Login

नकळत धागे जुळती अंतिम भाग - पाच

तुला ही जगण्याचा हक्क आहे.
नकळत धागे जुळती
अंतिम भाग पाच

"विहू माझी बाळं. किती मोठी झालीस ग माझी शोनूली. माझ्यासाठी स्वतःच्या प्रेमाला दूर सारलं. " वसुंधराचे डोळे वाहत होते.

"आई एवढं काही नाहीये त्यात तुझ्यासाठी तर मी शंभर विराजला कुर्बान करेल.." ती अगदी फिल्मीस्टाइलमध्ये म्हणाली.

"पण विराज त्याच खूप प्रेम आहे गं तुझ्यावर.." वसुंधरा तिला समजवत म्हणाली.

"तो विषय संपला आहे. विराजच्या आधी तू आहे. तुझ्या सुखाच्यामध्ये मी कोणालाही येऊ देणार नाही." तिने वसुंधराला पुढे बोलूच दिलं नाही.


"चला वराला आत बोलवा." विहाने आज्ञा केली तसे मोहन आत आले.

"तुम्ही?" वसुंधरा त्यांना पाहून अवाक झाली.

" हो,मी ." मोहन .

"आई आम्हाला मोहन अंकल बाबा म्हणून पसंत आहे."

"हे कधी ठरलं होतं? " वसुंधराने विचारले.

"खूप दिवस आधी. ते तर आम्हाला आधीपासूनच पसंत होते. आमच्या मनाने तर केव्हाच त्यांना बाबा मानले होते. किती काळजी करतात आपली. मग तुझं स्थळं नेलं त्यांच्याकडे. ते तयार होते फक्त तुझ्या होकाराची वाट पाहत होते. " विहाने डोळे मिचकवले.

भूतकाळ

जसा विहाच्या मनात वसुंधराच्या लग्नाचा विचार चमकला तसं तिच्या डोळ्यांसमोर मोहन काका आले आणि तिने लगेच विभालाही सांगून दिले. विभाही आधी शॉक झाली होती.

विभा विहा दोन्हीही मोहनच्या घरी गेले. विहाने बेल वाजवली. मोहन काकांनी दार उघडले. दारात त्यांची चिमणी दात दाखवत उभी होती.

"चिमणी तू .. अरे डॉक्टरसाहिबा पण आल्यात. या या मोस्ट वेलकम ."मोहन काकांनी त्यांना हसतमुखाने आत घेतले.

"काय घेणार?"

"आम्ही जे मागणार ते तुम्ही द्याल काका ." विहाने प्रश्न केला.

"ये चिमणेऽऽ तू मागितलयं आणि मी दिलं नाहीये अस आहे का?" मोहन काका तिच नाकं बोटाच्या चिमटीत पकडून ओढत म्हणाले.

"काका ते म्हणजे .." विभा बोलतांना अडखळत होती. कसं बोलावं, कुठून सुरुवात करावी हे तिला समजत नव्हते.

"काय झालं विभू." मोहन काळजीने म्हणाले.


"आम्ही तुमच्यासाठी स्थळ घेऊन आलोय." विहू पटकन म्हणाली.

"चिमू काय बोलतेय तू." ते न कळून म्हणाले. थोड्यावेळाने तिच्या बोलण्याचा अर्थ उमगला तस हे ऐकून त्यांचे डोळे विस्फारले.

"या वयात लग्न? काहीही बोलते ही चिमणी." ते मोठ्याने हसले.


" हो आणि मुलगी ही परिचयाचीच जवळची आहे. त्यात रेडिमेड दोन मुलीही आहे." विहा हसत म्हणाली. ते पाहून विभाने लगेच तिच्या दंडावर चापट मारली.

"चिमू मस्करी करतेय न माझी. "

"अजिबात नाही. आय एम व्हेरी सिरियस."

" मीराला अजून विसरलेलो नाही. मला नाही लग्न करायचं."

"पण मी कुठे म्हणतेय त्यांना विसरा … मी तर लग्न करण्यासाठी बोलतेय. या एकाकीपणाचा, राहण्याचा कंटाळा नाही आला का तुम्हाला? तुमची फॅमिली पूर्ण व्हावी असं नाही का वाटतं तुम्हाला?"

"पण कोण तयार होणार आहे या सत्तेचाळीस वर्षाच्या पुरुषासोबत लग्न करायला?"

"तुम्ही तयार आहात का आधी ते सांगा?" विहाने तिच्या मुद्द्यावर ठाम होती.

'अरे ही तर मागेच लागली माझ्या लग्नाच्या.' मोहन मनात म्हणाला.


"बरं ठीक आहे पण ती बाई आणि तिच्या मुली तयार असायला पाहिजे ना." मोहन काका विषय थांबवण्यासाठी म्हणाले.

"आम्हाला बाबा पसंत आहे." ती दात दाखवून डोळे मिचकवत म्हणाली.

"कायऽऽ." ते मोठ्याने ओरडले. त्यांचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

"तुझी तब्येत बरी आहे नं? विभा चेक कर ग बाई हिला. हिच्या डोक्यात काय चालू आहे काही कळत नाही."

"मी एकदम ठणठणीत आहे." विहाने उभी राहून उड्या मारून दाखवत होती..

मोहन विचार करत बसले. 'काय म्हणाली आम्हाला बाबा पसंत आहे.' हेच त्यांच्या कानात आवाज घुमत होता.' म्हणजे मी त्यांचा बाबा, वसुसोबत लग्न." त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्या डोळ्यांत आनंद दिसत होता. त्यांच्या डोळ्यातील आनंद विभा विहाला जाणवला आणि त्यांच्या आनंदातूनच त्यांचा होकार कळला. कुठेतरी मुलीसोबत वसुधरांने ही त्यांच्या मनात घर केले होते. आधी तुटक पणे बोलणारी वसुंधरा कधी काळजीनेही बोलत होती. आणि तिच्या काळजी करणाऱ्याने एकाकी मन सुखावत होते. मग ती कधी मनात घर करून गेली त्यांना सुद्धा माहिती नव्हते. पण, वसुंधराशी बोलायची हिम्मत होत नव्हती.

"आणि नाही पसंत असेल तर मी शिर्केच स्थळ बघितलयं आम्ही.." विहा हाताची घडी घालून त्यांच्याकडे पाहत म्हणाली. विभा विहाकडे गोंधळलेल्या चेहर्‍याने बघत होती. विहाने विभाला डोळा मारला. तिचा इशारा कळल्यावर विभा शांत बसली.

"अगं पण मी कुठे नाही म्हणालोय." मोहन लगेचच म्हणाले. विभा विहा हसले.


"बाबा आम्हाला पसंत आहे पण तुम्हाला या दोन मुलीचे बाबा व्हायला आवडेल का?" विहा त्यांच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली. बोलतांना एक अश्रू तिच्या गालावर आला तसा मोहन यांनी बोटाने पुसून तिला कुशीत घेतलं आणि तिच्या डोक्यावर थोपटले. विभाच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी एका हाताने विभाला बोलवले आणि तिला कुशीत घेतले. त्यांनी दोघांच्या कपाळावर पापी केली. दोघांचेही मन भरून आले होते. खूप वर्षापासून बाबाच्या प्रेमासाठी तरसत होत्या. वसुंधराने दोघांना आई आणि बाबा दोघांचही प्रेम दिलं होत पण आपल्या मैत्रिणींना त्यांच्या बाबासोबत हसत खेळत पाहून त्यांनाही बाबा आठवत होता. आई घरी येण्याआधी खूप रडून घेत होत्या, एकमेकांना समजवत होत्या. तिला काही समजू नये म्हणून शांत बसून राहत होत्या पण त्यांच्या शांत असणं ही तिला खूप काही सांगून जात होत. मग ती ह्या नाहीतर त्या कारणाने त्याचं मन रमवण्याचा प्रयत्न करत होती. तरीही वेड मन बाबाच्या आठवणीने व्याकूळ होतं होत.

"पण पाटिल मॅडम तयार आहेत का?" त्यांनी विचारले.

"ते काय आहे न बाबा तिला अजून काहीच माहिती नाहीये. आधी तुमचा होकार मिळाला की मग तिच्या सोबत बोलते." ती एकदम रिलॅक्स होऊन म्हणाली.

"अग चिमणे त्या नाही म्हणाल्या तर?" त्यांनी मनात आणलेला प्रश्न विचारला.

"डोन्ट वरी बाबा हम है ना. मिशन दुल्हन को मनाओ स्टार्ट." ती म्हणाली आणि दोघ खळखळून हसले.

भूतकाळ संपला.

"बाई गं. काय काय येतं या छोटुश्या डोक्यात." वसुंधराने हलक्या हाताने विहाच्या डोक्यात टपली मारली.

"पहिलीच मुलगी असणार तू स्वतःच्या आईचं स्थळं घेऊन जाणारी."

"सिंगल पिस आहे मी." ती अगदी तोऱ्यात म्हणाली.

" खरचं सिंगल पिस आहे ही सुकडी." प्रणव तिची खेचत म्हणाला.

"जिजूऽऽऽऽ ." तिने तोंड फुगवले आणि सगळेच हसायला लागले.
विहाने वसुंधरा आणि मोहनला एकमेकांजवळ उभे केले. विहाने वसुंधराचा हात मोहनच्या हातात दिला.

भटजी काकांना बोलावून जवळचा मुहूर्त काढला. विधिवत वसुंधराच आणि मनोजच लग्न लावण्यात आलं. कायमचे त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवले. त्यामध्ये विराजचा पूर्ण परिवार आला. विराजला पाहून विहाचे डोळे पाणावले पण तिने लगेचच चेहरा निर्विकार केला. विराजची आई विहाजवळ येवून तिला म्हणाली,"माफ कर विहा, तुझ्या भावना आम्ही समजू शकलो नाही. पुरुष जर कोणत्याही वयात दुसरे लग्न करू शकतो तर एक स्री का नाही? उतरत्या वयात पुरुषाला आधाराची गरज असते तस एका स्त्रीलाही असते. स्त्री असो वा पुरुष त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज असते. तिला ही लग्न करून जगण्याचा हक्क आहे. एक स्त्री असून मी एका स्त्रीच्या भावना समजू शकले नाही. माफ कर बेटा मला. अशीच साथ माझ्या विराजला देशील का?" त्या विहासमोर हात जोडत म्हणाल्या.


"प्लिज तुम्ही हात नको जोडू. मोठ्यांनी फक्त आशीर्वाद द्यावा आणि लहानांना माफ करावं." विहा त्यांच्या पाया पडत म्हणाली.
त्यांनी तिला उठवून मिठीत घेतलं. तिच्या कपाळावर ओठ टेकवले.. मोहनने विराजच्या हातात विहाचा हात दिला. विराजने हात अगदी घट्ट पकडून घेतला. विहा भरलेल्या डोळ्यांनी बघत तिच्या बाबांच्या कुशीत शिरली. विराजच्या आईने तिथेच विहा विराजच्या लग्नाचा मुहूर्त काढून घेतला आणि काही महिन्यानंतर विहा विराज ही लग्नाच्या बेडीत अडकले.

समाप्त .

कथा कशी वाटली, नक्की कळवा.