामुळे सर्वांनी होकार दर्शवला.
आधी सर्व बायकांनी आपापल्या नवऱ्याचे औक्षण केले आणि त्यांच्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांना गिफ्ट देऊ केले. अंजलीने अमरला ओवाळले तेव्हा त्याने पूनमने खास नणंदेसाठी दिलेले गिफ्ट अंजलीच्या हातात दिले. पूनमने अमरला ओवाळले तेव्हा त्याने बहिणीने भावजयसाठी प्रेमाने दिलेले गिफ्ट बायकोच्या हातात दिले.
आता गिफ्ट उघडण्यास सुरुवात झाली. सर्वात जास्त उस्तुक होता तो म्हणजे अमर. कारण यावेळी त्याने स्वतः काही खरेदी केली नव्हती पण त्याच्या बायकोने आणि बहिणीनेच त्याला सरप्राईज दिलेले. त्या दोघीतील हे घट्ट नाते त्याला मनात खूप सुखावून गेलेले. अंजलीने गिफ्ट उघडून पाहिले तर त्यात तिच्या आवडीचे सोन्याचे कानातील टॉप्स होते.
पूनमने गिफ्ट उघडून पाहिले तर त्यातसुद्धा सेम तसेच कानातील सोन्याचे टॉप्स होते. अमर आणि सारंग हे त्या दोघींचे एकसारखे गिफ्ट पाहून थक्कच झाले. दोघींचे विचार इतके मिळतेजुळते कसे काय बरं? हा पडलेला प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
—------
क्रमशः
—------
क्रमशः
©® सौ. वनिता गणेश शिंदे