Login

मुरलेलं नातं

कथा एका मुरलेल्या नात्याची...
मुरलेलं नातं


“अहो हे काय?” राधिकाताईंनी हलकेसे हसूनच विचारले.

“काय म्हणजे? गुलाबाचं फूल आहे. तेही आपल्याच बागेतलं बरं का!” रमेशरावांनी उत्तर दिले.

“ते मलाही दिसतंय ओ. पण हे असं फूल वगैरे का अचानक?” राधिकाताई म्हणाल्या.

“असंच, मला वाटलं द्यावंसं म्हणून देतोय.” रमेशरावही सहजच उत्तरले.

“तुमचं आपलं काहीतरीच! आता काय हे असं गुलाबाची फुलं देण्याघेण्याचं वय राहिलंय का आपलं?” असे म्हणून राधिकाताई किंचित हसल्या.

रमेशरावांनी राधिकाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाले,
“फुलं देण्यासाठी वय बघण्याची काय गरज? माझी हक्काची बायको, माझ्या हक्काच्या घराचं अंगण आणि हो, फुलं पण माझ्या हक्काच्या बागेतलीच! हां म्हणजे माझ्या या हक्काच्या बायकोनेच वाढवलेली बाग आहे म्हणा ही; पण तेच ना... माझ्या हक्कानेच मी काहीतरी करतोय. यावर कोणी काय बोलेल? आणि यात वय बघणं कशाला हवं?”

रमेशरावांचे हे असे स्पष्टीकरण ऐकून राधिकाताईही क्षणभर काहीच बोलल्या नाहीत.


काही क्षण तिथे शांतता पसरली होती. राधिकाताई तर स्वतःच्याही नकळत काहीशा हळव्या झाल्या होत्या. डोळ्यांतले ते थेंब पापण्यांची वेस ओलांडू पाहत होते; पण ती भावनाच काहीशी वेगळी होती. कदाचित त्यामुळेच त्या थेंबांना अजूनही वेस ओलांडता आली नव्हती.


“तसं नाही ओ.” शेवटी राधिकाताईंनीच ती शांतता भंग करत म्हटले.

“तसं नि असं... मला काही ऐकायचं नाही. घे पाहू हे फूल. बिचारं कधीपासून वाट बघतंय की कधी आमची लाडकी मालकीणबाई मला हातात घेईल. तेवढाच त्याचा जन्म सार्थकी लागेल ना.” रमेशराव थट्टा करत म्हणाले.

“काहीही!” राधिकाताई किंचित डोळे वटारून म्हणाल्या खऱ्या; पण हेसुद्धा तितकेच खरे की राधिकाताईंच्या बोलण्यात आपसूकच एक लाजरी छटा उमटली होती.


रमेशराव काही वेळ राधिकाताईंकडे पाहतच राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असलेले ते समंजस भाव, तो सोज्वळपणा, काहीसा संकोच अन् थोडाफार गोंधळ रमेशरावांना सहज वाचता येत होते. गुलाबाच्या छटेसारखीच एक भुरळ घालणारी छटा आज या वयातही राधिकाताईंच्या सौंदर्यात भर घालत होती.


“अगं खरंच! जसं तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य सार्थकी लागलं, तसंच कायम आईच्या मायेने लाड करणाऱ्या मालकिणीच्या केसांमध्ये मिरवल्यावर या गुलाबाला पण त्याचा जन्म सार्थकी लागला असं वाटेल. आता तरी या गुलाबाला केसांत माळशील ना?” रमेशराव मनापासून म्हणाले.

“हो हो. द्या इकडे.” राधिकाताई हसूनच म्हणाल्या आणि त्यांनी ते गुलाबाचे फूल आपल्या हातात घेतले.

“आता तरी तुमचा गुलाब खूश झाला असेल ना?” गुलाबाच्या पाकळ्यांना अलगद स्पर्श करत राधिकाताईंनी म्हटले.

“अगं... गुलाबच काय, इथे तर गुलाब देणारा पण चांगलाच खूश झाला आहे.” रमेशराव असे म्हणाले आणि खळखळून हसले. राधिकाताईंच्या ओठांवरही आपसूकच हसू उमटले होते.


आयुष्यात काही क्षण असेच तर येत असतात. वर्षानुवर्षे आयुष्यभराच्या साथीसोबत जगत असताना नात्यात कित्येक वळणे येतात. काही आंबट, गोड, कडू म्हणाव्या अशा अनुभवांना सामोरे जाऊन नाते मुरत असते. कदाचित म्हणूनच ते इतर कोणा स्थितीवर किंवा माणसांवर अवलंबून नसते. कारण त्या दोघांना एकमेकांचे अस्तित्व हवे असते. त्या अस्तित्वाच्या छायेत हे नाते आणखी बहरत जाते. आणखी मुरत जाते.

आता या क्षणीसुद्धा शांततेतही दोघांचा जणू मूक संवाद सुरू होता. संध्याकाळच्या त्या रम्य वातावरणात घराच्या बागेत बसून चहा घेणे आज चांगलेच अविस्मरणीय क्षण त्यांच्या वाट्याला देऊन गेले होते. चहाचे कप तर केव्हाच रिकामे झाले होते. मात्र एका लहानशा गुलाबाच्या फुलाने नात्याला नव्याने खुलवले होते.


घरात येताच राधिकाताई आपल्या खोलीत गेल्या. त्यांनी तो गुलाब केसांमध्ये माळला आणि एकवार आरशाकडे पाहिले. स्वतःचे ते रूप पाहून त्यांच्याही नकळत त्या काहीशा गहिवरल्या होत्या.

“काय झालं? आरशासमोर उभी राहून तो माळलेला गुलाब न्याहाळत आहेस की आज तुला जुनी राधा आठवली? हां?” खोलीत येणारे रमेशराव खट्याळपणे म्हणाले.

“छे हो! तुमची चेष्टा करण्याची सवय काही गेली नाही अजून.” राधिकाताई लटका रुसवा आणून म्हणाल्या.

“हे घ्या. खरं बोलण्याची पण सोय नाही राहिली. अगं... चेष्टा नाही गं करत मी. अगदी खरं बोलतोय. आणखी स्पष्ट सांगू... आज जितक्या मोकळेपणाने तू हसली आहेस ना, ते गोड लाजरं हसू पाहून अगदी लग्नानंतरची नवी नवरी असतानाची तू आठवलीस.” रमेशराव आताही मोकळेपणाने व्यक्त होत म्हणाले.

“काहीतरीच! ते दिवस केव्हाचेच सरले बरं. आता आपण चांगले साठी पार झालो आहोत म्हटलं.” राधिकाताईंनी तरीही आपल्या वयाची आठवण करून देत म्हटले.

“वय किती का वर्षं पार करेना; पण आपलं मन तर अजून तरुण आहे ना? तुझं काही माहीत नाही बुवा! मी तर मनाने तरुण आहे. ते तरुण मन तसंच प्रसन्न राहावं म्हणून आता तुला अधूनमधून गुलाबाचं फूल देण्याचा विचार पण पक्का केला आहे मी.” रमेशराव थोडं गंभीरपणे आणि मधेच किंचित मस्करी करत म्हणाले.

यावर राधिकाताई पण हसल्या.

“तुम्हाला आठवतंय का ओ... आपलं लग्न झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की "गजरा माळला नसतास तरी चाललं असतं. तू स्वतःच फुलांपेक्षाही सुंदर आहेस." आठवतंय का?” राधिकाताईंनी काही जुन्या आठवणी जाग्या करत म्हटले.

“अच्छा. मी असं म्हटलं होतं का?” रमेशरावांनी भुवया किंचित उंचावून थट्टेच्या स्वरातच विचारले.

“हो मग! आणि मग तुमच्या इच्छेचा मान राखत मी ते ऐकून पुढचे पाच दिवस गजरा माळलाच नव्हता. म्हटलं उगीच तुम्हाला फुलांमध्ये आणि माझ्यात तुलना करायचा प्रश्न पडायला नको ना.. म्हणून!” राधिकाताई हसून म्हणाल्या.

“अरे बाप रे! हे तर काहीतरी नवीनच समजतंय मला आज. आता समजतंय की त्या वेळची ती शांत राधा मनातून मात्र एवढी बडबड करत होती.” रमेशराव काहीसे आश्चर्य व्यक्त करत म्हणाले.

“तसं तर खूप काही बोलायचं राहून गेलं होतं ना त्या वेळेस. तेव्हाची परिस्थिती पाहता ते शक्यच झालं नाही.” राधिकाताई काहीतरी विचार करत म्हणाल्या.

“मग आता बोल! असंही आता आपल्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे जे काही आहे ते सगळं बिनधास्त बोल. मनात असलेल्या जुन्या, नव्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने व्यक्त कर. तुझ्या मनातील त्या कप्प्याला उजाळा देणं मला नक्कीच आवडेल हां. आणि हो, मला काय वाटेल हा विचार पण करू नकोस बरं!” रमेशराव समजुतीने म्हणाले.

क्षणभर दोघेही गप्पच होते.

पुन्हा एकदा रमेशरावच पुढाकार घेऊन म्हणाले,
“आपण इतक्या वर्षांत वागण्यातून एकमेकांना छान समजून घेत आलो ना. प्रेम, काळजी, रुसवा, सगळंच छानपैकी सुरू होतं; पण या समंजसपणाच्या नादात आपल्यातलं बोलणं मात्र कमीच होतं. खरं सांगू... कदाचित त्यामुळेच आता मनाला शब्दरूप भुरळ घालत आहे. म्हणून म्हटलं बोल.”

“बोलण्यामुळे आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी खरोखरच बदलल्या असत्या?” राधिकाताईंनी सहजच विचारले.

“बदल असते की नाही हे तर मला ठाऊक नाही. हां, एक मात्र खरं की बोलण्यामुळे काही गोष्टी आणखी सुखकर होऊ शकल्या असत्या. आठवणींमध्ये थोडासा आणखी गोडवा आला असता. आपला हा इतक्या वर्षांचा प्रवास आपल्यालाच कणभर का होईना पण जास्त मधुर भासला असता. आपल्या आयुष्याला दिलेली संवादाची फोडणी म्हण हवंतर. जिने या प्रवासाला अधिक चवदार बनवलं असतं.” रमेशराव काहीसा विचार करत म्हणाले.

“ह्म्म... तुमचं म्हणणं पण खरं आहे. तरी अजूनही उशीर झालेला नाहीये बरं का!” राधिकाताई म्हणाल्या आणि त्यांनी तिथल्या एका ड्रॉव्हरमधून एक जुनी डायरी काढली.

“हे काय बरं? नाही म्हणजे तू डायरी, वह्या घेऊन काहीबाही लिहत असतेस हे माहितीये मला; पण आता बोलणं सुरू असताना मधेच काय सुचलं तुला?” रमेशरावांनी न कळून विचारले.

“यामध्ये मी अधूनमधून काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.” राधिकाताईंनी उत्तर दिले.

“म्हणजे?”

“म्हणजे... कधी काही बोलणं जमलं नाही की आपसूकच मनातलं बरंच काही या पानांवर उतरवलं जायचं. ज्या गप्पा त्या वेळी प्रत्यक्षात करता आल्या नाहीत, त्या या पानांना मात्र माहीत असायच्या.” राधिकाताई हसून म्हणाल्या.

“अरे व्वा! म्हणजे आज आपल्या तरुणपणीच्या आयुष्याची छानशी सफर करायला हरकत नाही. चल, तुझ्या शब्दांत आज आपलं आयुष्य नव्याने अनुभवून बघू.” रमेशराव हसून म्हणाले आणि राधिकाताईंनी पण यावर मान डोलावून आपली संमती दर्शवली.

लग्नानंतर जबाबदाऱ्या पार पाडताना राहून गेलेला संवाद आता 'आपलासा वेळ' मिळाल्याने नव्याने त्या दोघांचं नातं खुलवत होता.
समाप्त.
© कामिनी खाने

साप्ताहिक लघुकथा लेखन स्पर्धा

सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.