Login

नाती जिव्हाळ्याची - भाग - ११( अंतिम भाग)

नाती जिव्हाळ्याची भाग ११( अंतिम भाग)
नाती जिव्हाळ्याची - भाग ११( अंतिम भाग)


सुधीरने वेळ काढून गावी आला. त्याने सीताला याची सुजयच्या लग्नाची सगळी कल्पना दिली. सीताला सुजय आणि तन्वीबद्दल थोडीफार माहिती होतीच. मुलांच्या सुखापुढे तिचा विरोध असण्याचा प्रश्नच नव्हता. तिने लग्नाला लगेच संमती दिली.आणि लग्नाचा जवळचाच मुहूर्त काढण्यात आला.

गावकी आणि भावकीला सर्वांना आमंत्रणे दिली. गावाकडील आणि मोठ्या उत्साहाने, आनंदाने त्या दोघांचे लग्न लावून दिले. मुलीकडून एकुलती एक मुलगी आणि मुलाकडून घरातील शेंडेफळाचे लग्न आहे असा विचार करून हे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. शिवाय शहरी लोकांना गावातील निसर्गाची वेगळीच ओढ असते त्यामुळे तन्वीच्या घरच्यांची हौस त्यांच्या आग्रहास्तव म्हणून लग्न सुजयच्या गावी निसर्गाच्या सानिध्यात करण्यात आले. रात्री अख्ख्या गावातून बॅंडबाजा, फटाके यांच्या आवाजाच्या जल्लोषात वरात काढण्यात आली. सगळ्यांनी मनसोक्त नाचून नुसता धिंगाणा केला.

सारा गावं म्हणत होता की “सुजयचं लगीन लयच भारी झालं. आजवर आपल्या हितं आसं लगीन कुणाचंच झालं नव्हतं.”

सीताविषयी आपुलकी असणारी लीला शेजारणीला म्हणाली, “सीतानं आजवर लय हाल सोसलं खरं पोरांनी आईला सुखाच दिस दाखवलं. तिनं खरंच नशीब काढलंय म्हणायचं!”

शेजारील पण मोह अवराला नाही ती लगेच म्हणाली, “आगं या भावाभावातील जिव्हाळा तर किती निराळा हाय गं! बाप गेला पण सुधीरनं बापाची कमी सुजयला कधी भासू दिली नाय.”

सुजायची बाजी घेत लीला म्हणाली, “ व्हय व्हय.. पर सुजय काय कमी नाय बरं का! त्येन बी भावाच्या उपकाराची जाणीव ठिवून भावाला पुढं शिकाया लावलं आन् चांगली नोकरी कराया मार्ग दाखवला.”

सीताच्या आयुष्यात सुखाचे दिवस आल्यामुळे तिची मैत्रीणपण अन् शेजारीणपण असलेली लळा आज खूप खुश होती. लीलाने आपल्या पडत्या काळात आपल्याला आणि आपल्या आईला खूप मदत केलीय हे लक्षात ठेऊन सुधीर आणि सुजयने न विसरता लीलाला साडी चोळीचा आहेर दिला होता. लीलाला भरून पावल्यासारखं झालं होतं.

लग्न झाले, कुलदैवतांचे दर्शन झाले आणि आता आपापल्या कामासाठी सुधीर आणि सुजय स्वतःच्या बायकांना घेऊन पुण्याला निघणे जरुरीचे होते. ते दोघे सीताला म्हणाले, “अगं आई.. आता बरेच दिवस झाले इकडे येऊन. कामाचेही काही तरी बघायला हवे ना. आम्ही उद्याच जायला निघतोय गं!”

सगळेजण एकत्र असल्यामुळे सीताला घर कसं भरल्यासारखं वाटत होतं पण आता सगळे जाणार मग हे घर मला खायला उठेल. एकटीला अजिबात करमायच नाही म्हणून ती खूप उदास झाली. तिची उदासी मुलांच्या नजरेतून सुटली नाही. सुजय आणि सुधीर एकमेकांकडे बघू लागले. आणि सुजयने दादाला फक्त नजरेनेच खूनवले तेव्हा सुधीर आईला म्हणाला, “आई आमचं ऐक ना गं आता! नको इथे एकटी राहू. चल आमच्यासोबत पुण्याला. आपण सगळे एकत्र राहू या. आजवर आमच्यासाठी खूप केलंस तू, पण आता बास झालं.”

दादाच्या बोलण्याला दुजोरा देत सुजय म्हणाला, “हो आई.. दादा अगदी बरोबर बोलतोय. तू अजिबात एकटी नाही राहायचं. तू उद्या आमच्यासोबत येतेस. आता काम वगैरे काही करायचं नाही. दोन सूना आल्यात ना तुला; मग आरामात निवांत राहायचं.”

मुलांचं प्रेम, जिव्हाळा, समजूतदारपणा पाहून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिचे डोळे पुसत दोन्ही मुले म्हणाली, “ अगं आता काय झालं रडायला? नको रडू..आम्ही आहे ना!”

त्यावर सीता म्हणाली, “ बाळांनो.. मी रडत नाय रं; ही आनंदाची आसवं हायंत. तुम्ही वाईट वाटून नका घिऊ. अन् बरं का मी बी येतीये तुमच्यासंग. त्यामुळं नाराज व्हायचा प्रश्नच नाय म्हणू तिघेही हसु लागले.”

या तिघांचे प्रेम पाहून त्या दोघी सूनानांही खूप आनंद झाला. मुलांनी आणि सूनांनी सीता ला नमस्कार केला अन् तिनेही मुलांना तोंडभरून आशीर्वाद दिला.

शेवटी सीता आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेत म्हणाली, “लेकरांनो.. तुमच्या या गोड नात्यातील जिव्हाळा शेवटपर्यंत असाच र्‍हाहू द्या. या म्हातारीची यवाढीच अपेक्षा हाय.”
त्याचबरोबर आपल्या सूनानही जवळ घेऊन सीता म्हणाली, “पोरींनो आता तुमच्या दोघींच्या हात हाय समदं. आपलं ही घरटं असा प्रेमानं आन् आपुलकीनं जपा. आपल्या नात्यातील जिव्हाळा असाच टिकवून ठेवा.”

तन्वीकडे पाहून सीता म्हणाली, “धाकल्या सुनबाई मी काय म्हणती ते ध्यानात ठिव; तू बारकी असल्यापासून माझ्या सुजयला जीव लावलास तसाच आयुष्यभर लाव. तुमच्या दोघांच्या नात्यात तर बालपणापासून प्रेम अन् जिव्हाळा व्हता तो यापुढं बी विश्वासानं ठिवा.

सगळी जण सुखानं आन् आनंदानं नांदा. मी कायम तुमच्या सोबत आन् तुमच्या पाठीशी हाय.

सगळेजण खूपच खुश होते. अगदी हसत खेळत दंगा मस्ती करत आनंदाने झोपले. दुसऱ्या दिवशी सीतासोबत सुधीर आणि सुजय आपल्या बायकांना घेऊन गावावरून पुण्याच्या घरी राहायला आले. सगळे आनंदाने एकत्र राहू लागले.