नाती जिव्हाळ्याची - भाग ७
सुधीर आणि सुजय आपापल्या कामात व्यस्त होते. सुधीर मोठा मुलगा होता त्यामुळे त्याच्या लग्नाची घाई सीता करू लागली. राहून राहून त्याला लग्नासाठी फोर्स करू लागली. त्याच्यासाठी मुली शोधणे सुरू झाले. आणि सुदैवाने त्याला हवी तशी मुलगी भेटली. अगदी हौसमौज करून सीताने सुधीरचे लग्न लावून दिले. सुधीरची बायको साधना ही अगदीच शांत स्वभावाची होती. तिचेही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आणि ती सुध्दा जॉब करत होती.
सुधीर आणि सुजय हे जेव्हा बॅचलर होते तेव्हा स्वतः हाताने बनवून खायचे पण सुधीरचे लग्न झाले आणि घरात एक हक्काचे माणूस जेवण बनवून द्यायला आले. साधना त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण बनवून देत असे. घरकाम आणि जॉब अशी तिची तारेवरची कसरत चालू होती.
बायकोची ओढातान सुधीरला दिसत होती त्यामुळे तो तिला म्हणाला, “साधना.. अगं तुझी खूप धावपळ होतेय गं! तू जॉब नाही केलास तरी आपले काही अडणार नाही. आम्ही दोघे आपल्याला पुरेसे तेवढे पैसे कमावतोय मग तू कशाला त्रास करून घेते.”
आपल्याविषयी नवर्याच्या मनातील काळजी पाहून साधना म्हणाली, “ अहो.. यात त्रास कसला आलाय. मला काही त्रास नाही होत. मला स्वयंपाक करायला खुप आवडते आणि दिवसभर घरी राहून तरी काय करु. त्यापेक्षा जॉब केला तर मन रमून जाईल म्हणून जॉब करते. अन् हो.. मला जेव्हा त्रास होतोय असे वाटेल तेव्हा मी स्वतः जॉब करणे सोडून देईन मग तर झालं ना!”
सुधीर आपुलकीने बायकोला म्हणाला, “अच्छा.. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. हा… पण जास्त त्रास होईल असे काही करू नको. तुला ज्यात आनंद वाटतो ते तू कर, माझी काही हरकत नाही. तुझा नवरा नेहमी तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेव.”
साधना आपल्या नवऱ्याला प्रेमाने म्हणाली, “हो मला ते माहित आहे. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात म्हणून मी सर्व काही पेलू शकते.”
साधना आणि सुधीर एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहत होते. दोघांमध्ये खूप समजुतदरपणा होता. विश्वास होता. त्यामुळे त्यांचा संसार अधिकच बहरू लागला.
आता राहता राहिला सुजय. त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. तोही लग्नाच्या वयाचा होता. पण तो सुधीरपेक्षा जरा वेगळा होता. म्हणजे सुधीर गावी राहिल्याने त्याच्या अपेक्षा राहणीमान साधेच होते. पण सुजय शहरात राहिल्याने त्याचे राहणीमान स्टाईलीश होते. मॉर्डन वागणे त्याला आवडत होते आणि बायकोही मॉडर्नच हवी अशी त्याची अपेक्षा होती. तसा तो लहानपणा पासूनच सुधीरपेक्षा वेगळा होता. मनात मोठी स्वप्ने बाळगायचा आणि ती पूर्ण करण्याची तो तयारी ठेवायचा.
सुजय दिसायला अगदी रुबाबदार आणि गोरापाण. त्यामुळे त्याला त्याचे राहणीमान खूप सूट होत असे. त्यांचे आजोळ मुंबई होते. सुजय, सुधीर आणि रेश्मा हे लहानपणी सीतासोबत मे महिन्याच्या सुट्टीला म्हणून आपल्या आजोळी जायचे. तेव्हा सुजाची अनेक मुला मुलींनसोबत छान गट्टी जमायची. मामाच्या घराजवळच अगदी शेजारी एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं तन्वी. ही तन्वी सुजयपेक्षा वर्षभराने लहान होती. मात्र सुजयची आणि तिची बालवयातच खुप छान मैत्री झालेली.
तन्वीचे वडील श्रीमंत होते त्यामुळे ती खूपच मॉडर्न राहायची. तिच्या वडिलांना माहित होतं की सुजय एका गरीब घरातील मुलगा आहे. त्यामुळे ते तन्वीला सारखे म्हणायचे, “तन्वी बाळा.. तू त्या सुजयसोबत खेळत जाऊ नको. त्याच्याशी मैत्री करू नको.”
पण तन्वी त्यांचे ऐकत नसे. वडील घरात नसले की ती सुजयसोबात खेळत होती. छोट्या वयातच त्यांना एकमेकांविषयी लळा लागला होता अन् तन्वीच्या वडिलांना श्रीमंतीचा जास्तच रुबाब असल्याने ते त्या दोघांना एकत्र येऊ देत नव्हते.
सीताच्या हे लक्षात आलेले त्यामुळे ती सुजयला म्हणाली, “सुजय बाळा.. तू त्या तन्वीसोबत खेळत जाऊ नको तिच्या बाबांना आवडत नाही.
छोटा सुजय निरागसपणे म्हणाला, “का गं आई, का नाही खेळू देत? मी काय केलेय?”
पण गरीब श्रीमंत हा भेदभाव समजण्याइतके तेव्हा त्याचे वय नव्हते.
पण गरीब श्रीमंत हा भेदभाव समजण्याइतके तेव्हा त्याचे वय नव्हते.
जसजसा सुजय मोठा होऊ लागला तसतसे त्याला काही गोष्टीतील भेदभाव कळू लागले. आपण गरीब आहोत म्हणून ते आपल्याला त्यांच्या मुलीसोबत खेळू देत नाहीत. तिच्याशी बोलूही देत नाहीत. या गोष्टीचे त्याला वाईट वाटायचे. सुजयला तन्वी लहानपणा पासूनच आवडायची. पण तिच्या वडिलांच्या वागण्यामुळे तोही दुखावला गेला होता. घरात सुनेच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा त्याला तन्वीची आठवण आली.
पूर्वी मोबाईलचा वापर अत्यंत कमी होता जे काही असेल ते समोरासमोर बोलावे लागायचे. तन्वीजवळ लग्नाचा विषय कसा काढायचा हा प्रश्न त्याच्या मनात सतावत होता. पण तिचे आपल्याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी एकदा तो आजोळी गेला. तिथे तो तन्वीशी बोलणे टाळू लागला. त्याला मनातून खूप वाईट वाटायचे. सुजायच्या या वागण्यामुळे तन्वी नाराज व्हायची कारण तिलाही सुजय आवडत होता.
सुजायचे हे तुटक वागणे सहन न झाल्यामुळे ती त्याला म्हणाली, “का वागतोस माझ्याशी असं? माझं काय चुकलं आहे काय? ते तरी सांग, पण खरं सांगते रे.. मला नाही सहन होत तुझे हे अबोल राहणे.”
सुजयला तिच्या बोलण्याने गहिवरून आले अन् तो तिला म्हणाला, “हे बघ तन्वी आपण चांगले मित्र आहोत पण तुझ्या वडिलांना आपली मैत्री खटकते. मग तूच सांग त्यांना कशाला दुखवायचं?”
—------
क्रमशः
—-
तन्वी आपल्या मनातील गोष्ट सूजयला सांगू शकेल का? सुजय तिला समजून घेईल का? ते पाहूया पुढील भागात.