Login

नकळत धागे जुळती भाग - तीन

प्रेम
नकळत धागे जुळती

भाग- तीन


वसुंधराच लग्न झाले आणि ती शहरात आली. दोन गोंडस मुलींचा जन्म झाला.तिने सतीशच्या मदतीने शिक्षण पूर्ण केलं आणि एकदिवस घरी परतांना सतीशचा अपघात होऊन तो गतप्राण झाला .


एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बाबांना पूर्ण गुंडाळलेल पाहून त्या इवलाश्या जीवावर काय वाटलं असेल? वसुंधरा तर पूर्णपणे सुन्न होऊन बसली होती. ना रडत होती, ना बोलत होती. तितक्यात विहा तिच्याजवळ आली .

"आई, अंकीत दादा म्हणतोय बाबा आता येणार नाही. ते माझे बाबा आहेत का?" विहा रडवलेली होऊन सतीशच्या पार्थिव देहाकडे बोट दाखवत म्हणाली.

"विहू माझं बाळ." म्हणून तिने विहाला मिठीत घेऊन रडू लागली. विभा विहा साठी तिला जगायचं होतं. त्यांच भविष्य घडवायचं होतं. बाहेरच्या जगाशी तिचा काही संपर्कच नव्हता पण बाहेर पडणं तर भाग होते. तिने कंबर कसली आणि उभी राहिली. ती सतीशच्या जागेवर नोकरीला रुजू झाली. तिचे सासू सासरे होतेचं तिच्यासोबत. काही वर्षांनी सासू सासरे मागोमाग देवाघरी गेले.. नोकरी करता दोन्ही मुलीचं शिक्षणही चालू होतं. तिला तिच्या मुलींच्या स्वप्नांना पंख द्यायचे होते. त्यांना आकाशात उंच झेप घेऊ द्यायची होती. वेदविहार प्रशस्त अशी सोसायटीत वसुंधरा विभाविहा नुकतेच शिफ्ट झाले. तिथून त्यांची शाळा, मार्केट जवळ पडत होती.या दरम्यान बॅकेचा मॅनेजर असलेले मोहन परांजपे यांच्याशी ओळख झाली. तेही त्याच सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहायला होते. मोहन काकांचा स्वभावच हेल्पिंग नेचर असल्यामुळे ते सर्वांना मदत करत असतं. मोहन काका अनाथ असल्याने त्यांनी अनाथ असलेली मीराशी प्रेमविवाह केला होता. मीरा हिच्या प्रेग्नसींमध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण झाली आणि तिने तिचं बाळ गमावलं. तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. मोहन तिची पूर्ण काळजी घेत होता. तरीही मीराची तब्येत खालावत होती आणि एक दिवस ती सर्व सोडून कायमची गेली. तेव्हापासून मोहन एकटा होता. मित्राने दुसऱ्या लग्नाचा तगादा लावूनही तो लग्न करायला तयार नव्हता. मोहन परांजपे यांची घरी ये जा होत होती. विभा विहा त्यांना मुलीसारख्याच होत्या. आणि मग तेही या परिवाराचे सदस्य झाले. त्यांची काळजी घेणं विभा विहाला आवडून गेलं. मोहनमध्ये ते त्यांच्या बाबांना पाहायला लागले. विभाला डॉक्टर व्हायचे असल्याने ती पुढिल शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात हॉस्टेलला गेली. मोहन काका घरी येऊन जाऊन बघून येत असत. तीन वर्षाने विहा एमबीए करण्यासाठी नामवंत कॉलेजला गेली आणि वसुंधरा एकटी पडली.


घरी मुली नसल्यामुळे वसुंधराच मन लागतं नव्हतं. रोज फोनवरून बोलणं होतं होत. अधूनमधून दोघेही येत होत्या. मोहन काकाही वसुंधराची चौकशी करत होते, त्यांना त्यांची मर्यादा माहिती होती. विभा डॉक्टरी पास करून आली आणि वसुंधराला तिच्या लग्नाचे वेध लागाले. तिला साजेसं स्थळ आलं डॉक्टर प्रणव यांच, त्यांच स्वतः च संजीवनी हॉस्पिटल होतं. प्रणवने विभाला कॉलेजमध्ये स्पेशल गेस्ट लेक्चर देत असतांनाच पाहिली होती. लेक्चर होऊन तिने डॉक्टर प्रणवला काही प्रश्न विचारले होते. बोलक्या डोळ्यांची विभा पहिल्या नजरेतच प्रणव तिच्यात हरवला होता.. बोलतांना तिच्या डोळ्यांची उघडझाप आणि ओठांची हालचाल त्याचे हार्टबिट्स वाढवायला पुरेशी होती, त्यानंतर प्रणवच्या डोळ्यांसमोरुन विभाचा चेहरा हटलाच नाही. आईवडिलांना सांगून आणि तिचे डॉक्टरी झाल्यानंतर रितसर मागणी घालायचे ठरवले. रितसर पाहण्यांचा क्रार्यक्रम झाला. विभाला आणि सर्वांना प्रणव आवडला. सर्वाच्या सवडीनुसार लग्नाची तारीख काढली आणि तो दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. आठवणींच्या कवडसातून वसुंधरा बाहेर आली. आठवणींसोबत अश्रू ही गालावर ओघळले होते. तिने ते पदराने पुसले आणि दोन्ही लेकींच्या मध्ये जाऊन त्यांच्या कपाळाची पापी घेऊन झोपली. सकाळ झाली तशी ती लगबगीने कामाला लागली. नाश्ता तयार करून तिने विभा विहाला उठवले. दोघी उठून आवरायला गेल्या. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि ते सर्व हॉलवर आले. हॉलवर सगळी तयारी मोहनकाकाने आधीच करून घेतली होती. तरीही इकडे तिकडे तेच पाहत होते. थोड्याच वेळात ब्युटिशियन विभाला तयार करत होती. मुर्हूताची वेळ झाली तशी विभाला घेऊन बाहेर आले. तिला पाटावर उभ राहून मध्ये अंतरपाट धरलेला होता. भटजी मंत्र म्हणत होते.. आनंद सोबत दुःख ही होत होत म्हणूनच तिचे मन भरून येत होते. एकमेकांना वरमाला घातली गेली. सर्व विधी पार पाडल्या. पाठवणीची वेळ झाली तशी वसुंधरा विभा विहा यांच मन भरून आलं. मोहनकाकांनी तिघांची समजूत काढली. सगळ्यांचा निरोप घेऊन विभा तिच्या सासरी गेली. सासरीही थाटामाटात स्वागत करण्यात आले.

विभाच्या सासरी जाण्याने दोघांनाही तिची कमी भासत होती पण नाईलाज होता. विभा तिच्या संसारी रमली.

असाच एक फोन आला. विहासाठी प्रणवने विराजचे स्थळ सुचवले. विराज प्रणवचा मित्र होता. विराजने विभा प्रणवच्या लग्नात विहाला पाहिले मनमोकळी स्वभावाची, ब्राऊन डोळ्यांत काजळ लावलेली, रेखीव चेहर्‍याची, बडबडी विहाला पाहिले आणि तिथेच तो क्लीन बोल्ड झाला. पाहण्याचा कार्यक्रम झाला. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाला नाही म्हणणारी विहा कधी विराजच्या प्रेमात पडली तिला ही कळलं नाही. एकमेकांसोबत भविष्याचं स्वप्न रंगवू लागले. बडबड करणारी विहा आणि शांत असणारा विराज. तिचं शिक्षण बाकी असल्यामुळे सद्ध्या एंगेजमेंट करायचा ठरवलं. सहा महिन्यांनी लग्नाचा मुर्हूत होता. दोघांची एंगेजमेंटचा दिवस उगवला. विहा ग्रे कलरच्या घागऱ्यामध्ये ती उठून दिसत होती. नेहमी कॉटन साडी नेसणारी वसुंधरा आज विहाच्या पसंतीने तयार झाली होती. तिच्या पसंतीची जांभळी कलरची साडी त्याला सोनेरी काठ खूप सुंदर दिसत होती. जबरदस्तीने विहाने तिचा साधाच मेकअप केला होता. कपाळावर त्याच कलरची टिकली. ओठांवर दिसणार ही नाही अशी पिंक कलरची लिपस्टीक लावून दिली. तिला अशा प्रकारे छान तयार झालेल पाहून दोघींचही मन भरून आलं. किती वर्षातून ती अशी सुंदर तयार झाली होती. तिने कायम असचं राहावं त्यांना वाटून गेलं.

"दिदू, आईने कायम असचं राहावं. किती सुंदर दिसतेय ती. बाबा गेल्यानंतर तिने डार्क कलरच्या साड्या कधी नेसल्या नाहीत. कधी नटली नाही. किती इच्छा तिने मनातच मारल्या असतील." ती हळूच विभा जवळ म्हणाली.

"हो ." दोघांचे डोळे भरून आले.

"बाळा डोळे पुसून घे, तिला दिसलं तर हजार प्रश्न विचारेल."

"हम्मऽऽ." विहाने पटकन डोळे पुसले.
"चल आपण तिघांची सेल्फी काढू." विहाने सेल्फी काढली.
तितक्यात मोहन काका आत आले.

"चिमणे,आवरले का तुमचे?"

"हो." वसुंधराला एकक्षण बघतच राहिले.

"सुंदर दिसतेय न आई." विहा त्याच्यांकडे बघून म्हणाली.

"हो .. खूपच." पुढचा शब्द त्यांनी हळूच पुटपुटले. नकळत त्यांची नजर वसुंधरावर जात होती. मोबाइलमध्ये फोटो वगैरे काढून घेतले. बाहेर येतांना वसुंधराने चेहऱ्यावरील पावडर पुसून घेतले. ओठांची लिपस्टीकही काढली. साडी मात्र तिचं राहू दिली. साडी काढून विहाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे होते.

"आता सहा महिन्यांनी विहूही लग्न होऊन जाईल. मी एकटीच राहिलं. आता मला काहीही झालं तरी कसलीच काळजी नाही." वसुंधरा म्हणाली.

"आई असं वेड्यासारखं काय बोलते ग?" विहा वैतागून म्हणाली.

रात्री आई निजल्यानंतर विहाचे विचार चक्र सुरु झाले. विचार करता करता मध्येच तिचे डोळे आनंदाने चमकले. तिने मनाशी काहीतरी ठरवून ती झोपली.

काय असेल विहाच्या मनात?