Login

नकळत धागे जुळती भाग - चार

मिशन दुल्हन को मनाओ I

नकळत धागे जुळती

भाग - चार


सकाळी आवरून विहाने विभाला फोन करून तिचा निर्णय सांगितला.

" विहूऽऽ , काय बोलतेस हे .. अगं .. पण .." विभाला काय बोलावं सुचत नव्हते.

"तू माझ्यासोबत आहे का? हो किंवा नाही इतकचं उत्तर हवयं दी." विहाने बोलून फोन ठेवून दिला.


सकाळी उठून ती तिच्या कामाला लागली. सर्वात आधी ती देवाच्या तिच्या बाबाच्या फोटोच्या पाया पडून घरातून बाहेर पडली.

विहाने विभा प्रणवला फोन करून बोलवून घेतले. विभा प्रणवला समोर पाहून वसुंधराला आश्चर्य वाटले.

"अरे तुम्ही काही कळवलं नाही येणार आहात ते. काही तयारी ही करता आली नाही तुमच्या स्वागताला."
तिने लगेच पाण्याचा ग्लास ट्रे मध्ये आणून त्यांना दिले. पटकन नाश्ता बनवला. जेवणाचा बेत विचार करत ती बसली होती. तितक्यात विभा विहाने बोलायला सुरुवात केली.


"आई मला एक महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे." विहा आईला हाताला धरून खूर्चीवर बसवत म्हणाली.

"काही टेंशन आहे का बाळा?" वसुंधराने विहाच्या गालाला हात लावत विचारले.

"आई .. म्हणजे बघ ना .. बाबा गेल्यानंतर आम्हीच तुझं जग होतो... आमच्यासाठीच जगलीस, आमच्यासाठी तू रक्ताचं पाणी केलसं, आम्हाला काय हवं काय नको ते पाहिलसं.. आमचं दोघांच शिक्षण.. ताईच लग्न झालयं, ती तिच्या संसारात हॉस्पिटलमध्ये छान रमली आहे. उद्या माझंही लग्न होईल आणि तू एकटी पडशील."

"बरं मग?" वसुंधरा म्हणाली.

"तुझी काळजी लागून राहिलं आम्हाला .. "

"त्यात काय एवढं, मुली सासरी गेल्यावर आईवडिल एकटेच पडतात. हळूहळू होईल सवय मलाही."

" अगं मला पुढे बोलू देना प्लिज." विहा मध्येच त्यांच वाक्य तोडत म्हणाली.

"बोल बाई बोल."

" यामध्ये आम्ही दोघचं आहोत. तू कुठे आहे? तुझं काय? तर आम्ही तुझं लग्न करायच ठरवलंय ." विहाने पटकन बोलून बॉम्ब फोडला आणि तिने मोकळा श्वास घेतला.

"क्कायऽऽ" हे ऐकून वसुंधराचे डोळे बाहेर यायचे बाकी होते.

"वेड बिड लागलाय का तुला? काही काय बरळते." वसुंधरा ओरडत म्हणाली.

"आईऽऽऽ. ती काहीही बरळत नाहीये गं. योग्य तेच बोलतेय. या वयात जोडीदारची साथ गरजेची असते गं. तुझा एकटेपणा आम्हाला सहन होत नाही. कमी वयात तुला हा एकाकीपणा आला. बाबा गेल्यानंतर खरचं तू तुझ्या मनासारखं जगलीस का? लोकांना समाजाला घाबरून मनाविरुद्ध जगली आहे. हे कर ते करू नको. विधवाने इथे जाऊ नको, असे कपडे घालायचे नाही.. केसांमध्ये गजरा माळायचा नाही. हेच ऐकत मोठं झालोय आम्ही.. कळत नव्हतं तेव्हा पण आता आम्हाला विचार करण्याची क्षमता आहे. काय चांगल काय वाईट हे आम्हाला कळते. आम्ही तुझा सुना गळा आणि रिकामं कपाळ पाहू शकत नाही. तुला ही जगण्याचा हक्क आहे." विभा वसुंधराला समजवण्याचा प्रयत्न करत होती.


" विभू तूही हिच्यासारखी वेडी झालीस का? अगं लोक काय म्हणतील. तुझे सासू सासरे काय म्हणतील.या वयात लग्न करतेय. जावाईबापू समजवा हो तुम्ही हिला. डोक्यावर परिणाम झालाय दोघांच्या. तरुणपणी लग्न केले नाही आणि या वयात म्हातारपणी लग्न करू. लोक शेणं घालतील मला." वसुंधरा आवाज चढवत म्हणाली.

"आई या वयातील एकटेपणा माझ्या काकांनी अनुभवलाय आणि राहिलेच माझे आईवडिल तर त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही."

"बघ जिजूही हो म्हणाले आता तूही हो म्हणं ना ." विहा आशेने वसुंधराकडे पाहत होती.

" काय खुळं डोक्यात घेऊन बसल्यात या पोरी ." वसुंधरा डोक्याला हात लावून बसली होती.

"आई , लोकांच काय म्हणते गं .. ते तर घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. आणि त्याच लोकांच आम्हाला काही ऐकायचचं नाही. कारण ही लोक आम्हाला खायला पायला देत नव्हती. ही लोक आपल्याला मदतीला धावून आली नव्हती. त्याचं कामच आहे बोलण्याचं आणि ते उत्तमपणे करतात. 'कुछ तो लोग कहेंगे लोगोका काम है केहेना।" तिने तालासुरात म्हणून दाखवले.

" आपण का इतका विचार करायचा. आई मला तुला रात्ररात्र जागून बाबांच्या फोटोसोबत बोललेलं आणि रडलेलं पाहायचं नाहीये. तुला आनंदात आणि मनभरून जगतांना बघायचं आहे." बोलतांना ती रडवलेली झाली.तितक्यात दारावरची बेल वाजली आणि प्रणवचे आई बाबा आत आले. वसुंधराने स्वतःला नॉर्मल केलं. त्याना आत या म्हणून ती किचनमध्ये जाणार तोच प्रेरणाताईने त्यांचा हात पकडून त्यांना सोफ्यावर बसवलं आणि त्याही वसुंधराच्या बाजूला बसल्या.

"वसुंधरा ताई खरतरं विहाचं कौतुक कराव तितकं कमी आहे. खूप विचार केला तिने तिच्या आईच्या एकटेपणाचा. आजकालच्या मुलांचे विचार प्रगल्भ आहेत. तिने तिच्या आईसाठी तिची एंगेजमेंटही तोडून टाकली." प्रेरणाताई खूप कौतुकाने विहाकडे बघत होत्या.

"काय .. विहा .." वसुंधरा यांना हे ऐकून थक्क झाले त्यांनी विहाकडे पाहिले.

"अग पण का बाळा?" वसुंधराचे मन दाटून आले.

विहा असं काही करेल याने त्यांच्या डोळ्यांत पाणी जमा झाले.

"तुमची छोटीशी बाहुली खूप मोठी झालीय. तिच्या मनात विचार आला. तिने तिच्या आईचा सुखाचा आनंदाचा विचार केला आणि विभाला प्रणव आम्हाला सांगितलं, विराजला सांगितले त्याला काही प्रॉब्लेम नव्हता पण त्याच्या आईवडिलांना हे मान्य नव्हतं. त्यांनी तुमचं लग्न आणि तिचं नातं यापैकी एक निवडायला सांगितलं आणि तिने तुमचा आनंद निवडला." हे ऐकून वसुंधरला गहिवरून आलं. तिने विहाकडे पाहिलं आणि लगेच तिला कुशीत घेतले .

वसुंधरा लग्नाला तयार होईल का? बघुया पुढच्या भागात.