Login

प्रेम की आकर्षण? भाग २

प्रेम की केवळ शारीरिक आकर्षण....
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी

शीर्षक : प्रेम की आकर्षण? भाग २


खरंतर अनयला भेटण्यासाठी रजिता जितकी आतुर होती, तितकेच तिला मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी वेगळेही जाणवत होते. अंतरामुळे प्रेमाच्या मर्यादांना एक वेगळे वळण मिळते असे म्हणतात खरे; पण इथे या मर्यादाच हल्ली तिला बोचत होत्या. कारण आताशा तिला अनय काहीसा वेगळा भासायचा.

आजही तेच झाले होते. नेहमीप्रमाणे प्रेमाच्या पाशाला टाळणे तिला जमले नाही आणि त्यामुळेच घरी बहाणा देऊन ती अनयला भेटण्यासाठी आली होती. मनात थोडीशी धाकधूक तर होतीच; पण एक गोड अधीरताही दाटली होती.

ती छानपैकी तयार होऊन नेहमीच्या बागेपाशी आलेली. आजूबाजूच्या त्या मोहक वातावरणाला न्याहाळत तिने मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आणि समोरच तिला अनय दिसला. अनय वेळेआधीच तिथे येऊन तिची वाट पाहत होता. त्याला पाहिल्यावर आपसूकच तिची कळी खुलली होती. चेहऱ्यावर हसू खेळवतच ती पुढे सरसावली तसे अनयही खूश झाला.

जवळ येताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि काही क्षणांत बाजूला होत चालत पुढे जाऊ लागले. एका जागी येताच अनयने पुन्हा एकदा तिला मिठीत घेतले; पण पुढे एका क्षणी त्याचा स्पर्श तिला काही वेगळाच वाटू लागलेला.

न राहवून तिने पटकन म्हटले, “अनय प्लीज...”

अचानक तिच्या अशा वागण्याने अनयचा चांगलाच हिरमोड झालेला. चेहऱ्यावरील प्रेमळ भाव बाजूला होऊन आता त्याजागी त्रासिक भाव जमा झाले होते.

“काय झालं रजिता? एकतर आपण आज इतक्या दिवसांनी भेटत आहोत. खूप दिवसांनी भेटलो म्हणून तुला हक्काने जवळ घेतलं मी. तुझ्या जवळ आलो तर तुला प्रॉब्लेम काय आहे? दूर कशाला लोटलंस मला?” अनयने त्रासिक सुरात विचारले.

“प्रॉब्लेम असा नाही फार; पण ट्राय टू अंडरस्टॅण्ड... इट्स क्वाइट अनकम्फर्टेबल! आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण इतक्या दिवसांनी भेटतोय ना, मग जरा शांतपणे छानशा गप्पा करू ना.” अनयला आपले वागणे आवडले नाही हे लक्षात घेऊन रजिताने शांतपणे त्याला म्हटले.

“रजिता, यार मिस करतो मी तुला खूप. म्हणून भेटायला आलोय ना? आणि गप्पा काय रोज फोनवर पण होतातच ना? भेटून जर तुला जवळ घ्यावंसं वाटलं, तर यात माझं काय चुकलं? आणि काय म्हणालीस, अनकम्फर्टेबल? लाईक सिरियसली! आता तू कम्फटेर्बल पण नाहीयेस तर माझ्यासोबत! वाह! छान हां...” यावेळी हे सगळे बोलताना नकळतच अनयचा आवाज मात्र काहीसा वाढलाच होता.

क्रमशः
© कामिनी खाने ( संघ कामिनी )

0

🎭 Series Post

View all