Login

नाती जिव्हाळ्याची - भाग -१०

नाती जिव्हाळ्याची भाग १०
नाती जिव्हाळ्याची - भाग १०

सुजय ऑफिसमध्ये काही फाईल्स पाहत होता तेवढ्यात टेलिफोनची रिंग खणखणली. रींगचा आवाज होताच त्याने फोन उचलला तर समोरून त्याचे मामा म्हणाले, “हॅलो सुजय.. मी मामा बोलतोय. बिझी आहेस का?”

थोडंसं हसतच सुजय म्हणाला, “नाही ओ मामा..मी कामात कितीही बिझी असलो तरी तुमच्यासाठी सदैव फ्रीच असेन. बोला.. काय म्हणताय?”

भाच्याच्या या आपुलकीच्या बोलण्याने मामाला खूप बरं वाटलं. ते म्हणाले, “अरे.. आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन केलाय तुला. तू जे काम सांगितलेलं ना मला; ते काम मी केलंय. तन्वीच्या बाबांशी तुमच्या लग्नाविषयी बोललोय आणि त्यांना तुझे प्रपोजल मान्य आहे. तुला त्यांनी उद्याच भेटायला बोलवले आहे. जमेल ना तुला?”

मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्या भरात लाडेलाडे अन् थोडंसं लाजतच सुजय म्हणाला, “हे काय विचारणं झालं का मामा! माझ्या कामासाठीच त्यांनी बोलवलंय अन् मी येणार नाही असं होईल का?”

“अरे गंमत केली रे.. बर चल मग ये उद्या; आम्ही वाट बघतोय. तू आल्यावर सविस्तर बोलूच.” असे म्हणून मामांनी फोन ठेऊन दिला.

सुजयला खूपच आनंद झालेला. घरी गेल्या गेल्या त्याने ही बातमी सुधीर दादाला सांगितली. तो म्हणाला, “ दादा मी तुझ्यापासून काहीच लपवून ठेवलेलं नाही हे तर तुला माहीतच आहे. मी तन्वी सोबत लग्न करण्याचा विषय मामा जवळ काढला होता आणि त्यांनी तन्वीच्या बाबांना याविषयी विचारले आहे. तिचे बाबा बहुतेक तयार झालेत आणि त्यांनी उद्या भेटायला बोलवलेय. जायचं ना मग आपण दोघेजण.?”

या दोन भावाभावातील जिव्हाळाच वेगळा होता. एकमेकांच्या सुखासाठी काहीही करायची तयारी दोघेही सदैव दाखवत होते. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता सुधीर म्हणाला, “अरे तुझं लग्न ठरवायचे आहे अन् मी नाही येणार अस कधी होईल का? काळजी करू नकोस, आपण उद्या नक्की जाऊ.”

दुसऱ्या दिवशी सुधीर अन् सुजय मुंबईला गेले. मामाच्या घरी पोहचल्यावर मामांनी सगळी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाजवळ तन्वीच्या बाबांना सुजय आल्याचा निरोप देऊन बोलवून घेतले. काही वेळात ते आलेसुद्धा. पण येताना एकटे नाही आले. सोबत तन्वीला घेऊन आले होते. कितीही झाले तरी आता मुलीच्या आयुष्याचा आणि मनाचा प्रश्न होता. जे काही असेल ते समोरासमोर होणे गरजेचे होते.

ते दोघे आल्यावर चहा पाणी वगैरे झाले आणि आता मूळ मुद्द्याला बोलायला सुरुवात झाली. अवघडलेल्या अवस्थेतच तन्वीचे बाबा सुजयला म्हणाले, “ सुजयराव.. मी काय म्हणतो… एवढे बोलताच सुजयने त्यांचे बोलणे मध्येच तोडले आणि म्हणाला, “काका मला सुजयराव नका म्हणू; मी तुमच्या मुलासारखा आहे त्यामुळे फक्त सुजय म्हणालात तर आवडेल मला.”

“बरं चालेल.. काही हरकत नाही. पण मी आज तुम्हाला कशासाठी बोलवून घेतले हे तर माहीतच असेल पण तरीही सांगतोच. तुमच्या मामांनी मला सांगितले की तुम्हाला माझ्या तन्वीसोबत लग्न करायचे आहे. आता कसं आहे बघा.. मला मान्य आहे की पूर्वी मी तुमचा राग राग करायचो; तन्वीला तुमच्याशी कधी बोलू दिले नाही. पण त्यावेळीही मला तुमच्याविषयी वाईट भावना होत्या असं काही नव्हत बरं का! अहो.. मी एक मुलीचा बाप आहे अन् मुलीच्या भविष्याचा विचार करणे यात माझे काही चुकीचे आहे असे मला नाही वाटतं. शिवाय तुमच्या भावा भावातील प्रेम जिव्हाळा पाहून तर तुम्ही किती संस्कारी आहात हे समजतेय. तुमच्या आईने मुलांना फक्त सांभाळलेच नाही तर छान संस्कारही केले आहेत. आता…”

मध्येच बोलत सुधीर म्हणाला, “तुमचं बोलणं अगदी बरोबर आहे. जगातील कोणताही बाप असो तो आधी तिच्या भविष्याचाच विचार करतो त्यामुळे तुम्ही काही संकोच वाटून घेऊ नका.”

सुधीरच्या बोलण्यामुळे त्यांना जरा बरं वाटलं. तन्वीचे बाबा पुढे म्हणाले, आता तन्वीचे लग्न सुजयसोबत लावून द्यायला माझी काहीच हरकत नाही. मला हे लग्न मान्य आहे. आता मला खात्री आहे की माझी मुलगी सुखात राहील. तरीही सर्वांसमोर तन्वी ला विचारतो तिच्या मनात काय आहे.”

त्यांनी तन्वीकडे बघून तिला विचारले, “ सांग बाळा तुझ्या मनात सुजय आहे का? तुला आवडतो का तो? तुला सुजयसोबत लग्न करायचे आहे की नाही?”

वडिलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देताना खुललेल्या चेहऱ्याने थोडीशी लाजून च ती म्हणाली, “बाबा मला सुजय खूप आवडतो; मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.”

“झालं तर मग ‘मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी’ लवकरच मुहूर्त पाहून उडवून देवू बार.” हसत हसत मामा म्हणत होते.

मामांसोबत बाकीचे सगळेच हसु लागले. लगेच तन्वीचा हात सुजयच्या हातात देत तिचे बाबा म्हणाले, “सुखी रहा पोरांनो; एकमेकांना अशीच आयुष्यभर साथ द्या. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.”


तन्वी आणि सुजयने एकमेकांकडे पाहिले अन् त्यांची नजरानजर होताच दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली. मनातील प्रेम, भावना नजरेनेच टिपत त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची कबुली दिली.

दोघांना बोलण्यासाठी एकांत दिला तेव्हा सुजय तन्वीला म्हणाला, “बघ.. मी म्हणालो होतो ना! एक दिवस तुझे बाबा स्वतः तुझा हात माझ्या हातात देतील. आणि माझं बोलणं खरं झालं ना.”

मनातील स्वप्न पूर्ण झालेली तन्वी उत्साहाने म्हणाली, “हो अगदी बरोबर बोललास. तुझ म्हणणं खरं ठरलं. पण तुला मानलं पाहिजे. तू स्वतः ला सिध्द केलंस म्हणून तर माझे बाबा तयार झाले ना.”

सुजय काहीही न बोलता फक्त तिच्याकडे प्रेमळ नजरेला बघत गालात हसला.

—-------

क्रमशः

सूजयचे लग्न कसे पार पडते? ते पाहूया पुढील भागात.