चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
शीर्षक : कला
“तिचं कुठे जुळणं कठीणच आहे बाई.” राणेबाई म्हणाल्या.
“हो ना. अशा मुलीला लग्न करून घरी नेणं म्हणजे मोठी जबाबदारीच असेल. कोण अशाने तयार होईल!” कुसुमताई पण लगेच त्यांच्या बोलण्याची री ओढत म्हणाल्या.
“खरंच. मुलगी म्हणून कितीही लाडावून ठेवलं आईबाबाने तरी लग्नानंतर जबाबदारी घ्यावीच लागते तिला. इथे आईबाबा लाख तिचे गुणगान गात असतील; पण सासरचे अशा बिनकामी मुलीचे गुणगान गाऊ शकतील का? ते तर चांगलाच उद्धार करतील.” राणेबाई अगदीच खोचक स्वरात म्हणाल्या.
“उद्धार करण्यासाठी आधी लग्न तर जमायला हवं ना.” कुसुमताई म्हणाल्या.
“हल्ली काय ओ, काही लोक भरमसाठ हुंडा घेऊन पण अशा कोणासोबत लग्न करतात; पण शेवटी असल्या व्यवहारिक नात्यांमध्ये कसली आलेय गोडी! शेवटी तडजोडच ती!” राणेबाईंच्या आवाजातील खोचकपणा काही लपत नव्हता.
“खरंय तुमचं. एकतर जुळणं कठीण आणि जुळलं तर भरपूर तडजोडी कराव्या लागतील. पैसा ओतावा लागेल तो वेगळाच!” कुसुमताई पण त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या.
अशाच दोघीजणी बराच वेळ तिच्याबद्दल बोलत होत्या, कारण नेमकीच काही वेळापूर्वी 'ती' नजरेस पडली होती. मग काय, या गावभरच्या खबरी ठेवणाऱ्या, चुगली करणाऱ्या बायकांना आजच्या चर्चेला विषय मिळालेला.
तर ती म्हणजे कला! नावाप्रमाणेच कलेत पारंगत होती. हो, ही कला एक उत्तम चित्रकार होती. दिसायला अगदी नाजुकशी, देखणी... स्वभावाने प्रेमळ, निरागस अन् गुणांची खाण म्हणावी अशी ही कला; पण, हो इथे एकच पण आडवा येत होता ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तिच्याविषयी काहीबाही बोलायला आवडायचे. जन्मतःच कला एका हाताने व्यंग होती.
या व्यंगाला तिने आणि तिच्या कुटुंबाने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले होते. त्यामुळे कला आपल्या प्रत्येक कामात निपुण होती. रोजच्या कामातही ती कधी कोणावर अवलंबून राहायची नाही, अगदीच काही अपरिहार्य कारण असेल तरच मदत मागायची.
कला आपल्या कलांमध्ये मग्न राहणे पसंत करायची. कारण तिथे तिला अगदी भरभरून व्यक्त होता यायचे. आईबाबांनी तर तिला कशासाठीच आडकाठी केली नव्हती. भाऊही नेहमीच प्रोत्साहन द्यायचा, नवनवीन संधीची माहिती द्यायचा.
या सगळ्या सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून की काय, कलाला कधीच तिच्यात काहीतरी कमी आहे असे जाणवले नाही. परिणामी आजच्या घडीला तिच्या कलेने तिचे नाव चित्रांच्या विश्वात एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते आणि अर्थातच तिच्या घरच्यांचेही! पण म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी... तसेच काहीसे कलाच्याही बाबतीत घडायचे. घरात आणि तिच्या मनात जरी कमतरतेची बाब घर करून राहत नसली, तरी शेजारीपाजारी आणि नातलगांना मात्र जणू तिची फार काळजी वाटायची. काळजी व्यक्त करण्याच्या बहाण्याने कलातील कमतरता गणल्या जायच्या. मात्र कला आणि कुटुंबीय शांतपणे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे.
******
शहरात एक मोठे चित्रप्रदर्शन आयोजित केले गेले होते. कलाच्या कलेला योग्य न्याय मिळून या नामांकित प्रदर्शनात तिचीही वर्णी लागली होती.
“या चित्रात काहीतरी खास आहे.” सारंग त्या चित्राला न्याहाळत म्हणाला.
“ह्म्म... आहे तर खरं खास! चित्रकाराचं नाव बघू बरं...” अलंकार, सारंगचा मित्र त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला आणि त्याने चित्रकाराचे नाव बघितले.
“कला!” सारंग आणि अलंकार एकत्रच म्हणाले.
“हे भारी आहे ना रे... नावातच कला आहे! आणि या नावाची कलाकारी तर आपल्याला समोर दिसतच आहे.” अलंकार अगदी मनापासून कौतुक करत म्हणाला.
“खरंय... कलेची कला!” सारंग त्या चित्रात इतका हरवून गेला होता की तो कौतुक व्यक्त करत हलकेसे हसत फक्त इतकेच म्हणू शकलेला.
ते दोघेही तो प्रदर्शनाचा संपूर्ण परिसर फिरले आणि पुन्हा एकदा फिरून फिरून कलाच्याच चित्रापाशी आले.
“यार, यांनी चित्र विकत घेण्याची अट अशी का ठेवली आहे कुणास ठाऊक!” सारंग जरासा वैतागून म्हणाला.
“तुला हे चित्र जरा जास्तच आवडलं आहे वाटतं.” अलंकार हसून म्हणाला.
“हो. आय जस्ट लव्ह्ड इट! आय मीन बघ ना... किती सुंदर आहे हे. सुंदर, रंगाची भरभरून आणि सुयोग्य उधळण केलेली, तरीही काहीसे गूढ...” सारंग भारावलेल्या नजरेने म्हणाला.
“तू तर प्रेमातच पडलास की!”
“हो. या कलेच्या प्रेमात कोणीही पडेलच.”
“कलेच्या? की कलाच्या?” सारंगच्या उत्तरावर अलंकार मुद्दाम मस्करी करत म्हणाला.
त्यावर सारंगने फक्त लटका राग दाखवत त्याला बघितले आणि प्रदर्शनाच्या नियमानुसार वाट पाहत थांबला.
थोड्या वेळाने प्रदर्शनाचे आयोजक आणि सर्व कलाकार एकत्र आले अन् अखेर रसिकांनी आपली आवडीची चित्रं खरेदी करण्याची वेळ आली. कारण आयोजकांनी तसे ठरवले होते. कलाच्या चित्रासाठी बरेच रसिक रांगेत होते; पण सारंगने मात्र योग्य ती रक्कम देऊन शेवटी ते चित्र खरेदी केलेच.
आता चित्रासोबत फोटो काढण्यासाठी सारंग, कला एकत्र उभे होते. मगाशी कलाच्या व्यंगाबद्दल समजले तेव्हा वाईट वाटले; पण नकळतच एक वेगळाच अभिमानही वाटला होता.
फोटो काढून झाले तशी कला व कुटुंबासोबत सारंग, अलंकारची ओळखही झाली. सारंगसारखा यशस्वी तरुण उद्योजक कलेचा इतका चाहता आहे हे पाहून कलाच्या कुटुंबालाही छान वाटलेले. कुठेतरी त्यांच्या मनात तो कलासाठी घर करून गेलेला; पण त्यांनी स्वतःचे विचार बाजूला सारले.
इकडे सारंग बोलणे आटपून, सर्व कामे आवरून घरी तर आलेला; पण त्याच्या मनावर आज फक्त कलेचे राज्य होते. तो एकटक आपल्या खोलीत अगदी समोरच ठेवलेल्या चित्राकडे बघत बसलेला. मनातून ना ही कला जात होती, ना तिला घडवणारी कलाकार कला...
****
आज अखेर महिनाभराच्या विचारमंथनानंतर तो आपल्या आईवडिलांना घेऊन कलाच्या घरी आलेला. औपचारिकता पार पडली तसा लगेच सारंगने मूळ विषयाला हात घातला.
“काका, मी उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा करणार नाही. तुम्हाला स्पष्टच सांगतो. मला कला आवडली आहे, अगदी मनापासून. तुमची आणि कलाची परवानगी असेल, तर मला कलासोबत लग्न करायचं आहे.”
हे ऐकून कलाचे आईबाबा आणि भाऊ खूश झाले होते. कलाला पण हा विषय आवडला होता; पण तिच्या मनात काही गोष्टी होत्याच...
“तुम्ही म्हणताय ते ठीक आहे; पण तुम्हाला कलाच्या हाताबद्दल कल्पना आहे ना?” कलाचे बाबा एकदा सारंग आणि त्याच्या आईवडिलांकडे बघत म्हणाले.
“हो हो. आम्हाला सारंगने आधीच याची पूर्ण कल्पना दिली होती. आम्ही पण याने सांगितल्याबरोबर तिच्या आर्ट वेबसाईटवर असलेली माहिती आणि सोशल मीडियावरचे फोटो वगैरे बघितले. इतक्या गुणी मुलीला कसं कोणी नाही म्हणेल! कमी आपण मानली तर आहे; पण आपण सकारात्मक विचार केले की सगळं चांगलंच असतं. सारंगने आम्हाला सांगितलंच होतं ना की कला कशी कोणावर अवलंबून नसते. तिच्यात एक वेगळीच जिद्द आहे. मग काय, आलो वेळ न दवडता तुमच्याकडे!” सारंगची आई स्पष्टीकरण देत म्हणाली.
“तुम्हाला सगळं मान्य आहे तर आमची पण तशी हरकत नाहीच. सारंग तर आम्हाला पहिल्या भेटीतच आवडला होता. त्यात आम्ही ऐकत-वाचत असतोच त्याच्याबद्दल. फक्त कलाचं म्हणणं काय आहे ते बघुयात.” कलाचे बाबा शेवटी कलाकडे पाहून म्हणाले.
“अं.. मला काही बोलायचं होतं. चालेल ना?” कलाने विचारले.
“हो बोल ना. अगदी बिनधास्त जे वाटतंय ते बोल.” सारंगची आई म्हणाली.
“तुम्ही माझ्या या व्यंगाबद्दल काही हरकत नाही म्हणालात; पण पुढेही हेच विचार राहतील का? नाही म्हणजे मी लहानपणापासून सकारात्मक वातावरणात राहिले आहे; पण आजूबाजूला मात्र माझ्या आणि माझ्या या हाताबद्दल फार चर्चा सुरू असतात. कशी माझी कमी माझा संसार उद्धवस्त करू शकते, याचे पाढे वाचले जातात. ते ऐकून घेण्याची तयारी आहे तुमची? आम्ही चौघेही आजवर त्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आलोय आणि म्हणूनच आज मी सकारात्मक विचार करून माझ्या कलेला योग्य तो न्याय देऊ शकले आहे. पुढे जाऊन जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आणि अडचण वाटू लागली तर? मला माझं भविष्य कोणावर ओझं म्हणून जाऊन नकोय. मनापासून हवं आहे. हुंडा, उपकार,.. असे कोणतेही शब्द या नात्यासोबत येणार असतील तर मला हे नातं नकोय.” कला तिला जे वाटत होते ते स्पष्टपणे बोलून मोकळी झालेली.
आता मात्र सारंगने पुढाकार घेतला. तो कलासमोर गुडघ्यावर जाऊन बसला आणि म्हणाला,
“हे बघ कला, मी अगदी प्रांजळपणे मान्य करतो की मला तू मनापासून आवडली आहेस. तुझे प्लस-मायनस जे काही गुण असतील, सगळे मान्य आहेत मला. यावरून मी काय किंवा माझे घरचे काय, कोणीही कधीच तुला काही बोलणार नाही. ना तशी वागणूक देणार... खरं सांगतो, तुला भेटण्याच्याही आधीपासून एक अनामिक ओढ वाटली होती तुझ्याविषयी, खासकरून त्या चित्रावर तुझं नाव बघून... तुझ्या कलेच्या आणि नावाच्या प्रेमात पडलो मी! आणि मग हळूहळू जाणीव झाली की कदाचित तूही माझ्या मनात खास जागा निर्माण केली आहेस. खूप विचार केला, आकर्षण तर नाही ना याची खात्रीही करून घेतली. मग जाणवलं की नाही, मला खरंच तू मनापासून आवडली आहेस आणि माझ्या आयुष्यातही हवी आहेस. तुझ्या हाताबद्दल मला काहीच अडचण नाही. कामं तू करशील की नाही, मला फरक पडत नाही. आपल्या घरी तुला असंही काही काम करण्याची गरज नसेल. जी कामं तू करणं अपेक्षित असेल, गरजेचं असेल, त्यात मी आहेच की तुझ्यासोबत! मी कोणत्याही परिस्थितीत तुझी साथ सोडणार नाही याची खात्री बाळग. लोक काय बोलतात याच्याशी मला घेणंदेणं नाही. मी आणि माझं कुटुंब नेहमी तुझा, तुझ्या कलेचा आदर करू.”
“हे बघ कला, मी अगदी प्रांजळपणे मान्य करतो की मला तू मनापासून आवडली आहेस. तुझे प्लस-मायनस जे काही गुण असतील, सगळे मान्य आहेत मला. यावरून मी काय किंवा माझे घरचे काय, कोणीही कधीच तुला काही बोलणार नाही. ना तशी वागणूक देणार... खरं सांगतो, तुला भेटण्याच्याही आधीपासून एक अनामिक ओढ वाटली होती तुझ्याविषयी, खासकरून त्या चित्रावर तुझं नाव बघून... तुझ्या कलेच्या आणि नावाच्या प्रेमात पडलो मी! आणि मग हळूहळू जाणीव झाली की कदाचित तूही माझ्या मनात खास जागा निर्माण केली आहेस. खूप विचार केला, आकर्षण तर नाही ना याची खात्रीही करून घेतली. मग जाणवलं की नाही, मला खरंच तू मनापासून आवडली आहेस आणि माझ्या आयुष्यातही हवी आहेस. तुझ्या हाताबद्दल मला काहीच अडचण नाही. कामं तू करशील की नाही, मला फरक पडत नाही. आपल्या घरी तुला असंही काही काम करण्याची गरज नसेल. जी कामं तू करणं अपेक्षित असेल, गरजेचं असेल, त्यात मी आहेच की तुझ्यासोबत! मी कोणत्याही परिस्थितीत तुझी साथ सोडणार नाही याची खात्री बाळग. लोक काय बोलतात याच्याशी मला घेणंदेणं नाही. मी आणि माझं कुटुंब नेहमी तुझा, तुझ्या कलेचा आदर करू.”
सारंगचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटला. सर्व जण त्याच्याकडे कौतुकाने बघत होते.
“अगं त्याचा पाय दुखेल, उत्तर तरी दे.” कलाचा भाऊ म्हणाला तसे सगळे हसू लागले.
कलानेही वेळ न घालवता आपला होकार कळवला.
तसे सर्व जण आनंदाने पुढच्या तयारीला लागले. कलाच्या कलेने आज तिच्या आयुष्यात एक हिरा आणला होता.
समाप्त
© कामिनी खाने
© कामिनी खाने
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा