कौटुंबिक कथालेखन
माहेरपण - भाग ३ अंतिम
“जुने दिवस! ते तर मनात कोरलेले आहेत गं. बाकी काही कशाला, या उन्हाळ्याच्याच आठवणी काय कमी आहेत! उन्हाळ्यात माहेरी गेले की काय ते सोहळे साजरे व्हायचे. वर्षभरात क्वचितच फेरी व्हायची ना, मग उन्हाळ्यात सगळी कसर भरून निघायची.” आता सुनंदाताईंच्या बोलण्यात काहीसा उत्साह झळकत होता.
“हो ना. उन्हाळ्यात माहेरी गेलं की एक वेगळीच मजा असायची. मुलांचा गोंगाट, आजूबाजूच्या नातेवाईकांना भेटणं, गावातल्या गमतीजमती, खायची चंगळ आणि किती कायकाय!” आशाताईंनी पण जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटलं.
“खायची चंगळ? त्यासाठी पण ही मुलं धुडगूस घालायची बोल. आताही आठवून हसायला येतं. कधी आंब्याच्या झाडावर चढून बसणार, कधी जांभळीच्या झाडाला लटकून बसणार. कधीकधी तर कोणत्या बागेतच ठाण मांडून बसायचे. देवा! किती उद्योग असायचे.” सुनंदाताई हसतच म्हणाल्या.
“वाळवणांवर पण पार तुटून पडायचे ना?” आशाताईंनी म्हटलं.
“हो तर.”
“आणि वाळवणं तर कितीतरी दिवस चालायची बाई! आईला तर लेकीसाठी आणि घरात खायला म्हणून किती कायकाय करू नि किती नको असं व्हायचं. वेगवेगळे पापड, कुरडया, पापड्या, फेण्या, सांडगे, यांची यादी काही लवकर संपायचीच नाही.” आशाताई म्हणाल्या.
“हो ना. त्यासाठी मग सकाळी लवकरच अंगणात, गच्चीवर वगैरे बायकांची रेलचेल दिसायची. सगळ्याच घरांमध्ये सारखीच परिस्थिती!”
“त्यात पण कधी चुकून एखादं वाळवण फसलं, मग तर नुसता वैताग वाटायचा.” आशाताईंनी हसून म्हटलं.
“हो, मग त्या गुठळ्या वगैरे झाल्या की मुलं लगेच यायचीच फस्त करायला.” सुनंदाताई पण त्या आठवणीत रमत म्हणाल्या.
“लेक आणि नातवंडं आली आहेत म्हणून रानमेवा पण काय कमी असायचा घरात! आताही आठवल्यावर जाणवतंच की जुने दिवस काही परत यायचे नाहीत.”
आशाताईंच्या बोलण्यावर सुनंदाताईंनी पण हुंकार भरला.
“माहेरी गेल्यावर जुन्या मैत्रिणी पण भेटायच्या ना. ते तर सोन्याहून पिवळं वाटायचं. लहानपणी एकत्र खेळलो बागडलो होतो. आता तर कित्येक वर्षं उलटून जातात तरी भेट होत नाही. सगळ्याच आपापल्या आयुष्यात व्यस्त झाल्या आणि माहेरपण मागेच सुटलं.” सुनंदाताई लहानपणीच्या मैत्रिणींना आठवून म्हणाल्या.
“खरंच. माहेर मागे सुटलं की माहेराशी जोडलेल्या सगळ्याच गोष्टी मागे राहतात.” आशाताई पण हळव्या स्वरात म्हणाल्या.
“आताच्या मुलींचं एक बरं असतं ना पण, मनात आलं तेव्हा कुठेही जा. मनात येईल तेव्हा हवं त्या व्यक्तीसोबत बोला.” सुनंदाताई म्हणाल्या.
“हो. म्हटलं तर याला चांगलं म्हणता येईल अन् म्हटलं तर वाईट पण. काही मुली या माहेरपणाच्या सोहळ्यात रमतात आणि काही मात्र स्वतःच्याच आयुष्यात मश्गूल!” आशाताईंनी दोन्ही बाजूंनी विचार करत म्हटलं.
“तुझं पण खरंच आहे हां. आता आमचीच सूनबाई बघ. एरवी हवं तेव्हा माहेरी जात असते खरी; पण तो जो माहेरपण नावाशी जिव्हाळा असतो तसा फारसा नाही गं. आली भेटून, झालं काम! कधी मी स्वतःहून म्हटलं की जा गं मानसी माहेरपणाला, तरी तिला कंटाळा येतो. काय तर म्हणे एवढं काय कौतुक माहेरपणाचं. नेहमी तर भेटतेच ना त्यांना. मलाच प्रश्न पडतो, काही दिवसांनी आपल्यासारख्या माहेरपणाचे सोहळे कोणाच्या बोलण्यात तरी राहतील ना?” सुनंदाताईंनी आपल्या घरच्या परिस्थितीवर भाष्य करत शंका बोलून दाखवली.
“राहील की! माहेरपण जपू पाहणाऱ्या सुना पण आहेत ना. आमची रश्मीच बघ. मुलांना मामाच्या गावाची ओळख राहायला हवी, स्वतःला हक्काचं माहेरपण मिरवता यायला हवं म्हणून गेलीच की माहेरी. ती तर मला पण बोलणं होती की चला. मीच म्हटलं की कधीतरी सासूशिवाय रहा बाई. नाहीतर तिथे पण माझ्या सेवेत गुंतशील आणि मग कसलं तुझं माहेरपण नि कसलं काय!” आशाताईंनी हसूनच म्हटलं.
“बरंय! अशीच खेळीमेळी आणि समजूतदारपणा हवा आयुष्यात.”
“आठवणी पुरे झाल्या आता. पुन्हा माहेरपण जगायला तू कधी जातेस ते सांग?” आशाताईंनी पुन्हा आधीच्या मुद्द्याला हात घालत म्हटलं.
“अगं पण आनंद...”
“आनंद नाही आला तर तू जाणारच नाहीस का? त्यापेक्षा तूच जा. की मी येऊ? म्हणजे तुला काही चिंताच नाही.”
“तू?”
“हो. मला प्रवासाची सवय आहेच तशी. जाऊ की आपण सोबत. तेवढंच मी पण नव्याने माहेर जगेन.” आशाताईंनी हसूनच म्हटलं.
“हो चल की! माझं माहेर ते तुझंही माहेरच! पण मग राकेश?”
“त्याचं काही नसतं. स्वतःच्या जेवणाची सोय करेल तो.” आशाताईंनी लगेचच शंकेचं निरसन केलं.
“तुला काही अडचण नसेल तर ठीक आहे. बोलते मी तसं घरी.”
“बोलते? सांगते म्हण! आता बॅग घेऊन निघायचं फक्त आपण.”
“हो. आपल्या हक्काच्या माहेरपणाला!” सुनंदाताई उत्साहात म्हणाल्या आणि दोघींनीही लगेचच नव्याने आपलं माहेरपण जगण्यासाठीची तयारी सुरू केली.
समाप्त
© कामिनी सुरेश खाने
© कामिनी सुरेश खाने
सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा