Login

लग्नाची बेडी -पायातली नव्हे हातातली भाग १

Story Of One Marriage
लग्नाची बेडी -पायातली नव्हे हातातली भाग १


संध्या, झालं का नाही तुमचे अजून;
ही बघ सुवर्णा आली पण. ..... संध्या च्या सासूबाईंनी आवाज दिला.

हो .. हो ....झालच हं आई ...

सुवर्णा ताई आलेच मी, तोपर्यंत ही लिस्ट बघा बरं...अजून काही राहिले असेल तर सांगा.
मी बघते मानसी चे आवरले का.

दे इकडे ....आणि मानसीला लवकर तयार व्हायला सांग.तिकडे मुलाकडचे पोहचले असतील शॉप मध्ये.उगीच त्यांना वाट बघायला लावली तर चिडायचे.... सुवर्णा ताई म्हणाल्या.

गीता ए गीता सुवर्णा ताईंसाठी चहा ठेव. मी बघते मानसी चे आवरले का.

हो आई ठेवते.

सुवर्णा आणि संध्या दोघी सख्या जावा. विभक्त असल्या तरी एकमेकांकडे येनेजाने असायचे. सुवर्णा तशी फटकळ म्हणून सासूचे आणि तिचे जरा कमीच पटायचे.संध्या मात्र सासूबाईंना सांभाळून घ्यायची. 'गीता' ही संध्याची सून आणि 'मानसी' मुलगी.आपल्या लाडक्या नातीसाठी साठी सुवर्णाने स्थळ आणले म्हणून
सासूबाई सुवर्णाशी जरा बरं बोलत होत्या.

"मानसी.....अरे बापरे, अग काय हे. तू अजून आवरले नाहीस. उशीर होतोय ग बाळा.काकुसुद्धा आल्या आहेत.
चल आवर पटापट ..
ही साडी नेस ...छान दिसते तुला.
गीता ला पाठवू का तुझ्या मदतीला."
संध्याताई मानसीला म्हणाल्या.

"आई.!"...मानसी मोठ्याने ओरडली.

"अग काय चाललंय? हे सगळे अचानक असे.
काल ते सगळे मला बघायला काय येतात; लग्नासाठी होकार काय देतात आणि तुम्हीही लगेच हो म्हणून मोकळे की आज लगेच खरेदी.
माझा तर विचारच नाही कोणाला. मला थोडा वेळ तरी द्या हे समजून घ्यायला."
मानसी खूप रागाने बोलत होती.

"मानसी, अशी चिडू नकोस बाळा."

"चिडू नको तर काय करू, आई.
तुला माहितीये मला इतक्यात लग्न करायचे नव्हते. मला जॉब करायचा होता,आधी स्वतःचे नाव कमवायचे होते,आर्थिकदृष्ट्या सक्षम बनायचे होते.
बाबा सुद्धा तयार होते या सगळ्याला.
मग आता लगेच स्थळ आले म्हणून माझ्या सगळ्या ईच्या-आकांक्षावर पाणी सोडायचे का मी."

"मानसी,अस नाहीये ग बाळा.
काकू सांगत होत्या, खूप मोठे घर आहे त्यांचे.खूप श्रीमंत आहेत. मुलगाही चांगला आहे दिसायला; आणि लग्न झाल्यावर तू करू शकते ना जॉब."...संध्याताई तिला समजावत होत्या. तेवढ्यात ...

"काही गरज नाहीये जॉब करण्याची." सुवर्णा ताई मानसीच्या रूम मध्ये येत म्हणाल्या.
खूप श्रीमंत आहेत ती लोकं.तुला जॉब करायची काही गरज नाहीये.
"एवढं चांगल स्थळ शोधूनही सापडले नसते. तुझ्या काकांचे चांगले मित्र आहेत त्या मुलाचे काका.
यांनी शब्द टाकला म्हणून सगळे जुळून आले आणि तू काय रडत बसलीस जॉबसाठी.
अग श्रीमंतीत लोळशिल आयुष्भर ....
आवर लवकर....उशीर होतोय जायला."असे म्हणून सुवर्णाताई बाहेर हॉल मध्ये गेल्या.

हे सगळे एकूण मानसीला मात्र रडू कोसळले. लग्नानंतर जॉब करायला मिळेल ही पण आशा तिची मावळली होती.

गीताही रूम मध्ये येऊन सगळे ऐकत होती. मानसीला समजावत ती म्हणाली,

"मानसी ताई तुम्ही कशाला काकुंचे बोलणे मनावर घेता, अहो कदाचित त्या मुलाचे घरचे नाही पण तो मुलगा तुम्हाला करू देईल ना जॉब."

संध्याताईंनी आपले अश्रू आवरले.

त्यांनाही मानसीची ही अवस्था बघवत नव्हती. त्यांनाही वाटत होते तिने जॉब करावा. नुकतीच मानसीने बीई ची शेवटच्या वर्षाची परिक्षा दिली होती; आणि मोठ्या काकांनी तिच्यासाठी लगेच स्थळ आणले होते. स्थळ चांगले असल्याने मानसीच्या आई - वडिलांनाही नाही म्हणणे योग्य वाटत नव्हते.

स्वतःला सावरत संध्याताई म्हणाल्या,
" हे बघ बाळा, पुढे काय होईल हे सांगता येते का ? कदाचित त्याचं मन बदललं तर तेच तुला चांगला जॉब लाऊन देतील त्यांच्या ओळखीने."

"आई , वहिनी तुम्ही दोघी मला काहीही समजावण्याचा प्रयत्न करू नका.
ऐकलत ना, काकू काय म्हणाल्या ते. त्यांना जॉब करणारी मुलगी नको आहे."
मानसी रडतच म्हणाली.

संध्याताई तिला समजावत म्हणाल्या,
"हे बघ, जॉबच केला पाहिजे अस काही नाही. तू दुसरही काही करू शकतेस.आणि तसही जॉब करणाऱ्या बायकांना किती कसरत करावी लागते. आपल्या शेजारच्या श्रावनीचेच बघ,तिला थोडा सुद्धा वेळ मिळत नाही.नुसती पळत असते. तारेवरची कसरत असते स्रीची जॉब म्हणजे."

" संध्या, झाले का नाही अजून तुमचं.काय बाई किती वेळ लावता या मायलेकी" सुवर्णा ताई डोळे मोठे करत ओरडल्या.

सुवर्णाचा आवाज ऐकून, संध्याताई....

गीता, कर बर मानसीला लवकर तयार आणि तू ही आवर.निघायला हवं.
मनु आवर, बाबा आणि काका पुढे गेलेत. वेळेवर पोहचायला हवं .

क्रमशः

काय होईल?मानसी करेल का लग्न?वाचू पुढच्या भागात.