Login

माहेरपण भाग १

माहेर...
कौटुंबिक कथालेखन

माहेरपण - भाग १

“काय गं आशा, घर एवढं रिकामं रिकामं का वाटतंय? मुलं कुठे गेली?” शेजारच्या सुनंदाताईंनी घरात येताच आशाताईंना विचारलं.

“अगं मुलं थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या आजोळी गेली. राकेश गेला होता रश्मी आणि मुलांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडायला. बाकी तो काय, तसाच तिथून ऑफिसला जाणार होता.” आशाताईंनी उत्तर दिलं.

“रेल्वेने का गं? राकेशनेच जायचं ना त्यांना सोडायला. अशा ट्रेनच्या प्रवासामुळे उगीच रश्मीची पण दगदग व्हायची. मुलं आणि सामान घेऊन जायचं म्हणजे त्रासच ना शेवटी.” सुनंदाताई म्हणाल्या.

“अगं, या तिघांचा मुक्काम आता चांगला महिनाभर आहे. हा राकेश काय दोन दोन वेळा सुट्टी घेऊन जाईल? मुलखाचा आळशी तो! म्हणे मी तुम्हाला घ्यायलाच येईन, तेव्हाच राहीन तीन चार दिवस काय ते. मग काय, गेले हे तिघेच. याच्यामुळे मुलांच्या आजोळी जाण्याच्या उत्साहावर विरजण कशाला ना. तरी मी पण बोलत होते त्याला की अरे जा दोन दिवसांसाठी तरी; पण हा ऐकेल तर शप्पथ!” सुनंदाताईंच्या बोलण्यावर आशाताईंनी काहीसं हसूनच आपल्या लेकाचे गोडवे सांगितले. ज्यावर सुनंदाताईही हसल्या.

“काय बाई ही मुलं! यांच्या मूडमुळे बायका मुलांना पण कुठे जायला नको. तरी बरं, रश्मीने मनावर घेतलं आणि गेली माहेरी. एकदा का मुलं मोठी झाली की उन्हाळ्याच्या सुट्ट्या बंद अन् माहेरपण पण बंद! आपलं पण असंच तर व्हायचं ना.” सुनंदाताई जुन्या दिवसांना आठवून म्हणाल्या.

“खरंय तुझं. एकदा का मुलं मोठी झाली की सगळ्याच गोष्टींवर बंधनं आल्यासारखं होतं. कधी काय तर मुलांच्या परीक्षा आहेत, तर कधी मुलांच्या अभ्यासाची महत्त्वाची वर्षं आहेत. आपण नसलो तर कॉलेजला जाऊन पुन्हा घरची कामं कशी करतील मुलं ही चिंता लागून राहते. त्यामुळे कसलं माहेर नि कसली सुट्टी!” आशाताईंनी पण त्यांच्या बोलण्याची री ओढत म्हटलं.

“हो ना आणि मग जरा कुठे या सगळ्यातून मोकळे होतोय असं वाटायला लागलं की मग तब्येतीच्या तक्रारी काही आपली पाठ सोडत नाहीत. कधी दुखणं असतं तर कधी आणखीन काही!” सुनंदाताईंनी पण पुस्ती जोडली.

“नंतर माहेर फक्त आठवणीतच.” हे बोलताना आशाताईंचा स्वर काहीसा कातर झाला होता.

“खरंच! आपलं वय वाढत जातं आणि त्यासोबत आपल्या माहेरच्या हक्काच्या माणसांचे हात पण हळूहळू सुटत जातात. एकेक माणूस माहेरातून कमी होत जातो, ते आपल्या माहेरपणाला स्वतःसोबत घेऊनच!” सुनंदाताई म्हणाल्या.

दोघी शेजारणींचे इतक्या वर्षांत छान मैत्रीचे नाते तयार झाले होते. त्यामुळे दोघीही एकमेकींसोबत अगदी हक्काने व्यक्त होत असत. आताही वयाच्या या वळणावर माहेराच्या आठवणींना नकळतच उजाळा मिळाला आणि दोघीही त्या आठवणींमध्ये हरवण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नव्हत्या.

काही वेळातच जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. तशा त्या थोड्या वेळाच्या शांततेला भंग करत आशाताईंनी सुनंदाताईंना विचारलं,
“आनंद येणार होता ना गं?”

“छे गं! मुलांना त्यांच्या कामांमधून सवड मिळते?” सुनंदाताईंनी हताश सुस्कारा सोडत म्हटलं.

“मग तुझं जायचं काय? आनंदच घेऊन जाणार होता ना तुला आणि भाऊजींना?” आशाताईंनी पुन्हा प्रश्न विचारला.

“नेणार होता खरं; पण त्याला म्हणे अचानक काम आलंय. तर शक्यता कमीच आहे.”

“अगं पण तुझे बाबा आजारी आहेत ना? आता तरी तुझं जाणं गरजेचं आहे.” आशाताईंनी म्हटलं आणि सुनंदाताई खिन्न मनाने हसल्या.

“आपण जेव्हा दुसऱ्यांवर अवलंबून असतो ना, तेव्हा बऱ्याच इच्छा मनात दाबून ठेवाव्या लागतात गं. मला काही एकटीने लांबचा प्रवास जमत नाही. त्यात यांना पण वयोमानानुसार तब्येत बरी नसल्याने असं कुठे जाणं जमत नाही. मग काय, राहिला आनंदच! जो आम्हाला कुठे नेईल, तेव्हा आम्ही जाणार. आता त्यालाच वेळ नाहीये तर आपण काय बोलू शकतो?” सुनंदाताई म्हणाल्या.

“अगं मग वेळ काढायला सांग. तुझे जसे बाबा आहेत, तसे त्याचे पण आजोबा आहेतच ना? लहानपणी त्यांच्याकडे जो वेळ घालवायचा, तो आठवून तरी भेटायला चल म्हणावं. आजोबांनी काही त्याचे कमी लाड पुरवले नाहीत.” आशाताई आपलं मत मांडत म्हणाल्या.

“मुलांनी या गोष्टीचा विचार केला असता तर काय बोलावं. आता आपण फक्त समजून घ्यायचं, अशी परिस्थिती आहे.” सुनंदाताईंनी नकारार्थी मान हलवत म्हटलं.

“समजून घ्यायचं? नाही म्हणजे ते ठीकच आहे गं; पण त्यालाही काही मर्यादा असतातच ना. आजवर काही कमी केलं आहेस का तू आनंदचं? आता त्याच्या मुलांना सांभाळण्यासाठी पण पुढेपुढे असतेसच ना? मग त्यानेही कधीतरी तुझ्या मनाचा विचार करायला नको का?” आशाताईंनी काहीसं रागावूनच म्हटलं.

“काय बोलू?” सुनंदाताई शांतपणे म्हणाल्या.

क्रमशः
© कामिनी खाने
#ईरास्पर्धा

सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all