Login

माहेरपण भाग २

माहेर...
कौटुंबिक कथालेखन

माहेरपण - भाग २

“अगं, माझं म्हणणं काय आहे की इतके वर्षं मुलाची आबाळ नको म्हणून तू सांभाळून अन् समजून घेतलंच ना. जेव्हा स्वतःचं स्वतःला झेपायचं, तेव्हा मुलाचा विचार करून माहेरापासून अंतर ठेवलं होतंस ना? मग आता जेव्हा माहेरच्या हक्काच्या माणसासाठी माहेरी जावंसं वाटतंय, तर मग मुलाने पण समजून घ्यायला नको का?” आशाताईंनी जुन्या गोष्टी लक्षात घेऊन म्हटलं.

“त्याने समजून घ्यावं असं मला लाख वाटेल गं! पण आपल्या हातात आहेच काय, असा विचार करून गप्प बसते.” सुनंदाताई काहीशा हताशपणे म्हणाल्या.

“तुझं हेच तर चुकतंय! कधीतरी हक्काने त्याचा कान पकडून ठामपणे बोल ना. वेळ नाही म्हणतोय; पण आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांसाठी थोडी सवड तर मिळूच शकते ना? त्याला एरवी कुठे जायला बरी सवड मिळते? कामासाठी आणि फॅमिली ट्रिपच्या नावाखाली फिरतच असतो ना. मग कधीतरी स्वतःच्या कर्तव्यांसाठी सुट्टी घ्यावी लागलीच, तर बिघडतंय काय!” आशाताईंनी म्हटलं.

“तुझं म्हणणं बरोबर आहे गं आशा. तुझा राकेश इतर वेळी कितीही नको म्हणाला तरी बायको आणि मुलांना आणायला जाण्याच्या निमित्ताने का होईना पण जाणार तर आहेच. तुझ्यासोबत पण तसा येतोच म्हणा कधी माहेरी फेरी मारायची असेल तर. आमचं काय! माझं माहेर म्हणजे आनंदसाठी सगळ्यात कंटाळवाणं ठिकाण आहे. काय तर म्हणे तिकडे जाऊन बोअर होतो मी! मला सांग आशा, माणसाचं मन इतकं कसं बदलतं गं? म्हणजे बघ ना, कधीकाळी माझं माहेर, म्हणजे आनंदचं आजोळ त्याला खूप खूप आवडायचं. दर वर्षी सुट्टीला तिकडे जाण्यासाठी अगदी उत्साही प्राणी बनायचा तो. जसजसं शाळेच्या महत्त्वाच्या वर्षांमुळे त्याला आजोळी जायला जमणं कठीण झालं, तसा दरवर्षी चिडचिड करायचा. का? तर आता सुट्टीत आजोळी जायला जमत नाही. तोच आनंद आता मात्र त्याच ठिकाणाबाबत अगदी कोरड्या मनाचा झालाय.” बोलता बोलता सुनंदाताईंना भरून आलेलं.

आशाताईंनी सुनंदाताईंच्या हातावर हात ठेवून हलकेच थोपटलं आणि म्हणाल्या,
“तो त्याच्या आजोळासाठी कितीही निष्ठुर होऊ दे गं. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुझ्या माहेरपणावर कशाला व्हायला हवा? त्याचा आजोळाप्रति जिव्हाळा आटला असेल कदाचित; पण तुझी माहेरावरची माया, माहेरासाठीची ओढ कमी झाली आहे का?”

यावर सुनंदाताईंनी नकारार्थी मान डोलावली.

“हेच तर मुलांना कळायला हवं. आपला जीव तिथे रमत नसेल तरी आईचा जीव त्या ठिकाणी अडकलेला आहे, याची जाणीव मुलांना पण असायला हवी. जर ती नसेल, तर आपणच थोडंफार कठोरपणे आपले विचार मांडायला पाहिजेत.” आशाताईंनी म्हटलं आणि सुनंदाताई विचारात पडल्या.

“तू म्हणत आहेस तेही खरं आहे. खरंतर दोन वर्षांपूर्वी आई अचानक सोडून गेली आणि मला तर माहेर तुटल्यासारखंच वाटलं होतं. बाबांनी मात्र या वयातही माझं माहेर जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला हो. तसे दादा वहिनी पण करतात गं हौशीने सगळं; पण आईबापाची सर काय कोणाला येते? दादाला बाबांसारखंच मानते म्हणा मी, तरी शेवटी आईबाबा जितका काळ सोबत असतील ते कमीच वाटतं. आई तर अचानक गेली म्हणा; पण आता बाबांच्या आजारपणात पण त्यांना बघायला जाण्यासाठी अशी अवस्था आहे. म्हणून जास्त वाईट वाटतंय.” सुनंदाताईंनी मनातली सल बोलून दाखवली.

“खरंय. आईबाबांची जागा कोणी घेऊ शकत नाही. माझंच बघ ना, आजारपणाचं निमित्त झालं आणि आईबाबा लागोपाठच आम्हाला सोडून गेले. त्यांचं वय झालं होतंच तसं; पण तरीही इतक्यात त्यांचं जाणं मनाला लागलंच. आता पण वहिनी आग्रहाने बोलावतेच म्हणा, तरी मनात कुठेतरी वाटतं की माहेरी तर जाईन; पण आईबाबांनी जपलेल्या माहेरपणाच्या आठवणी जाग्या झाल्या तर स्वतःला सावरू शकेन का? म्हणून टाळतेच. तरी अगदीच दूर राहणं जमत नाही म्हणून अधूनमधून फेरी मारते. बराच मोठा मुक्काम मात्र नको वाटतो हल्ली.” आशाताईंनी पण स्वतःच्या अनुभवांना व्यक्त केलं.

“म्हणूनच बाबांकडे जाण्याची इच्छा आहे गं. कोणास ठाऊक, पुन्हा कधी हे असं माहेरपण जगता येईल! आयुष्याचा तर काही भरवसाच नाही.” सुनंदाताई भावूक होत म्हणाल्या.

“म्हणूनच सांगतेय की एकदा जाऊन ये. काही दिवस रहा तिथे. तुझ्या मनाला पण बरं वाटेल आणि भविष्यात आधी न गेल्याची खंतही राहणार नाही.” आशाताईंनी समजावण्याच्या स्वरात म्हटलं.

“जायचं तर आहेच गं; पण...”

“आता पण वगैरे सगळं बाजूला ठेव पाहू.‌ तुझी इतकी इच्छा आहे तर का मन मारून जगायचं? ते काही नाही. तू एकदा तुझे जुने माहेरी घालवलेले दिवस आठव.‌ आपोआप त्या ओढीने तुझी पावलं माहेराकडे वळतील.” सुनंदाताईंचं बोलणं अर्धवट ठेवत आशाताईंनी म्हटलं.

क्रमशः
© कामिनी खाने

सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all